कृत्रिम हौदात गढूळ पाणी आणि कचरा असल्याने श्री गणेशमूर्ती घेऊन घरी परतण्याची भाविकांवर वेळ !
पुणे – शहरात २० सप्टेंबर या दिवशी दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते; मात्र नदीपात्रातील नाना-नानी उद्यानासमोरील विसर्जन कृत्रिम हौदात अस्वच्छ पाणी, तसेच कचरा असल्याने अनेक भाविकांनी तेथे मूर्ती विसर्जन न करता श्री गणेशमूर्ती पुन्हा घरी नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे भाविकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनासाठी अनेक नागरिक महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाना पार्क, तसेच अमृतेश्वर विसर्जन घाटाजवळ कृत्रिम हौदात विसर्जनासाठी मूर्ती घेऊन आले; मात्र या हौदात पाणी तळाला होते, तसेच ते पाणी गढूळ झाले होते, त्यामध्ये कचराही पडला होता. नागरिकांना तक्रार केल्यानंतर हौदात पाणी ओतण्यात आले; मात्र त्यात घाण असल्याने ती घाण पाण्यावर तरंगत वर आली. परिणामी अप्रसन्न झालेल्या गणेशभक्तांनी घरी अथवा इतर ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आम्ही शाडूच्या मातीची मूर्ती आणली. मूर्ती विसर्जनासाठी आम्ही हौदाकडे गेलो; मात्र प्रत्यक्षात हौदात घाण पाणी आणि कचरा होता. त्यामुळे आम्ही घरीच मूर्ती विसर्जनासाठी जात आहोत. महापालिकेने अशा प्रकारे आमच्या भावनांशी खेळू नये. – एक गणेशभक्त |
संपादकीय भूमिका :महापालिका प्रशासन आणखी किती वेळा अशा पद्धतीने गणेशाचा अवमान करणार आहे ? याविषयी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. नदीला मुबलक पाणी असल्याने वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर शास्त्राला धरून कृती होईल. |