बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप आणि हिंदूंमध्‍ये दुफळी निर्माण करण्‍याचे कारस्‍थान !

दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्‍टेंबरला प्रसिद्ध केलेल्‍या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !

दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्‍टेंबर या दिवशी ‘सनातन (धर्म) संकट’ याविषयीचा अग्रलेख प्रसिद्ध केला. डाव्‍यांची (साम्‍यवाद्यांची) बुद्धीभेदाची ठराविक (टिपिकल) पद्धत आहे, ज्‍यामध्‍ये ‘असंबद्ध गोष्‍टी एकत्र आणायच्‍या, त्‍यांची एकमेकांशी सांगड घालायची, त्‍याविषयी असंबद्ध प्रश्‍न निर्माण करायचे, त्‍या प्रश्‍नांची जंत्री करून समोरच्‍याला त्‍याची उत्तरे देण्‍याच्‍या कामाला लावायचे.’ तरीही जे लोक कुंपणावर बसलेले असतात, साम्‍यवाद्यांच्‍या अशा लिखाणाने बुद्धीभेद होऊ शकतो. त्‍यांच्‍याकरता काही सूत्रे येथे देत आहे.

(पूर्वाध)

वैद्य परीक्षित शेवडे

१. संपादकांनी लेखात दिलेले चुकीचे संदर्भ

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या या अग्रलेखात जेवढे लिखाण केले आहे, त्‍यातील एकालाही त्‍यांनी संदर्भ दिलेला नाही. इतक्‍या मोठ्या वृत्तपत्राचे संपादक कुठलाही संदर्भ न देता लिखाण करतात. जेव्‍हा ते म्‍हणतात, ‘‘सनातन धर्म अशी कुठलही व्‍याख्‍या कुठेही दिलेली नाही आहे. महाभारतामध्‍ये याचे दोन संदर्भ असल्‍याचे सांगितले जाते’’, अशा प्रकारचे लिखाण दायित्‍वशून्‍यतेचे असते. ते जो संदर्भ म्‍हणत आहेत, त्‍यातील एक संदर्भ रामायणातील आहे. ज्‍यामध्‍ये ‘न हि वैरेण वैराणि शाम्‍यन्‍तीह कदाचन । अवैरेण हि शाम्‍यन्‍ति एष धर्मः सनातनः॥’ (अर्थ : शत्रूत्‍व (द्वेष किंवा शत्रूता) अधिक वैरभाव वाढवून कधीही संपवता येत नाही. केवळ प्रेमच हे वैर शमवू शकते, हा अनादी काळापासूनचा सनातन धर्माचा नियम आहे.), असा श्‍लोक आहे. हा श्‍लोक जसाच्‍या तसा पाली भाषेतील ‘धम्‍मपदम्’मध्‍ये वापरला गेला आहे. याचा अर्थ बौद्ध परंपरेमध्‍येही ती व्‍याख्‍या वापरली गेली आहे.

‘सत्‍यं ब्रूयात प्रियं ब्रूयान्‍न ब्रूयात सत्‍यम्‍प्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः ॥

– मनुस्‍मृति, अध्‍याय ४, श्‍लोक १३८’

(अर्थ : सत्‍य बोला, प्रिय बोला; पण अप्रिय सत्‍य बोलू नये आणि प्रिय असत्‍य न बोलणे, ही सनातन धर्माची परंपरा आहे.)

हा श्‍लोक मनुस्‍मृतीमधील आहे, म्‍हणजेच संपादक महाशय म्‍हणत आहेत त्‍याप्रमाणे यांतील कोणताही श्‍लोक महाभारतामधील नाही. मुळात तुम्‍ही चुकीचा संदर्भ देता आणि चुकीच्‍या संदर्भावर चुकीचे प्रश्‍न निर्माण करता अन् त्‍याच्‍यावर अन्‍यांनी उत्तरे द्यावीत, ही तुमची अपेक्षा आहे.

२. हिंदूंच्‍या कोणत्‍याही ग्रंथात ‘जात’ विचारण्‍याविषयी लिहिलेले नसणे

या अग्रलेखामध्‍ये म्‍हटले आहे, ‘आज एका ‘क्‍लिक’सरशी घरी येणारे सिद्ध खाद्यपदार्थ महत्त्वाचे मानायचे ? कि ते घेऊन येणार्‍याची जात महत्त्वाची मानायची ?’ ‘हिंदु धर्मातील कुठल्‍या ग्रंथामध्‍ये अशा प्रकारे जात विचारावी’, असे लिहिले आहे; हे संबंधित संपादक महोदयांनी दाखवून द्यावे. पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष हे दोन्‍ही स्‍वत:च मांडायचे आणि स्‍वतःची पाठ थोपटून घ्‍यायची; ही डाव्‍यांची पद्धत आहे. या ठिकाणी पूर्वपक्षच मुळात चुकीचा आहे. अशा प्रकारचा कोणताही चुकीचा संदर्भच मुळात हिंदूंच्‍या कोणत्‍याही धर्मग्रंथामध्‍ये नाही.

