सनातन संस्थेचे ‘आध्यात्मिक उपाय सद़्गुरु’ असलेले सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
‘सद़्गुरु मुकुल गाडगीळ हे दत्तावतारी संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि गणेशावतारी संत परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रमाणेच ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असून तेही श्री गणेश अन् शिव यांचा अंश असलेले समष्टी संत आहेत. अशा थोर विभूतीच्या चरणी हे लेखपुष्प कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.
१. सद़्गुरु गाडगीळकाकांमध्ये जन्मतःच श्री गणेश आणि शिव यांचे तत्त्व असणे
सद़्गुरु गाडगीळकाकांमध्ये असलेल्या श्री गणेशाच्या तत्त्वामुळे त्यांच्यामध्ये श्री गणेशाचे ‘विघ्नहर्ता’ हे रूप कार्यरत होऊन त्यामुळे साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतील अनेक विघ्ने दूर होतात. त्यांच्यामध्ये शिवाचे तत्त्व असल्यामुळे ते अखंड जागृत ध्यानावस्थेत असतात. ते ध्यानाच्या माध्यमातून ईश्वराच्या निर्गुण तत्त्वाशी सतत अनुसंधानात असतात. त्यामुळे त्यांच्याकडून सतत निर्गुण-सगुण स्तरावरील पांढर्या रंगाच्या आणि शीतल चैतन्यलहरी वायूमंडलात प्रक्षेपित होऊन त्या लहरी वायूमंडलाची शुद्धी करतात.
२. सद़्गुरु गाडगीळकाकांमध्ये आवश्यकतेनुसार विविध देवतांचे तत्त्व कार्यरत होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या कार्याला साहाय्य करण्यासाठी सनातन संस्थेतील साधक, संत, सद़्गुरु आणि परात्पर गुरु, तसेच सनातन संस्थेला जोडलेले समाजातील अनेक महंत, संत, सद़्गुरु आणि परात्पर गुरु कार्यरत झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध देवतांची तत्त्वे श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना सूक्ष्मातून साहाय्य करत असल्याने सनातन संस्थेला दैवबळ प्राप्त झाले आहे. या दैवीबळावरच सनातन संस्था पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे शिवधनुष्य पेलू शकते. सद़्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून ब्रह्मदेव, विष्णु, शिव, श्री गणेश, हनुमान, दत्त, श्री दुर्गादेवी, श्री महालक्ष्मीदेवी, श्री सरस्वतीदेवी, सूर्यदेव इत्यादी देवतांची तत्त्वे आवश्यकतेनुसार कार्यरत होऊन विष्णुस्वरूप असणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यात सहभागी होऊन त्यांना साहाय्य करत आहेत.
३. सद़्गुरु गाडगीळकाकांमध्ये आवश्यकतेनुसार सप्तर्षींचे तत्त्व कार्यरत होणे
पृथ्वीवर चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाने सप्तर्षींना उत्पन्न केले. हे सप्तर्षी पृथ्वीवर धर्मसंस्थापना करणार्या श्रीविष्णूच्या विविध अवतारांना साहाय्य करतात. सद़्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून सप्तर्षि आणि अन्य ऋषी यांची तत्त्वे कार्यरत होऊन विष्णुस्वरूप असणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यात सहभागी होऊन त्यांना साहाय्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी वसिष्ठ ऋषींचे ब्राह्मतेज, तर कधी विश्वामित्र ऋषींचे क्षात्रतेज कार्यरत असते. त्यांच्यातील ब्राह्मतेजामुळे ते साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना, तसेच सूक्ष्म जगत् यांच्याविषयी अचूक मार्गदर्शन करतात. त्यांच्यातील क्षात्रतेजामुळे ते पाताळातील मोठ्या वाईट शक्तींशी २४ घंटे अविरतपणे न थकता लढू शकतात. अशा प्रकारे सद़्गुरुकाकांच्या माध्यमातून समस्त ऋषींचे तपोबळ क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या स्वरूपात कार्यरत झाले आहे. या तपोबळावरच सनातन संस्था पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे अवतारी कार्य पूर्णत्वाला नेत आहे.
