प्रेमभाव, सेवाभाव आणि आज्ञापालन अशा अनेक दैवी गुणांमुळे सद़्गुरु सुशीला आपटेआजी यांची भावपूर्ण सेवा करून ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. प्रणिता आपटे !
२.९.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सद़्गुरु सुशीला आपटेआजी यांच्या घरी जाऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अनौपचारिक भेट घेतली. ‘वर्ष २०१८ मध्ये सद़्गुरु आपटेआजींची सून सौ. प्रणिता आपटे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले होते. आता त्यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सौ. प्रणिता आपटे यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथेे दिली आहेत.
‘मी सौ. प्रणिता आपटे यांच्यासारखी सेवा करणारे अन्य कुणी पाहिले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
सद़्गुरु सुशीला आपटेआजींना ‘प्रणिता लवकरच प्रगती करील’, असे जाणवले असणे
‘सौ. प्रणिता आपटे यांची आध्यात्मिक पातळी वाढल्याचे सांगितल्यावर मी सद़्गुरु आपटेआजींना विचारले, ‘‘हे ऐकून तुम्हाला काय वाटले ? ‘त्यांची प्रगती होत आहे’, हे तुमच्या लक्षात आले होते का ?’’ तेव्हा सद़्गुरु आपटेआजी म्हणाल्या, ‘‘ती लवकर प्रगती करील’, असे मला जाणवले होते. ’’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (४.९.२०२३)
‘गुरु-शिष्य’, असे नाते असलेल्या आदर्श सासू-सून !
‘सद़्गुरु आपटेआजी उच्च आध्यात्मिक पातळीच्या संत असल्याने त्या त्यांच्या सूनेला, म्हणजे सौ. प्रणिता यांनाही त्यांच्याप्रमाणेच घडवत आहेत आणि त्याही आजींकडून शिकून, तशा घडत आहेत. त्यामुळेच सौ. प्रणिता यांचीही शीघ्र आध्यात्मिक उन्नती होत आहे. प्रणिताकाकूही सद़्गुरु आजींकडे गुरु म्हणूनच पहातात. त्यांच्यामध्ये ‘सासू-सून’, असे नाते नसून ‘गुरु-शिष्य’, असे आध्यात्मिक नाते आहे. त्यामुळे इतरांनाही त्यांच्याकडे पहातांना ‘सासू-सून’ नाते जाणवत नाही. दोघींमधील प्रेमभाव, जवळीकता सर्वकाही आध्यात्मिक स्तरावरील आहे. कलियुगात असे नाते पहायला मिळणे दुर्मिळच आहे.’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (४.९.२०२३)
१. प्रेमभाव
‘सौ. प्रणिताकाकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव असून त्यांचे प्रत्येकावरच पुष्कळ आणि समान प्रेम आहे.
२. सहजता आणि अल्प अहं
२ अ. आश्रमातील परिचित किंवा अपरिचित सर्वच साधकांशी सहजतेने बोलून त्यांच्यात मिसळणे : त्या घरी जितक्या सहजतेने वावरतात, तितक्याच सहजतेने त्या आश्रमातही वावरतात. आश्रमात आल्यानंतर त्या भेटणार्या प्रत्येक साधकाशी सहजतेने, आपलेपणाने आणि प्रेमाने बोलतात. ते साधक ओळखीचे असोत वा येता-जाता भेटणारे अन्य कुणी साधक असोत, त्या सर्वांमध्येच सहजतेने मिसळतात. नवीन साधक किंवा प्रसारातील साधक आश्रमात येतात, तेव्हा त्यांच्यापैकी काही साधकांमधील भिडस्तपणामुळे त्यांना ‘सर्वांशी कसे बोलू ?’, असे वाटते; परंतु प्रणिताकाकूंमध्ये एवढी सहजता आहे की, त्या कुठेही गेल्या, तरी तेथील सर्वांमध्ये सहजतेने मिसळतात.
