साधिकेला लक्षात आलेली सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांंची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता !
‘हनुमान जयंतीच्या पूर्वी एका वैद्यकीय सेवेनिमित्त मी सद़्गुरु राजेंद्रदादा यांच्याशी बोलत होते. त्या सहज संभाषणाच्या वेळी मला सद़्गुरु दादांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता लक्षात आली. यांविषयी आलेली अनुभूती आणि झालेले चिंतन पुढे दिले आहे.
१. अनुभूती आणि चिंतन
१ अ. अनुभूती – सद़्गुरु राजेंद्रदादा यांनी स्वतःच्या शिरोभागावर तळहात धरून साधिकेचा शिरप्रदेश पुष्कळ उष्ण असल्याचे सांगणे : वैद्यकीय सेवेअंतर्गत मी सद़्गुरु दादांचा वैद्यकीय अहवाल पहात होते. तेव्हा त्यामध्ये ‘डोके उष्ण होणेे’, असे एक लक्षण होते. त्यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी त्यांचा तळहात स्वतःच्या डोक्यावर धरला आणि मला तात्काळ म्हणाले, ‘‘तुमचे डोकेसुद्धा गरम होते ना !’’
मला नेहमी होणारा हा त्रास, सद़्गुरु दादांनी काही क्षणातच मी काहीही न सांगता सूक्ष्मातून अचूक जाणला होता. याचे मला अतिशय आश्चर्य वाटले ! खरेतर एक ‘वैद्य’ म्हणून मी सद़्गुरु दादा यांच्या शारीरिक स्थितीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होते; पण त्या उलट प्रत्यक्षात सद़्गुरु दादांनीच ‘स्कॅन’ (बारकाईने वाचन) केल्याप्रमाणे माझा त्रास सूक्ष्मातून क्षणार्धात जाणला. माझ्या ‘वैद्यत्वाच्या’ अहंचे निर्मूलन केल्याबद्दल सद़्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे आता सद़्गुरु आणि संतच रुग्णांचे खरे वैद्य आहेत : मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वी सांगितलेले वाक्य आठवले. त्यांनी सांगितले होते की, ‘पुढील काळात सद़्गुरु आणि संतच रुग्णांचे खरे वैद्य असतील !’ प्रत्यक्षात आता सर्व जण हेच अनुभवत आहेत. अनेक रोग हे सद़्गुरु संतांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळेच अधिक प्रमाणात आणि परिणामकारकरित्या बरे होत आहेत. बर्याच जणांनी याचा प्रत्यक्ष अनुभव कोरोना महामारीच्या काळात घेतला आहे. वैद्यकीय उपचार हे क्रियमाण कर्म म्हणून नाममात्र ठरत आहे.
वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.४.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |