उज्जैन आणि ओंकारेश्वर येथे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची भीती !
मध्यप्रदेशात पावसाचा हाहा:कार !
बुलढाणा – मध्यप्रदेशातील दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नर्मदा आणि क्षिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्गही नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे नर्मदा नदीला महापूर आला आहे, तसेच या महापुरामुळे उज्जैन-इंदूर आणि बुर्हाणपूर-सोलापूर हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मोरटक्का येथील नर्मदा नदीच्या पुलापासून केवळ २ फुटांच्या अंतरावर पाणी आले आहे. त्यामुळे हा महामार्ग बंद आहे. हा महामार्ग बंद असल्यामुळे पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील अनेक लोक मध्यप्रदेशात अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१. सध्या ओंकारेश्वर आणि मोरटक्का परिसरात बचाव कार्याची मोहीमही राबवण्यात येत आहे.
२. मध्यप्रदेशमध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये महापुराची स्थिती उद़्भवली आहे. नर्मदा नदीवरील धरणांचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पुरामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे.
३. इंदूर, नर्मदापुरम, रतलाम आणि उज्जैन येथे मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी घोषित करण्यात आली आहे. ओंकारेश्वर येथे धरणाचे २२ दरवाजे उघडण्यात आलेत.
४. त्यामुळे जबलपूर, नरसिंहपूर, रायसेन, नर्मदापुरम आणि खांडवा जिल्ह्यांतील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
५. मध्यप्रदेशातील ८ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे, तर सध्या उज्जैनमधील अनेक मंदिरे आणि घाट पाण्याखाली गेले आहेत.
६. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ साहाय्य पोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.