सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद़्गुरु राजेंद्र शिंदे निवास करत असलेल्या खोलीत गेल्यावर आश्रमातील संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘सद़्गुरु राजेंद्र शिंदे निवास करत असलेल्या खोलीत गेल्यावर संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती’ हा लेख वाचून ‘खोलीतील चैतन्यात वृद्धी झाली की, खोलीत कसा पालट होऊ शकतो !’, या संदर्भात मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला खोलीच्या संदर्भात कसे हरवले’, हे माझ्या लक्षात आले आणि मला आनंदही झाला. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचे जितके अभिनंदन करावे, तितके अल्पच आहे.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले (१७.९.२०२३)
१. पू. गुरुनाथ दाभोलकर
अ. ‘मी सद़्गुरु राजेंद्र शिंदे निवास करत असलेल्या खोलीच्या बाहेर उभा असतांना आणि आत प्रवेश करतांना मला उजव्या बाजूला स्थिर वाटले.
आ. मला खोलीत जातांना हवेत तरंगत गेल्यासारखे वाटले.
इ. मला खोलीचे आकारमान मोठे वाटले. मला खोली जशी भव्य वाटली, तसे खोलीच्या बाहेरही जाणवले.’
२. पू. उमेश शेणै
अ. ‘सद़्गुरु राजेंद्रदादांच्या खोलीत गेल्यावर मला सुगंध आला.
आ. मला खोलीची उंची आणि रुंदी मोठी वाटली.
इ. ‘खोलीतील लादी गुळगुळीत झाली आहे’, असे मला जाणवले. मला पायांच्या तळव्यांना मऊ आणि गुळगुळीत वाटले. मला पाय घसरल्यासारखे वाटले.’
३. पू. रमेश गडकरी
अ. सद़्गुरु दादांच्या खोलीत प्रवेश करतांना ‘मी खोल गुहेत प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘खोलीचा आकार मोठा झाला आहे’, असे मला वाटले.
३ इ. खोलीतील देवघरातील श्रीकृष्णाचे चित्र आणि संतांची छायाचित्रे यांत जाणवलेले पालट
१. ‘श्रीकृष्णाच्या चित्रात पांढरेपणा जाणवून त्यातून शांतीची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात गुलाबी रंगाची छटा निर्माण झाली आहे.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात त्यांचे मुख लालसर दिसत आहे आणि ते त्यांच्या हास्याद्वारे अनिष्ट शक्तींचा नाश करत आहेत’, असे मला जाणवले.’
४. पू. शिवाजी वटकर
अ. ‘खोलीच्या दारासमोर बाहेर डोळे मिटून उभे राहिल्यावर खोली नेहमीपेक्षा फार मोठी सभागृहासारखी आहे’, असे मला जाणवले.
आ. खोलीत प्रवेश करतांना ‘मी मोठ्या पोकळीत जात आहे’, असे मला वाटले.
इ. खोलीत गेल्यावर माझे मन निर्विचार झाले.
ई. मला खोलीत चांगली स्पंदने जाणवत होती.
उ. ‘खोलीतील चैतन्यात वृद्धी झाली आहे’, असे मला वाटले.’
५. पू. (सौ.) अश्विनी पवार
अ. ‘सद़्गुरु राजेंद्रदादांच्या खोलीचा आकार मोठा झाला आहे’, असे मला वाटते.
आ. खोलीच्या भिंती भूमीपासून ५ – ६ फूट उंचीपर्यंत सिमेंटच्या वाटतात; मात्र त्याच्या वरील छताचा भाग पाण्यासारखा वाटतो. ‘छताच्या दिशेने पाण्यासारखे तरंग निर्माण होत आहेत’, असे मला जाणवले
इ. ‘खोलीत काही वेळा समुद्रासारखा नाद येतो’, असे मला जाणवते.
ई. काही वेळा मला खोलीत दिव्य गंध येतो. काही वेळा खोलीच्या बाहेरच्या मार्गिकेतही दिव्य गंध येत असतो.
उ. खोलीतील देवतांची चित्रे आणि गुरूंची छायाचित्रे पाहून माझी लगेचच भावजागृती झाली.
ऊ. देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र जिवंत आणि बोलके झाले आहे.
ए. खोलीतील स्नानगृहातही मला पुष्कळ चैतन्य जाणवले.’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१२.२०२१)
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘सद़्गुरु राजेंद्र शिंदे हे सनातन संस्थेचे ८ वे सद़्गुरु आहेत. त्यांनी वर्ष १९९९ ते २०१० या कालावधीत विविध स्तरांवरील समष्टी सेवांचे दायित्व सांभाळले, तसेच उत्तर आणि दक्षिण भारतात दौरा करून तेथील अध्यात्मप्रसाराच्या कार्याची घडी बसवली. वर्ष २०११ पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात राहून साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. भाद्रपद शुक्ल षष्ठी (२१.९.२०२३) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण या लेखात केले आहे.