२ आ. सौ. प्रणिता आपटे आणि त्यांचे यजमान सोमयाजी श्री. प्रकाश आपटे इष्टीसाठी एका ठिकाणी गेले असतांना सौ. प्रणिताकाकू तिथेही सर्वांशी सहजतेने मिसळून बोलत-वागत असणे : एकदा एका ठिकाणी सौ. प्रणिताकाकू आणि त्यांचे यजमान सोमयाजी श्री. प्रकाश आपटे इष्टीच्या (‘श्रोत’ या यज्ञीय परंपरेच्या अंतर्गत करण्यात येणारे यज्ञ) निमित्ताने गेले होते. तिथे मी आणि आश्रमातील काही साधकही उपस्थित होतोे. तिथेही मला त्यांच्या वागण्या-बोलण्यातील सहजता आणि आपलेपणा अनुभवता आला. त्यांच्या या सहज वागण्यामुळे ‘त्या नवीन ठिकाणी आल्या आहेत’, असे जाणवत नाही. त्या घर, आश्रम किंवा अन्यत्र कुठेही असल्या, तरी त्यांच्या वर्तनात काहीच पालट होत नाही. ‘स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणे’, असे त्यांच्या वागण्यात कधीही दिसून येत नाही. या सर्वांतूनच त्यांच्यात अहं पुष्कळ अल्प आहे’, हे लक्षात येते.
३. धर्माचरणी आणि आदर्श गृहिणी : सौ. प्रणिताकाकू धर्माचरणी आहेत. ‘प्रतिदिन नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, त्यावर फुलांची वेणी, कपाळावर कुंकू आणि हातात काचेच्या बांगड्या’, अशी त्यांची वेशभूषा असून ती एखाद्या आदर्श गृहिणीला साजेशी आहे. यातून त्यांची धर्माचरणी वृत्ती दिसते. कलियुगातील आजकालच्या स्त्रियांमध्ये अशा धर्माचरण करणार्या स्त्रिया पुष्कळ अल्प असून त्यांच्या वयाच्या स्त्रियांमध्ये कुणी नाहीतच. आजच्या काळातही त्या असे धर्माचरण करत असल्याचे पाहून ‘हिंदु राष्ट्रातील आदर्श गृहिणी अशी असेल !’, असेच मला म्हणावेसे वाटते.
४. घरातील सर्व धार्मिक कृती ‘साधना’ या भावाने करणे : स्वयं भगवान परशुरामांची दीक्षा लाभलेले अग्निहोत्री उपासक प.पू. महादेव आपटेगुरुजी हे त्यांचे सासरे होते. ते अत्यंत धार्मिक होते. त्यांच्या घरीच भगवान परशुरामाचे मंदिर आहे. त्यांच्या घरात याग, इष्टी इत्यादी विविध धार्मिक विधी नेहमी चालूच असतात. प्रणिताताई त्यांचा विवाह झाल्यापासून आतापर्यंत या सर्व गोष्टी साधना म्हणून करत आहेत.
५. सेवाभाव
प्रणिताकाकू सद़्गुरु आपटेआजींची सेवा अत्यंत मनोभावे करतात. त्या घरातील इतरांची सेवाही ‘ईश्वरसेवा’ म्हणून करतात. कुणी साधक किंवा अन्य कुणी त्यांच्या घरी आले, तरी त्यांची सेवाही त्या ‘ईश्वरसेवा’, या भावानेच करतात.
६. आज्ञापालन
त्यांच्यामध्ये ‘आज्ञापालन करणे,’ हा उत्तम गुण आहे. त्या त्यांचे यजमान, सद़्गुरु आपटेआजी किंवा अन्य कुणीही काही सांगितले, तरी ते सर्व ऐकून घेतात; पण स्वतःचे मत मांडत नाहीत. त्यांच्यामध्ये स्वेच्छा राहिली नाही. त्या सर्वकाही परेच्छेने करतात. ‘परेच्छेने जगणे’, हेच त्यांचे जीवन झाले आहे. त्यामुळेच त्यांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव
त्या सद़्गुरु आपटेआजींच्या समवेत गुरुदेवांना भेटायला आश्रमात येतात. प्रत्येक वेळी त्या गुरुदेवांसाठी काही पदार्थ करून आणतात. आश्रमात आल्यानंतर प्रणिताकाकू स्वयंपाकघरात जाऊन ते पदार्थ गरम करून मगच गुरुदेवांना खायला देतात.
