हिंदुत्वनिष्ठांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांचे शास्त्रानुसार पंचगंगा नदीत दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
हिंदु संघटनांचे आवाहन – पाचव्या दिवशी भाविकांनी पंचगंगा नदीत विसर्जन करावे !
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेने श्री गणेशमूर्ती विसर्जन होऊ न देण्यासाठी पंचगंगा नदीकाठ ‘बॅरिकेट्स’ लावून बंद केला होता; मात्र अनेक भाविकांना शास्त्रानुसार नदीतच विसर्जन करावयाचे असल्याने त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना दूरभाष करून तसे कळवले. यानंतर प्रत्यक्षात विसर्जनाच्या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी प्रशासनाने काही भाविकांना विसर्जन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी विसर्जनातील अडथळे दूर केले. यामुळे दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन होऊ शकले. याचप्रकारे भाविकांनी घरगुती श्री गणेशमूर्तींचे ५ व्या दिवशीही पंचगंगा नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदु परिषेदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, भाजप युवा मोर्चाचे श्री. अमेय भालकर, श्री. सुरेंद्र निगवेकर, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री वैभव कवडे, अर्जुन आंबे, आेंकार कांबळे उपस्थित होते.
या संदर्भात श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘शास्त्रानुसार नदीत विसर्जन करणे हा भाविकांचा धार्मिक अधिकार असतांना प्रशासन अकारण भाविकांवर विसर्जन न करण्यासाठी बळजोरी करत आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत भाविकांनी ५० हून अधिक श्री गणेशमूर्ती नदीत विसर्जित केल्या. याच प्रकारे भाविकांनी ५ दिवसांच्या घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करावे.’’
इचलकरंजीत मोठ्या प्रमाणात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
इचलकरंजी – गत वर्षी प्रशासनाने पंचगंगा नदीवर मोठे विसर्जन तलाव सिद्ध करून भाविकांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची बळजोरी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या सांघिक प्रयत्नांमुळे, तसेच श्री. कौशिक मराठे यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेमुळे तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यापासून धडा घेत यंदा प्रशासनाने नदीकाठी छोटी कृत्रिम कुंड बसवली होती, तसेच मूर्तीदान ऐच्छिक ठेवले होते. भाविकांनी मात्र पंचगंगा नदीत विसर्जन करण्यासच पसंती दर्शवली. मूर्तीदानही अत्यल्प प्रमाणात झाले.