१. सामान्य माहिती
अ. जन्मदिनांक : ५.९.१९६२
आ. जन्मवेळ : सकाळी ११.३०
इ. जन्मस्थळ : ठाणे, महाराष्ट्र
२. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचे व्यक्तीमत्त्व दर्शवणारे घटक
अ. लग्नरास (कुंडलीतील प्रथम स्थानातील रास) : सद़्गुरु राजेंद्रदादांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘तूळ’ रास आहे. तूळ रास वायुतत्त्वाची रास आहे. त्यामुळे व्यक्तीची बौद्धिक क्षमता, विशेषतः आकलनशक्ती चांगली असते. त्यामुळे कोणतेही कार्य कुशलतेने केले जाते. या राशीत कार्यतत्परता, तत्त्वनिष्ठता, न्यायीपणा, सेवाभाव, परिश्रम घेणे इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.
आ. जन्मरास (कुंडलीतील चंद्राची रास) : सद़्गुरु राजेंद्रदादांच्या कुंडलीत चंद्रसुद्धा ‘तूळ’ राशीत आहे. चंद्र हा व्यक्तीची स्वभाव-वैशिष्ट्ये दर्शवतो. तूळ राशीत नाविन्यता, जिज्ञासा, संशोधकवृत्ती, प्रामाणिकपणा, समर्पणभाव, मायेपासून अलिप्तता इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.
३. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्ये
३ अ. सद़्गुरु राजेंद्रदादा यांची प्रवृत्ती मूलतः सत्यनिष्ठ, न्यायी आणि प्रामाणिक असणे : सद़्गुरु राजेंद्रदादांच्या कुंडलीत ५ व्या स्थानात ‘गुरु’ आणि ११ व्या स्थानात ‘रवि’ हे ग्रह आहेत. हा योग अभ्यासूवृत्ती, विवेकशक्ती, वैचारिक प्रगल्भता आणि तत्त्वज्ञानाची आवड ही वैशिष्ट्ये दर्शवतो. कुंडलीतील ५ व्या स्थानातील गुरु ग्रह हा सद़्गुरु दादांची पूर्वजन्मीची साधना असल्याचे दर्शवतो.
सद़्गुरु दादांची प्रवृत्ती मूलतः सत्यनिष्ठ, न्यायी आणि प्रामाणिक आहे. सद़्गुरु दादांनी ‘भारतीय रेल्वे’त विविध पदांवर २१ वर्षे नोकरी केली. सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असल्याचे नोकरीच्या कालावधीत त्यांना लक्षात आले; परंतु त्यांनी भ्रष्टाचाराला थारा दिला नाही. ते नियमांनुसार काम करत. पैसे देऊन काम करून घेणार्या लोकांना त्यांनी दूर ठेवलेेे.
३ आ. सद़्गुरु राजेंद्रदादा यांना त्यांच्यातील समष्टी गुणांमुळे अल्पावधीत पुढच्या-पुढच्या स्तरांवरील समष्टी सेवांचे दायित्व मिळणे : सद़्गुरु राजेंद्रदादांच्या कुंडलीत चंद्र, गुरु आणि मंगळ या ३ ग्रहांचा एकमेकांशी नवपंचमयोग (शुभयोग) आहे. हे तिन्ही ग्रह समष्टी प्रकृतीचे आहेत. हा योग तत्परता, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, समयसूचकता, सहजता, धैर्य, आत्मविश्वास, चिकाटी इत्यादी समष्टीसाठी आवश्यक गुण दर्शवतो.
सद़्गुरु दादांचा वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेशी संपर्क आला. साधनेतील आरंभीच्या २-३ वर्षांत त्यांनी प्रथम उपकेंद्र, नंतर २-३ केंद्रे असलेला विभाग आणि त्यानंतर एका जिल्ह्याच्या प्रसारसेवेचे दायित्व सांभाळले. वर्ष २००४ मध्ये त्यांनी ३ जिल्ह्यांचे दायित्व सांभाळले. हे जिल्हे पहात असतांना ते अन्य जिल्ह्यांमध्येही प्रसारसेवेसाठी जात. वर्ष २००७ मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र’ आणि ‘गोवा’ या राज्यांचा दौरा केला. वर्ष २००८ मध्ये त्यांनी उत्तर भारतातील ६ राज्यांमध्ये दौरे केले, तर वर्ष २००९ ते २०१० या कालावधीत त्यांनी दक्षिण भारतातील ४ राज्यांमध्ये दौरे केले. त्यांनी तेथे अध्यात्मप्रसाराच्या कार्याची आणि साधकांच्या साधनेची घडी बसवली.
सद़्गुरु राजेंद्रदादा वर्ष २०१० मध्ये सनातनच्या ६ व्या संतपदी विराजमान झाले. वर्ष २००० ते २०१० या १० वर्षांच्या कालावधीतील सद़्गुरु दादांच्या समष्टी साधनेचा प्रवास सर्वत्रच्या साधकांसाठी प्रेरणादायी ठरला.
