‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतः माझ्या व्यवसायाचा भार घेऊन मला साधनेला वेळ दिला’, असा भाव असणारे सनातन संस्थेचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !
कतरास, झारखंड येथील यशस्वी उद्योजक आणि सनातन संस्थेचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका यांच्याशी त्यांच्या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्यातून त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे. २० सप्टेंबरला आपण याविषयीचा पहिला भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
२. साधनेमुळे व्यवसायात झालेले सकारात्मक परिवर्तन !
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : ‘साधनेसाठी आपली अष्टांग साधना हे सर्व आहेच. आपण एवढे मोठे व्यावसायिक आहात, तर यातून आपण साधनेसाठी वेळ कसा काढत होता ? साधनेचे प्रयत्न आपण कशा प्रकारे करता ?
पू. खेमका : ‘व्यवसायात तर चढ-उतार हे होतच असतात. गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) जोडण्यापूर्वी अडचणी किंवा संघर्ष होता. गुरुदेवांनी मला साधनेशी जोडून घेतल्यानंतर मला असे वाटले की, भगवंताची असीम कृपा माझ्यावर वर्षाव करत आहे. त्यानंतर मी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यांनी मला पुन्हा मागे वळून पाहू दिलेच नाही.
२ अ. अखंड नामजपामुळे प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांना मनातल्या मनात प्रार्थना करून ‘काय करू ?’, असे विचारल्यानंतर त्वरित उत्तर मिळू लागणे आणि तसे केल्यामुळे व्यवसायात यश प्राप्त होणे
पू. खेमका : जेव्हा मी नामजप करायला आरंभ केला, तेव्हा प्रार्थना, नामजप आणि सर्व अष्टांग साधना माझ्या जीवनात येत गेली. पूर्वी गुरुदेवांनी नाम, सत्संग, सत्सेेवा, त्याग आणि प्रीती ही साधनेची पाच अंगे सांगितली होती. त्यांनीच ते साधनेचे टप्पे माझ्याकडून करून घेतले. नामजप पुष्कळ झाला. चालता-फिरता, उठता-बसता, व्यवसायातील प्रत्येक निर्णयात, तसेच मी बैठकीमध्ये बोलत असतांनाही माझा नामजप चालूच असतो. जेव्हा माझ्या समवेत अधिकारी वर्ग असायचे ते म्हणायचे की, आपल्या समवेत अधिक चांगले वाटते. ते माझ्याशी व्यवसायाच्या गोष्टी अल्प बोलत आणि साधनेविषयी अधिक बोलत असत. त्या वेळी अशी अनुभूती यायची की, सगळीकडे गुरुदेवच गुरुदेव आहेत. माझ्या चारही बाजूंना तेच आहेत, उदा. एखादा निर्णय घ्यायचा आहे, कुठला ठेकेदारीचा अर्ज (टेंडर) भरायचा आहे, एखादे कार्य करायचे आहे किंवा व्यवसायात पुष्कळ अडचणी येत आहेत, त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांना मनातल्या मनात विचारून सर्व करतो. त्या वेळी निर्णय घेण्यात माझे असे काहीच नसते. असे वाटते, ‘प.पू. गुरुदेवांनी तो निर्णय एका क्षणात मला सांगितला आहे आणि मी त्याची अंमलबजावणी केली आहे.’ त्याचा व्यवसायात पुष्कळ मोठा परिणाम दिसून येऊ लागला.
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : किती सुंदर आहे. सर्वसाधारणतः एवढे काही सुचत नाही ना ! प्रत्येक वेळी त्यांना विचारून करायचे; किती छान आहे आणि तेही प्रत्येक वेळी आपल्या समवेतच रहातात !
२ आ. ‘व्यवसायाचा सर्व ताण स्वतःवर घेऊन गुरुदेव मला आनंदात ठेवत आहेत’, असा भाव निर्माण होणे
कु. तेजल : व्यवसायात चढ- उतार हे असतात, तर त्याचा ताण मनावर असतो का ?
पू. खेमका : व्यवसाय करतांना कधी निर्णय घ्यायचा असतो. कधी मोठ्या व्यावसायिकांशी, कधी प्रतिष्ठित लोकांशी (अरिस्टोक्रेट), तर कधी सरकारी नोकरशाहीशी (ब्युरोक्रेटस्) बोलायचे असते. ‘त्यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत ? त्या आपण कशा पूर्ण करू शकतो ?’, हा सर्व व्यवसायाचा एक भागच असतो. ज्यामुळे मनावर पुष्कळ ताण निर्माण होतो; परंतु प.पू. गुरुदेवांनी मला साधना शिकवून असे केले की, ते माझा सर्व ताण स्वतःवर घेतात आणि मला एकदम तणावमुक्त अन् आनंदात ठेवतात. मी काहीच करत नाही. माझ्या कार्यालयातील पटलावर आपण पाहिले, तर तेथे सनातनचे ग्रंथ किंवा ‘सनातन प्रभात’ हेच सापडेल. माझ्या पटलावर एकही कागद सापडणार नाही. मी कधी कधी स्वतःलाच विचारतो की, मी काय करत आहे ? प.पू. गुरुदेव तुझ्यासाठी एवढे सगळे करत आहेत. तू काय करत आहेस ? कधी कधी माझ्यामध्ये ‘तुझ्यामध्ये क्षमता दिलेली आहे, तुला एवढे दिले आहे, तरी तू अजून बसून राहिला आहेस ?’, असा अपराधीभावही येतो.
२ इ. गुरुदेवांनी सांगितलेली साधना केल्यापासून ‘माझा व्यवसाय तेच करत आहेत’, अशी अनुभूती प्रत्येक क्षणी येणे
पू. खेमका : मला असे वाटते की, मी साधना करतो आणि ते (गुरुदेव) माझा व्यापार करतात. त्यामुळे मला साधनेला पुष्कळ वेळ मिळतो. सर्वसाधारणतः व्यवसायात सकाळपासून रात्रीपर्यंत मन पुष्कळ गुंतलेले असते, हे मी स्वतः अनुभवले आहे.
प.पू. गुरुदेवांनी मला साधनेशी जोडल्यापासून माझ्यावर ईश्वराची कृपा एवढी झाली आहे की, साधनेला प्राधान्य दिले गेले आणि नकळतपणे व्यवसायाला दुय्यम स्थान दिले गेले. माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी मी कित्येक दिवस जातच नाही, तरी माझे व्यवसायाचे काम (‘साईट’) चालू रहाते. याउलट माझी जी मित्रमंडळी आहेत, त्यांना दिवसातून तीन वेळा व्यवसायाच्या ठिकाणी जावेच लागते. तेथे उपस्थित रहावे लागते. कधी कधी मला गुरुदेवांविषयी एवढी कृतज्ञता वाटते की, खरोखर मी काहीच करत नाही. तेच माझ्यासाठी सगळे करत आहेत.
२ ई. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आज्ञापालन केल्याने कोरोना महामारीच्या काळात रक्षण होणे पू. खेमका : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितले होते की, जेव्हा कोरोना महामारी चालू होती, तेव्हा त्या काळात आपल्याला घरातून बाहेर पडायचे नाही. त्यांचे मी १०० टक्के आज्ञापालन केले. मी ८ मास आमच्या घराचा उंबरठा ओलांडला नाही. त्या वेळी मला असे वाटत होते की, जणू प.पू. गुरुदेव चोहोबाजूंनी उभे आहेत. कोरोनापूर्वी सर्वसाधारणपणे मी ८ मिनिटेही घरात थांबत नव्हतो. हे सर्व प.पू. गुरुदेवांनीच माझ्याकडून करून घेतले.
पू. (सौ.) सुनीता खेमका : घरातील आम्हा सर्व लोकांमध्ये आज्ञापालनाचा जो गुण आहे, तो प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच आहे.
पू. खेमका : त्या ८ मासाच्या काळात संपूर्ण भारतभरातील उद्योगधंदे बंद होते, तसेच संपूर्ण जगात मोठमोठे उद्योग बंद होते ; परंतु माझा व्यवसाय चालूच होता.
(क्रमशः)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/722003.html