भाषेचा सन्मान केला, तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल ! – आशुतोष राणा, चित्रपट अभिनेते आणि लेखक
मुंबई येथे तिसरी अखिल भारतीय राजभाषा परिषद !
मुंबई – हिंदी ही माझ्या स्वप्नांची भाषा आहे, माझ्या प्रियजनांची भाषा आहे, त्यामुळे ती समृद्ध झालीच पाहिजे. माझ्या आईला अनेक भाषा अवगत होत्या. आम्ही लहान असतांना ती म्हणत असे की, तुम्ही भाषेचा सन्मान राखला, तर ती तुमचा मान राखेल. मी एक अभिनेता म्हणून तुम्हाला आवडेन किंवा आवडणार नाही; पण एक भाषाप्रेमी असल्याने तुम्हाला मी नक्कीच आवडेन. भाषा आपल्यातील भावना जागृत करते. लिहिण्या-बोलण्यात वापर करून हिंदी भाषेचा आम्ही सन्मान केला, असे अनेकजण म्हणतात; पण मी म्हणेन हिंदीने मला सन्मान दिला आहे. आशुतोष राणाची ओळख तुमच्यामध्ये अभिनेता म्हणून असेल; पण मला वाटते की, माझी ओळख एक लेखक म्हणून आहे. तिसर्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या दुसर्या दिवसाच्या तिसर्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कवी, गीतकार आणि टीव्ही पत्रकार आलोक श्रीवास्तव यांनी त्यांची मुलाखत घेतली.
तिसरी अखिल भारतीय राजभाषा परिषद
भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: आशुतोष राणा
हिंदीला पुन्हा सन्मान मिळवून देण्यासाठी आपल्याला आपली विचारसरणी बदलावी लागेल: महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या उपाध्यक्षा प्रियांका शक्ती ठाकूरhttps://t.co/EQ9JQ8hL1E@airnews_pune pic.twitter.com/td6MWfkZdk
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) September 16, 2023
राणा पुढे म्हणाले की, हिंदी दिवस आणि हिंदी पंधरवडा साजरा करण्यामागील कारण म्हणजे या दिवशी अन् या पंधरवड्यात आपण हिंदीच्या सेवेचा उत्सव साजरा करतो. आपल्या देशात केवळ सणच साजरे होत नाहीत, भावनाही साजर्या होतात, भाषाही साजर्या होतात.
हिंदीला पुन्हा सन्मान मिळवून देण्यासाठी आपल्याला आपली विचारसरणी पालटावी लागेल ! – प्रियांका शक्ती ठाकूर, उपाध्यक्षा, महाराष्ट्र हिंदी परिषद
या सत्रात महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या उपाध्यक्षा प्रियांका शक्ती ठाकूर म्हणाल्या की, हिंदी पुष्कळ महत्त्वाची आहे, त्यात भरपूर गोडवा आहे; पण वेळोवेळी तिचा गोडवा अल्प होत असतो. याला आपणच कारणीभूत आहोत. मोठ्या कार्यक्रमात गेल्यावर आपल्याला वाटते की, येथे हिंदी बोललो, तर आपले महत्त्व अल्प होईल, मात्र हे बरोबर नाही. तिथे आपण इंग्रजीत बोलतो. आपल्या ‘स्टँडर्ड’चा आपण विचार करतो, हे चुकीचे आहे असे मला वाटते. त्यासाठी आपली विचारसरणी पालटायला हवी.