बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

आज भाद्रपद शुक्‍ल पंचमी (२०.९.२०२३) या दिवशी बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांची जयंती आहे. त्‍या निमित्ताने…

प.पू. कलावतीआई

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन

‘अन्‍नाची भूक जशी मनुष्‍याला नैसर्गिक असते, तद्वत् ज्ञानाची भूकही नैसर्गिकच असते. भोजन झाल्‍याविना जसा देहास आराम वाटत नाही, त्‍याप्रमाणे स्‍वरूपज्ञान झाल्‍यावाचून मनुष्‍याची आंतरिक तळमळ थांबत नाही. याचकरिता सद़्‍गुरूला शरण जाण्‍याची प्रथा आहे.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’)

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

पू. किरण फाटक

२ अ. माणूस स्‍वतःला देह समजत असल्‍याने ऐहिक सुखासाठी धडपडत असणे : ‘मी कोण ? माझा जन्‍म कशासाठी झाला ? मृत्‍यूनंतर मी कुठे जाईन ?’ इत्‍यादी गोष्‍टी माणसाला जन्‍मभर सतावत रहातात. याचे ज्ञान होणे, म्‍हणजेच खरे ज्ञान होणे. ‘आपण आणि देह या दोन वेगवेगळ्‍या गोष्‍टी आहेत’, हे आपल्‍याला पावलोपावली कळत असते; परंतु लौकिक दृष्‍टीने ‘देह म्‍हणजेच आपण’, असे समजून माणूस त्‍या देहाच्‍या सुखासाठी, म्‍हणजेच ऐहिक सुखासाठी धडपडत रहातो. त्‍याला ‘आपण नक्‍की कोण ?’, याचे ज्ञान होत नाही.

२ आ. शारीरिक वेदनांमुळे जीव नकोसा झाल्‍यावर मनुष्‍याला देहत्‍याग (आत्‍महत्‍या) करावासा वाटणे आणि देहत्‍याग केल्‍यावर मनातील अतृप्‍त इच्‍छांमुळे त्‍याला नवा देह धारण करावा लागणे : शारीरिक वेदना मनुष्‍याला जीव नकोसा करून टाकतात. त्‍या वेळी त्‍याला कळते, ‘आपण आणि देह वेगवेगळे आहोत.’ बर्‍याच वेळा त्‍याला वाटते, ‘हा देह टाकून द्यावा आणि नवा देह धारण करावा’; परंतु ते त्‍याच्‍या हातात नसते. काही जण हे दुःख असह्य होऊन देहत्‍याग (आत्‍महत्‍या) करतात; परंतु स्‍वतः केलेला देहत्‍याग हा माणसाला पुनःपुन्‍हा जन्‍म घेण्‍यास भाग पाडतो; कारण देहत्‍याग करतांना त्‍याच्‍या मनातील अतृप्‍त राहिलेल्‍या अनेक इच्‍छा त्‍याला नवा देह धारण करण्‍यास भाग पाडतात. काम-क्रोधादी सहा रिपूंमुळे त्‍याच्‍या हातून अनेक कुकर्मे घडत असतात. तो आपल्‍या वाणीने बर्‍याच लोकांना दुखावत असतो. त्‍याचप्रमाणे आपल्‍या गैरवर्तणुकीमुळे तो बर्‍याच जणांच्‍या रागाचे कारण बनतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या सूक्ष्म देहावर अनेक प्रकारे पापकर्मांचा एक मुलामा चढतो.

२ इ. गुणांप्रमाणे चरितार्थाचे साधन न निवडल्‍याने मानसिक आनंद मिळत नसणे; परंतु ज्ञानाने आत्‍म्‍याची हाक ऐकून जीवन जगल्‍यास आनंददायी मार्गक्रमण होत असणे : बर्‍याच लोकांना स्‍वतःचे गुण आणि दोष यांचे ज्ञान होत नाही. त्‍यामुळे गुणांप्रमाणे चरितार्थाचे साधन न निवडता ते भलतेच काहीतरी करत रहातात आणि त्‍यांच्‍या पदरी निराशाच पडते. भले त्‍यांना त्‍यांनी निवडलेल्‍या चुकीच्‍या व्‍यवसायातून पुष्‍कळ पैसा, प्रतिष्‍ठा मिळतही असेल; परंतु त्‍यातून त्‍यांना हवा तसा मानसिक आनंद मात्र गवसत नाही, उदा. जन्‍मतःच एखाद्याची चित्रकला पुष्‍कळ चांगली असते किंवा एखाद्याचा आवाज पुष्‍कळ गोड असतो. त्‍याला स्‍वरज्ञान आणि तालज्ञानही असते; परंतु तो वेगळेच शिक्षण घेऊन जन्‍मभर कारकुनाची नोकरी करत रहातो. पदोन्‍नती घेत घेत शेवटी तो भरपूर पैशाचा धनी होतो; परंतु त्‍याला त्‍याच्‍या आत्‍म्‍याची हाक ऐकूच येत नाही आणि अप्राप्‍य अशा कलेचा स्‍वर्गीय आनंद तो मिळवू शकत नाही; म्‍हणून ‘मी कोण आहे ? माझा जन्‍म कशासाठी झाला आहे ?’, हे ओळखणे म्‍हणजेच ‘ज्ञान असावे’, असे मला वाटते. असे जर प्रत्‍येकाच्‍या जीवनात घडले, तर तो एका विशिष्‍ट चांगल्‍या आनंददायी मार्गावरून मार्गक्रमण करू शकेल, संपूर्ण जगाला आनंद देऊ शकेल, आपल्‍या कुटुंबाचे चांगल्‍या प्रकारे पालन-पोषण करू शकेल आणि अशा सर्व लोकांमधून एक चांगला समाज घडत जाईल.

२ ई. माणसाला खरे ज्ञान केवळ सद़्‍गुरूच देऊ शकणे, पूर्वसुकृताने सद़्‍गुरूंची प्राप्‍ती होणे आणि त्‍यांनी मनुष्‍याचा उद्धार करणे : प्रारब्‍ध योगामुळे माणसाला हे ज्ञान होण्‍यास फार विलंब लागतो. माणसाला जीवनात हे कळण्‍यासाठी कुणाचा तरी सल्ला पुष्‍कळ महत्त्वाचा असतो. हा सल्ला केवळ सद़्‍गुरूच त्‍याला देऊ शकतात आणि योग्‍य मार्गावर आणू शकतात; परंतु योग्‍य सद़्‍गुरु मिळणे हेसुद्धा माणसाच्‍या पूर्वसुकृतावर अवलंबून असते. ‘जैसे ज्‍याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्‍वर…’, असे एका गाण्‍यात म्‍हटले आहे.’ ते खरेच आहे. सद़्‍गुरु नुसत्‍या दृष्‍टीक्षेपानेसुद्धा माणसाचे जीवन पालटू शकतात. जीवनात शिक्षक, गुरु पुष्‍कळ करता येतात; परंतु ‘सद़्‍गुरु हा आपल्‍या सद़्‍भाग्‍यानेच प्राप्‍त होतो’, असे मला वाटते. सद़्‍गुरु हे शिष्‍याला शोधत शोधत येतात आणि त्‍याचा उद्धार करतात. सद़्‍गुरु करता येत नाहीत, तर ते शिष्‍याला आपल्‍याकडे ओढून घेतात आणि त्‍याला शेवटपर्यंत अंतर न देता त्‍याचा उद्धार करतात. ‘थोर संतांचा सहवास आणि भक्‍ताने स्‍वतः एकचित्ताने अन् श्रद्धेने केलेली साधना’ भक्‍ताला सद़्‍गुरूंपर्यंत घेऊन जातात.’

– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्‍हा ठाणे. (८.८.२०२३)