मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधून तेथेच विसर्जन करण्याचा अट्टहास !
यंदाच्या वर्षीही पिंपरी-चिंचवड महापालिकेची धर्मद्रोही कृती चालूच !
पिंपरी-चिंचवड, २१ सप्टेंबर (वार्ता.) – या वर्षी दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येथील महापालिकेने सिद्धता केली होती. विसर्जन घाटांचे सुशोभिकरण करून डागडुजी केली होती आणि मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधले. असे असूनही बरेच भाविक महापालिकेच्या मूर्तीदान आणि कृत्रिम हौदात विसर्जन करण्याच्या आवाहनाला न जुमानता वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
१. बहुतेक सर्व प्रमुख विसर्जन घाट पाण्यात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी बंद ठेवल्याने भाविकांची गैरसोय झाली.
२. शास्त्रांप्रमाणे वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करायचे असूनही केवळ महापालिकेच्या अट्टहासापोटी कित्येक भाविक नाईलाजाने कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते.
३. नदीला पाणी असतांनाही वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करण्यास महापालिकेने प्रतिबंध घातला आहे. चिंचवड रिव्हर व्ह्यू घाटावर काही गणेशभक्त सुरक्षारक्षकांसमवेत वाद घालत होते.
४. सुरक्षारक्षकांनी त्यांना वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करू दिले नाही. त्यांना दुसर्या ठिकाणी जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी ‘संस्कार प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते त्यांचा फलक महापालिकेच्या हौदावर लावून मूर्तीदान करवून घेत होते.
५. मोरया गोसावी मंदिर घाटावर भक्त वहात्या पाण्यात विसर्जन करत होते. मोरया गोसावी मंदिर घाट, रिव्हर व्ह्यू येथील घाट, वाल्हेकर वाडी येथील घाट, गणेश तलाव प्राधिकरण येथील घाटावर लाकडी बांबू लावून घाट बंद करण्यात आले होते.
६. घाटावरील कृत्रिम हौदातील पाणी पूर्णपणे खराब होऊनही त्यातच विसर्जन करण्यास सांगितले जात होते. हौदातील मूर्ती लगेच काढून घेतल्या जात होत्या. एका ठिकाणी त्या मूर्ती लगेच ट्रकमध्ये भरण्यात येत होत्या.
संपादकीय भूमिका :धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे हे योग्य असतांना कृत्रिम हौद आणि मूर्तीदान मोहीम राबवून महापालिका अन् काही स्वयंसेवी संघटना धर्मद्रोही कृत्य करत आहेत. याला भक्तांनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करावा. |