एस्.टी. अस्वच्छ असल्यास आगार व्यवस्थापकांना होणार ५०० रुपयांचा दंड !
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई, २० सप्टेंबर (वार्ता.) – ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्या गाड्यांमध्ये म्हणावी तशी स्वच्छता नसल्यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे. यापुढे एखादी एस्.टी. अस्वच्छ असल्यास ती गाडी ज्या आगाराची असेल, त्या आगार व्यवस्थापकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
याविषयी एस्.टी. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी २० सप्टेंबर या दिवशी परिपत्रक काढले असून राज्यातील सर्व आगार व्यवस्थापकांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची चेतावणी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ प्रारंभ होऊन ५ मास झाले आहेत. या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील ३ स्वच्छ बसस्थानकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी १०० गुण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये स्वच्छ बसगाड्यांसाठी १० गुण निश्चित करण्यात आले आहेत. याविषयी परिपत्रक काढून, तसेच बैठकांमध्ये सूचना देऊनही बसगाड्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.
अधिकारी १ मासात १५ गाड्यांची तपासणी करणार !
सर्व पालक अधिकारी, एस्.टी. महामंडळाच्या स्वच्छता अभियानाचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष आणि समितीचे सदस्य, आणि विभाग नियंत्रक यांनी नियमितचे कामकाज सांभाळून प्रतीमासाला १५ बसगाड्यांची पहाणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. याविषयी एस्.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक, तसेच स्वच्छता समितीचे अध्यक्ष यांना याविषयीचा अहवाल द्यावयाचा आहे. ही पडताळणी मोहीम १ ऑक्टोबरपासून चालू होणार आहे. पडताळणीमध्ये बसगाडीला स्वच्छतेच्या १० गुणांपैकी ७ पेक्षा अल्प गुण मिळाल्यास गाडीची स्वच्छता असमाधानकारक मानली जाणार आहे. त्यामुळे त्या बससाठी दंड लागू होणार आहे.