नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद, सर्व १७ बाजार समित्यांना टाळे !
नाशिक – कांदा व्यापार्यांनी विविध मागण्यांसाठी लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमधील लिलावात २० सप्टेंबरपासून सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. लिलाव बंदमुळे शेतकर्यांची कोंडी झाली असून अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे. या बंदवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा व्यापार्यांसमवेत बैठक घेऊन प्रयत्न करत होते; परंतु दोनदा बैठका होऊनही व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने जिल्हाधिकार्यांनाही हा बंद मागे घेण्याविषयी अपयश आले.
सौजन्य टीव्ही ९ मराठी
सध्या उन्हाळी कांद्याला २ सहस्र रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये प्रतिदिन १ सहस्र २०० ते १ सहस्र ३०० वाहनांतून कांदा विक्रीला येतो; मात्र लिलाव बंद झाल्याने याचा फटका शेतकरी आणि ग्राहक यांना बसू शकतो. अधिक दिवस बंद राहिल्यास आवक वाढून बाजारभाव पुन्हा घसरण्याची शक्यता असून शेतकर्यांना फटका बसेल. फेब्रुवारीत अवकाळी पावसाच्या तडाख्याने उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. वाचलेला कांदा शेतकर्यांनी चाळीत साठवला. तोही निम्म्याहून अधिक खराब झाल्याने शेतकर्यांची हानी होत आहे. त्यातच बाजार समिती बंद राहिल्यास शेतकर्यांची आणखी हानी होणार आहे.