कॅनडात पंजाबमधील शीख गुंडाची गोळ्या झाडून हत्या

डावीकडून लॉरेंस बिश्‍नोई आणि सुखदुल सिंह गिल

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या जूनमध्ये कॅनडामध्ये झालेल्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर केल्यावरून चालू असलेल्या वादाच्या वेळी आता कॅनडामध्ये भारतीय शीख गुंडाची हत्या करण्यात आली आहे. सुखदुल सिंह गिल उपाख्य सुक्खा दुनाके याची हत्या करण्यात आली आहे. वर्ष २०१७ मध्ये बनावट पारपत्र बनवून तो पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. त्या वेळी त्याच्यावर ७ गुन्हे प्रलंबित होते. खंडणी मागणे आणि खुन करणे, असे गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. ही सर्व प्रकरणे स्थानिक टोळ्यांच्या कारवायांशी संबंधित होती.

कॅनडातील विनिपेगमध्ये सुक्खा दुनाके याच्या डोक्यात ९ गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने घोषित केलेल्या ४३ आतंकवादी आणि गुंड यांच्या सूचीमध्ये सुक्खा याचा समावेश होता. सुक्खा दुनाके गुंडगिरी करण्यापूर्वी पंजाबच्या मोगा जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होता. सुक्खा दुनाके हा मूळचा बंबीहा टोळीशी संबंधित होता. कॅनडाला गेल्यानंतर त्याने भारतात त्याचे जाळे वाढवण्यास चालू केले. तो आतंकवादी अर्श डल्ला याच्या जवळ आला. त्याने राज्यात शस्त्र तस्करी आणि खंडणी उकळणे चालू केले.

लॉरेंस बिश्‍नोई टोळीने घेतले सुख्खाच्या हत्येचे दायित्व !

नवी देहली – कॅनडामध्ये सुखदूल सिंह उपाख्य सुख्खा याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या हत्येचे दायित्व लॉरेंस बिश्‍नोई टोळीने घेतले आहे. लॉरेंस बिश्‍नोई याच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट प्रसिद्ध करून ही माहिती देण्यात आली आहे. पोस्ट करणार्‍याने इतर गुंडांना धमकी दिली आहे. ‘जिथे जायचे तिथे जा. तुम्हाला पापाची शिक्षा नक्की मिळेल’, असे यात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

कॅनडातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली आहे, हेच यातून लक्षात येते ! पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर आगपाखड करत रहाण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे !