डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचा पुण्यात प्रकाशन सोहळा !
पुणे – डावी विचारसरणी ही दंभ, दर्प आणि अहंकार यांवर आधारित आहे. चुकीच्या विचारांची मांडणी करून ते पोचवण्यासाठी आवश्यक परिसंस्था त्यांच्याकडे आहे. या विचारधारेकडून चुकीची मांडणी होत असल्याने ती रोखण्यासाठी सजग राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे. डाव्या विचारसरणीला रोखण्याची क्षमता भारत देशात आहे. हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.
RSS Sarasanghachalak Dr Mohan Bhagwat, JNU Vice Chancellor Dr Santishree Dhulipudi Pandit launched Marathi book ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ authored by Abhijit Jog at Pune, Maharashtra. pic.twitter.com/3mJAqRcfij
— Rajesh Padmar (@rajeshpadmar) September 18, 2023
दिलिपराज प्रकाशन संस्थेच्या वतीने अभिजित जोगलिखित ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. शांतीश्री पंडित, प्रकाशक राजीव बर्वे आणि अभिजीत जोग उपस्थित होते. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
प.पू. सरसंघचालक पुढे म्हणाले की, डाव्या विचारांचे चेहरे वेगळे आहेत; मात्र आसुरी प्रवृत्ती कायम आहे. त्यामुळे प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि योग्य आचरण, या मार्गांनी ही विखारी अन् विषारी प्रवृत्ती रोखता येईल. मूळात ही विचारणी पाश्चिमात्य आहे. ‘मीच बलवान आहे, संशोधक आहे, विचारधन आहे’, अशी मांडणी या विचारसरणीकडून केली जाते. विचारसरणीला झुंडशाही करायची आहे; मात्र ‘आम्ही लोकशाही मानतो’, असे ते भासवतात. मुक्त विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्याकडून दडपशाही होते, हे वास्तव आहे. देश, धर्म आणि राष्ट्र यांनंतर आता ही विचारसरणी कुटुंबव्यवस्था पोखरत आहे.
संस्कृतीवर आक्रमणे होत आहेत ! – प.पू. सरसंघचालकमी गुजरातच्या एका शाळेत गेलो होतो. तेथील एका शिक्षकाने मला ‘किंडरगार्डन’ (बालवाडी) शाळेत लावलेला एक नियम दाखवला. शिक्षकांना ‘केजी-२’च्या मुलांना त्यांच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ची (खासगी भाग) माहिती आहे का ?’, अशी माहिती मिळवण्यास सांगणारा हा नियम होता. पहा डाव्यांचा विचार कुठेपर्यंत गेला आहे. डाव्यांच्या साहाय्याशिवाय अशी विचारणा होणे शक्यच नाही. अशा प्रकारचे आक्रमण आपल्या संस्कृतीशी संबंधित सर्व गोष्टींवर होत आहे. छोट्या मुलांना असे विचारणे, हा डाव्या विचारांचा परिणाम आहे. आपल्या संस्कृतीवरील सर्व चांगल्या गोष्टींवर अशा प्रकारची आक्रमणे होत आहेत. |