८. अंतरातून साधना चालू असल्याने त्यांचे विचार आध्यात्मिक स्तरावर असणे
त्यांचे बोलणे आणि विचार आध्यात्मिक स्तरावरचे असतात. त्यांची आंतरिक साधना चालू असल्याने देवच त्यांना योग्य विचार देतो.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कौतुक करणे
त्यांच्यामध्ये अनेक दैवी गुण आणि दैवी लक्षणे आहेत; म्हणूनच जेव्हा त्या सद़्गुरु आपटेआजींच्या समवेत गुरुदेवांना भेटायला येतात, तेव्हा गुरुदेवही त्यांच्या गुणांचे पुष्कळ कौतुक करतात.
१०. प्रार्थना
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान परशुराम यांच्या कृपेने त्यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही शीघ्रतेने होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना !’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (४.९.२०२३)
सद़्गुरु सुशीला आपटेआजी यांच्या घरी जाणवलेली सूत्रे१. ऋषिमुनींच्या पर्णकुटीप्रमाणे असलेले सद़्गुरु आपटेआजींचे घर ! ‘सद़्गुरु आपटेआजींच्या पर्णकुटीजवळ (सद़्गुरु आपटेआजींच्या घराचे नाव ‘पर्णकुटी’ आहे.) आल्यावर ‘एका वेगळ्याच युगात आलो’, असे वाटते. म्हापसा शहरापेक्षा येथे वेगळेपणा जाणवतो. ‘त्यांच्या घरात प्रवेश करतांना वातावरणात आणि आपल्या मनाच्या स्थितीतही एक निराळेच परिवर्तन होत आहे’, असे जाणवते. पूर्वीच्या ऋषिमुनींच्या पर्णकुटीप्रमाणे सद़्गुरु आपटेआजींच्या घरातील वातावरण आहे. २. शांती आणि थंडावा जाणवणे यांच्या घरातील भूमी शेणाने सारवलेली आहे. त्या भूमीचा स्पर्श वेगळाच जाणवतो. गोव्यात अन्य ठिकाणी आणि सद़्गुरु आजींचे घर असलेल्या म्हापसा शहरातही पुष्कळ उष्णता आहे; परंतु सद़्गुरु आजींच्या घरात एक वेगळ्याच प्रकारची शांती अन् थंडावा जाणवतो. ३. घरात सदैव दैवी विभूतीचा सुगंध येणे येथे निरंतर अग्निहोत्र, इष्टी (‘श्रोत’ या यज्ञीय परंपरेच्या अंतर्गत करण्यात येणारे यज्ञ) चालू असतात. त्यामुळे येथील वातावरणात विभूतीचा दैवी गंध येतो. श्वास घेतांनाही विभूतीचा सुगंध येऊन मनाला चांगले वाटते. ४. मनाला समाधान देणारे सद़्गुरु आपटेआजींचे घर ! सद़्गुरु आपटेआजींचे घर स्थुलातून पाहिले, तर छोटेसेच आहे. त्यांचे घर दिसायला लहान असले, तरी त्यांच्यातील प्रेमभाव आणि व्यापकता यांमुळे ‘एखाद्या मोठ्या बंगल्यातही मिळणार नाही’, असे समाधान त्यांच्या घरी मिळते. ५. परशुराम मंदिरातील परशु जागृत जाणवणे सद़्गुरु आपटेआजींच्या घरातील परशुराम मंदिरातील ‘भगवान परशुरामाची मूर्ती आणि बाजूला असलेला परशु जागृत झाला आहे’, असे वाटले.’ – (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (४.९.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |