श्री गणरायाला साकडे !
देवा श्री गणेशा, तू गणांचा अधिपती आहेस ! तू दुःखहर्ता आहे आणि सुखकर्ता आहेस. पूजेत तुला पहिला मान आहे; कारण तुझ्या स्मरणमात्रे दाही दिशा मोकळ्या होतात आणि पूजेतील ती ती देवता पूजेच्या ठिकाणी येऊ शकते !
तू भक्तांना आनंद देतोस ! तुला घातलेले नादभाषेतील साकडे तू त्या त्या देवतेला प्रकाशभाषेत रूपांतरित करून पोचवतोस ! तुला देवतांची प्रकाशभाषा आणि मानवाची नादभाषा समजते; म्हणूनच तू मानवांचा लाडका देव आहेस. तू बुद्धीदाता आहेस; म्हणून तुझा जप केल्याने, स्तोत्र म्हटल्याने बुद्धी शुद्ध होत असते. अशक्त व्यक्ती तुझा जप करून सशक्त होते; कारण तू प्राणशक्तीदाता आहेस. तू ओंकारस्वरूप आहेस, म्हणजेच तूच पूर्णब्रह्म आहेस, सनातन (नित्य, नूतन) आणि शाश्वत आहेस !
सध्या सनातन धर्मावर मोठ्या प्रमाणात आक्रमणे चालू आहेत. सनातन धर्माला संपवण्याची भाषा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा चारही दिशांकडून ऐकू येत आहे. मोदी यांची राजवट उलथवण्यासाठी सनातन धर्मियांना संपवण्याची भाषा केली जात आहे. त्यासाठी त्यांच्याकडून वैचारिक बुद्धीभेद करण्याची कृतीही होत आहे. सामान्य हिंदूचा त्याच्या धर्मावरील विश्वास उडावा किंवा जे पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे हिंदु संस्कृतीपासून दुरावत चालले आहेत, ते अधिक दूर जावेत, हा त्यांचा हेतू आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आमच्या प्रत्येक सनातन गणेशभक्ताच्या घरी तू वास्तव्याला येणार आहेस ! त्यासाठी आम्ही आनंदित आहोतच. या निमित्ताने तुझ्याकडे साकडे घालायला आम्हाला संधी लाभणार आहे ! आम्ही साकडे काय घालणार; हेही तुला ठाऊक आहे. खरे तर हेही साकडे घालण्याची आवश्यकता नाही; कारण तू सर्व जाणतोसच…! पण राष्ट्र आणि धर्म यांसाठी आमचे योगदान देणे, ही आमची साधना आहे. धर्मसंस्थापनेचा संकल्प तू केलेलाच आहेस ! पण भक्तांनी हाक मारल्याविना तू धावून येणार नाहीस, हेही आम्ही जाणून आहोत…! म्हणूनच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुला मनोमन कळकळीची प्रार्थना आणि आर्त विनवणी आहे, ‘हे गणराया, सनातन धर्मावर वैचारिक आक्रमण करणार्यांना तूच योग्य बुद्धी दे. सनातन धर्माचे महत्त्व आज विश्वात सर्वत्र पसरत आहे, त्याला अधिक झळाळी मिळू दे. सनातन धर्मावर जे वैचारिक आघात होत आहेत, ते हिंदूंना तेवढ्याच प्रबळतेने आणि आत्मविश्वासाने परतवून लावता येऊ देत. त्यासाठी तूच त्यांना शक्ती आणि बुद्धी दे.’
– श्री. श्रीराम खेडेकर, बांदिवडे, गोवा.