३. हिंदु धर्माला आधुनिक तंत्रज्ञानाचे वावडे नसणे

आधुनिक तंत्रज्ञानाचे हिंदु धर्माला कधीही वावडे नाही. उलट नवनवीन सुधारणांचा अंगीकार केल्‍यामुळे हिंदु धर्माची ओळख जगात निर्माण झाली आहे.‘न हि वैरेण वैराणि शाम्‍यन्‍तीह कदाचन ।’, असे जे म्‍हटले आहे, याचा अर्थ आम्‍ही जगाला शांततेचा संदेश देतो; मात्र हिंदु धर्माच्‍या उदारतेचा अपलाभ घेतला गेला. आपल्‍यावर अनेक आक्रमणे झाली; याविषयी तथाकथित विचारवंत काही भूमिका घेतात का ? आधुनिक तंत्रज्ञानाला कोणत्‍याही शहाण्‍या व्‍यक्‍तीचा विरोध असणार नाही. आम्‍ही ते लोक आहोत, ज्‍यांना ‘पृथ्‍वी गोल आहे’ आणि ‘ती सूर्याभोवती फिरते’, हेही या गोष्‍टी जगाने मान्‍य करण्‍यापूर्वीच ठाऊक होते. आम्‍ही कधीही ‘पृथ्‍वी चपटी आहे’, असे म्‍हणत नव्‍हतो. त्‍यामुळे तुम्‍हाला असे प्रश्‍न विचारायचे असतील, तर ते ‘पृथ्‍वी चपटी आहे’, असे जे आजही सांगतात’, त्‍यांना विचारले पाहिजेत.

४. लेखातील ‘केशवपन’वरील टीका म्‍हणजे साम्‍यवाद्यांचा ठराविक ‘अजेंडा’ !

या लेखात ‘केशवपन’वरून हिंदु धर्मावर टीका करण्‍यात आली आहे; मात्र‘ हिंदूंच्‍या कोणत्‍याही धर्मग्रंथामध्‍ये ‘विधवांना केशवपन अनिवार्य’ असल्‍याचे म्‍हटले आहे’, हे संपादक महोदयांनी दाखवून द्यावे. मुळात तसा कोणताही संदर्भच नाही. त्‍यामुळे मग ‘प्रश्‍नांची जंत्री निर्माण करायची, हा डाव्‍यांचा (साम्‍यवाद्यांचा) ठराविक ‘अजेंडा’ (कार्यसूची) असतो’, तोच या अग्रलेखातून दिसत आहे.

५. साम्‍यवाद्यांनी ‘ऑर्थोडॉक्‍स’चे मराठी भाषांतर ‘सनातनी’ असे चुकीचे करून तो रुजवणे !

‘आपल्‍या धर्माचा अभिमान बाळगणारे कट्टरवादी आणि आधुनिकतेचे पुरस्‍कर्ते यांच्‍यात संघर्ष होऊ लागला. हे कट्टरवादी म्‍हणजे सनातनी. तेव्‍हापासून सनातनी या शब्‍दाला सामाजिक-धार्मिक रूढी परंपरांमधील बदलांना विरोध करणारे हा अर्थ चिकटला, तो चिकटलाच’, असे या लेखात म्‍हटले आहे. मुळात ‘सनातनी’ हा शब्‍द नकारात्‍मकरित्‍या आपल्‍याकडे वापरला जातो. हा शब्‍द युरोपातील चर्चविरोधी चळवळीतून आला आहे. युरोपात जेव्‍हा चर्चने मांडलेल्‍या भूमिकेच्‍या विसंगत मते मांडण्‍यात आली, त्‍या वेळी अनेक शास्‍त्रज्ञांना सूळावर चढवण्‍याची शिक्षा देण्‍यात आली. ‘गॅलिलीओ’ यांनी मांडलेले मतही चर्चच्‍या मताच्‍या विरोधात असल्‍यामुळे त्‍याला शिक्षा सुनावली गेली. त्‍या वेळी वापरण्‍यात आलेल्‍या ‘ऑर्थोडॉक्‍स’चे या शब्‍दाचे मराठी भाषांतर कालांतराने ‘सनातनी’ असे चुकीचे केले गेले. या संपादकांसारख्‍या प्रवृत्तीच्‍याच लोकांनी हे जाणीवपूर्वक केले. आपल्‍या ‘सनातन’ धर्माचा ‘सनातनी प्रवृत्ती’ या शब्‍दाशी काहीही संबंध नाही. या अग्रलेखात ‘टोकाग्रह’ असा शब्‍द वापरण्‍यात आला आहे. खरे तर असा शब्‍द मराठी साहित्‍यामध्‍ये आजपर्यंत माझ्‍या वाचनात कधीही आलेला नाही. अशाच पद्धतीने तुम्‍ही चुकीचे शब्‍द जन्‍माला घालता आणि त्‍यानंतर जणू तेच योग्‍य आहे म्‍हणून दाखवता.

६. संतांच्‍या नावाचा वापर करून ‘शास्‍त्रप्रमाण नाकारा’, असे सांगणारे खोटारडे साम्‍यवादी !

‘त्‍याही आधी हिंदु धर्मामधील कर्मकांडांचा आग्रह धरणार्‍या नाठाळांच्‍या माथी काठी हाणू पहाणार्‍या तुकोबांना त्‍यांच्‍या काळामधल्‍या सनातन्‍यांचाच विरोध होता’, असे सदर अग्रलेख म्‍हणतो, मग ‘जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी कुठल्‍या सनातन्‍यांच्‍या विरोधात असे म्‍हटले आहे ? त्‍या अभंगाचा मागील-पुढील संबंध काय ? आणि कुठल्‍या कर्मकांडाच्‍या विरोधात संत तुकाराम महाराज हे म्‍हणत आहेत ?’ मुळात ‘कर्मकांड’ हा शब्‍द नकारात्‍मकदृष्‍ट्‌या रंगवण्‍याचे कामही डाव्‍या (साम्‍यवादी) लोकांनी केले, ज्‍याप्रमाणे ‘सनातनी’ हा शब्‍द नकारात्‍मकरित्‍या रंगवला; तसेच ‘कर्मकांड’ या शब्‍दाचे आहे. ‘नित्‍यनेमाने पूजा करणे’, हेही कर्मकांडच आहे. ‘पितरांना तर्पण करतो’, हे कर्मकांडच आहे. ‘यज्ञ करणे’, हेही कर्मकांडच आहे. यांतील कुठलीही गोष्‍ट नकारात्‍मक नाही. मुळात धर्माच्‍या प्रतिकांना नकारात्‍मकरित्‍या रंगवण्‍यामागे धर्माला लोकांच्‍या जीवनापासून तोडण्‍याचा डाव्‍यांचा प्रयत्न नेहमीच असतो. यातून ‘कर्मकांड’ या शब्‍दाला नकारात्‍मकतेचे वलय आणण्‍याचा हा प्रयत्न आहे. संत तुकोबांनी किंवा कोणत्‍याही संतांनी ‘शास्‍त्रप्रमाण नाकारा’, असे सांगितलेले नाही. संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरांविषयी अग्रलेखात म्‍हटले आहे, ‘संन्‍यास घेतलेल्‍या जोडप्‍याची मुले म्‍हणून ज्ञानदेवादी भावंडांना विरोध करणारे सनातनीच होते.’ भगवद़्‍गीतेमध्‍ये जो श्‍लोक आहे,

‘तस्‍माच्‍छास्‍त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्‍यवस्‍थितौ ।
ज्ञात्‍वा शास्‍त्रविधानोक्‍तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥

– भगवद़्‍गीता, अध्‍याय १६, श्‍लोक २४

(अर्थ : तुला कर्तव्‍य आणि अकर्तव्‍य यांची व्‍यवस्‍था लावण्‍यात शास्‍त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्‍त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्‍य आहे.)’

याचे ओवीबद्ध लिखाण करतांना संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊली काय सांगतात, तर ‘शास्‍त्र सांगेल ते सांडावे, ते राज्‍य तृण मानावे’, म्‍हणजे त्‍यांनी अतिशय ठामपणे शास्‍त्रीय वचनांचा पुरस्‍कार केला आहे. कुठल्‍याही संतांनी ‘आपल्‍या शास्‍त्रात दिलेली वचने नाकारा’, असे सांगितलेले नाही. हा डाव्‍यांचाच (साम्‍यवाद्यांचा) काळ आहे की, जणू काही ‘ते शास्‍त्र आणि धर्म यांविरोधात घेत असलेल्‍या भूमिकांचे मूळ स्रोत संतच आहेत’, असे ते भासवण्‍याचा प्रयत्न करत आहेत. हा त्‍यांचा खोटारडेपणा आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्‍पति, डोंबिवली. (१९.९.२०२३)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/721936.html