३ इ. सद़्गुरु राजेंद्रदादा यांनी त्यागमय जीवन जगणे : सद़्गुरु दादांच्या कुंडलीत ‘बुध’ आणि ‘शनि’ या ग्रहांचा नवपंचमयोग (शुभयोग) आहे. हा शुभयोग ४ आणि १२ या मोक्ष-स्थानांमध्ये आहे. हा योग त्यागमय जीवन दर्शवतो. सद़्गुरु दादांनी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर ४ वर्षांत सरकारी नोकरीचे त्यागपत्र देऊन पूर्णवेळ साधना चालू केली. त्यांनी अध्यात्मप्रसाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. उत्तर आणि दक्षिण भारताच्या दौर्यांवर असतांना तेथील आहार, वातावरण, सामाजिक परिस्थिती इत्यादींशी त्यांनी जुळवून घेतले. दौर्यांवर असतांना त्यांना रात्री प्रवास आणि दिवसा प्रसारसेवा करावी लागे. त्यामुळे त्यांना विश्रांती मिळत नसे. तथापि स्वतःच्या सुखसोयींचा विचार न करता त्यांनी गुर्वाज्ञापालन करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले.
३ ई. तीव्र देहप्रारब्ध दर्शवणारे जन्मकुंडलीतील योग : सद़्गुरु दादांच्या कुंडलीत ‘शनि’ आणि ‘केतू’ या ग्रहांची युती आहे, तसेच शनि अन् केतू यांचा रवि आणि मंगळ या ग्रहांशी षडाष्टकयोग (अशुभयोग) आहे. हे योग तीव्र देहप्रारब्ध दर्शवतात. सद़्गुरु दादांना पूर्वीपासून कंबरदुखीचा त्रास आहे. दक्षिण भारताच्या दौर्यावर असतांना त्यांचे शारीरिक त्रास बळावले. त्यांची पचनशक्ती मंदावली. वर्ष २०११ मध्ये महाराष्ट्राचा दौरा करत असतांना त्यांची कंबरदुखी आणि मानदुखी पुष्कळ प्रमाणात वाढली. त्यामुळे त्यांना दौरा थांबवून सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात निवासासाठी जावे लागले.
३ ई १. तीव्र शारीरिक त्रासांतही साधकांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संग’ घेणे : सद़्गुरु राजेंद्रदादा देवद आश्रमात रहाण्यासाठी आल्यावर त्यांनी साधकांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संग’ चालू केले. त्या काळात त्यांना शारीरिक त्रासामुळे ५ मिनिटेही बसता येत नसे. मान, पाठ, कंबर, पाय आदींचे दुखणे वाढत गेले. कोणत्याही अन्नपदार्थाचे पचन होत नसे. पोटाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे वैद्यांनी त्यांना ‘मुळीच बोलायचे नाही’ असे सांगितले; परंतु सद़्गुरु दादांच्या सर्व सेवा बोलण्याशीच संबंधित होत्या. गुरुसेवेच्या तीव्र तळमळीमुळे ते झोपून सत्संग घेत असत. विविध जिल्ह्यांतून देवद आश्रमात आलेल्या साधकांकडून त्यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ राबवून घेतली. वर्ष २०१३ नंतर त्यांनी भ्रमणभाषवरून एकेका जिल्ह्यातील साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेतले. हे सत्संग दिवसातील ६ ते ७ घंटे चालत असत. इतक्या प्रतिकूल शारीरिक परिस्थितीतही समष्टी कार्य केल्यामुळे वर्ष २०१६ मध्ये म्हणजे संतपद गाठल्यानंतर केवळ ६ वर्षांत सद़्गुरु राजेंद्रदादा सनातनच्या ८ व्या सद़्गुरुपदी विराजमान झाले.
सारांश
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सध्याच्या काळानुसार व्यष्टी साधनेला ३० टक्के अन् समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व असल्याचे सांगितले आहे. सद़्गुरु राजेंद्रदादांनी हे तथ्य प्रत्यक्षात सिद्ध केले. त्यांच्यातील अंगभूत समष्टी गुणांमुळे त्यांनी अल्प काळात पुढच्या-पुढच्या समष्टी सेवांचे दायित्व सांभाळले. त्यामुळे त्यांच्यात अधिकाधिक व्यापकत्व आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे समाजात प्रसारासाठी जाणे अशक्य झाल्यावर त्यांनी आश्रमात राहून साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या जन्मकुंडलीतील अशुभ ग्रहस्थितीचा परिणाम साधनेवर होऊ दिला नाही. तीव्र तळमळीमुळे ते स्थूलदेहाच्या मर्यादा ओलांडून अखंड गुरुकार्य करत आहेत.
कृतज्ञता
सद़्गुरु राजेंद्रदादांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.७.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |