एस्.टी. बसच्या स्वच्छतेच्या १० गुणांमध्ये मार्गफलक सुस्पष्ट असण्याचाही समावेश !
श्री. प्रीतम नाचणकर
मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये स्वच्छ एस्.टी. साठी १० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मार्गफलक सुस्पष्ट असण्याच्या सूत्राचाही समावेश आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षातही बसस्थानके अस्वच्छ असल्याविषयी मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती.
एस्.टी.च्या स्वच्छतेच्या गुणांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये बसची आतून-बाहेरून स्वच्छता म्हणजे गाडीच्या आतमध्ये केरकचरा नसावा, बसचे आणि चालकाच्या केबिनचे दरवाजे आतून-बाहेरून स्वच्छ असणे, बसच्या आतमध्ये किंवा बाहेर अनधिकृत पोस्टर किंवा स्टीकर नसणे, बसमधील सर्व आसने, खिडक्या, चालकाची केबीन स्वच्छ असणे, प्रवाशांचे साहित्य ठेवण्याचे कप्पे, चालकासमोरील काच, बसच्या मागील काच हे सर्व स्वच्छ असणे आवश्यक आहे. बसचा मार्गफलक प्रवाशांना समजेल असा सुस्पष्ट असणे या सूत्रांसाठी प्रत्येकी १ गुण ठेवण्यात आला आहे.
स्वच्छ बसस्थानकासाठी १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये बसगाडीसाठी असलेल्या १० गुणांपैकी ७ पेक्षा अल्प गुण मिळाल्यास संबंधित आगारव्यवस्थापकांना प्रत्येक बसमागे ५०० रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. दंड आकारण्याचा तक्ताही परिवहन मंडळाने सिद्ध केला. बस अस्वच्छ आढळल्यास तात्काळ हा अर्ज पडताळणी करणार्या अधिकार्यांच्या स्वाक्षरीने संबंधित आगार व्यवस्थापकांना पाठवण्यात येणार आहे. त्याची एक प्रत परिवहन मंडळाची स्वच्छता समिती आणि महाव्यवस्थापक यांनाही पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात एस्.टी. महामंडळाच्या बसही स्वच्छ दिसतील, अशी आशा आहे.
नागरिकांनो, अस्वच्छ एस्.टी. ची छायाचित्रासह तक्रार करा !
एस्.टी. महामंडळाचे हे अमृतमहोत्सवी, म्हणजे ७५ वे वर्ष आहे. त्यामुळे एवढ्या वर्षांनी का होईना, एस्.टी.ने राज्यात व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वत: एस्.टी.मध्ये कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच अस्वच्छ एस्.टी. आढळल्यास छायाचित्र काढून याविषयी त्वरित बसस्थानकाच्या प्रमुखांकडे तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे एस्.टी.च्या गाड्या आणि बसस्थानके स्वच्छ रहाण्यास साहाय्य होईल.