४. सद़्गुरु गाडगीळकाकांची ठळक गुणवैशिष्ट्ये !
४ अ. मनाची निर्मळता : त्यांचे मन मानससरोवरातील तीर्थाप्रमाणे अतिशय निर्मळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पुष्कळ प्रमाणात ईश्वरी चैतन्य आकृष्ट होते आणि ते पुष्कळ प्रमाणात वायूमंडलात प्रक्षेपित होते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वामुळे पिंड, वास्तू आणि वायूमंडल या तिन्हींची शुद्धी होते.
४ आ. कृपावत्सलता : त्यांच्यामध्ये भगवंताचा ‘कृपावत्सलता’ हा दैवी गुण प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला त्यांच्यातील निर्मळ प्रीतीची प्रचीती येऊन त्यांच्या कृपेची अनुभूती येते.
४ इ. तत्परता असल्याने सर्वांना आधार वाटणे : सद़्गुरुकाकांमध्ये ‘साधकांचे कल्याण व्हावे’, ही तळमळ पुष्कळ आहे. त्यामुळे ते जेवत असतांनाही कुणी त्यांना आध्यात्मिक उपाय विचारले, तर ते देहभान विसरून तत्परतेने नामजपादी आध्यात्मिक उपाय शोधून देतात. त्यामुळे ते सनातन संस्थेचे ‘उपाय गुरु’ असून सर्व साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
४ ई. मनाची बाल्यावस्था आणि बुद्धीची महाप्रज्ञा : त्यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांचे मन बाल्यावस्थेत आहे आणि बुद्धी महाप्रज्ञा अवस्थेत आहे. मनाची बाल्यावस्था आणि बुद्धीची महाप्रज्ञा हे दोन्ही विरोधी गुण त्यांच्यामध्ये एकवटले आहेत.
४ उ. बालकभाव आणि निरागसभाव : त्यांच्यात बालकभाव आणि निरागसभाव आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा लहान मुलांसारखा निरागस दिसतो आणि त्यांचे हास्य निखळ आहे. त्यामुळे त्यांचे दर्शन झाल्यावर आनंदाची अनुभूती येते. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही ते पुष्कळ आवडतात. त्यांच्यातील बालकभावामुळे ते लहान मुलांशी लहान होऊन खेळतात.
४ ऊ. अहंशून्यावस्था : ते अतिशय विनम्र असून अहंशून्य अवस्थेत असतात. त्यांच्याकडे पाहून अहंचा लवलेशही जाणवत नाही. अशी अहंशून्यावस्था केवळ भगवंताच्या परम भक्तांना प्राप्त होते.
४ ए. विदेही अवस्था : सद़्गुरुकाकांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे ते विदेही अवस्थेत आहेत. अशी विदेही अवस्था केवळ महातपस्वी आणि महायोगी यांना प्राप्त होते.
५. विविध प्रकारचे दैवी बळ असणे
सद़्गुरु गाडगीळकाकांमध्ये पुढील प्रकारची दैवी बळे कार्यरत आहेत. त्यामुळे साधकांना त्यांच्या संदर्भात विविध प्रकारच्या अनुभूती येतात.
५ अ. योगबळ : सद़्गुरुकाका ऋषींप्रमाणे योगसाधना करत असल्यामुळे त्यांची कुंडलिनीशक्ती जागृत झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऋषींप्रमाणे योगबळ कार्यरत झालेले आहे. ते जेव्हा झोपतात, तेव्हा ते योगनिद्रेत असतात. ते या योगबळाच्या साहाय्याने अंतराळात कोणत्याही ग्रहावर किंवा ब्रह्मांडातील कोणत्याही लोकात जाऊ शकतात. २३.८.२०२३ या दिवशी भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरले. त्या वेळी सद़्गुरुकाका ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरण्याच्या ७ मिनिटे आधीपासून त्याचा चंद्राच्या जवळ येत असतांनाचा प्रवास पहात होते. त्या वेळी त्यांनी ‘त्याच्या प्रवासात काही अडथळा आहे का ?’, हे सूक्ष्मातून पाहिले; पण त्यांना कोणताच अडथळा जाणवला नाही आणि लँडरही चंद्रावर व्यवस्थित उतरला.
५ आ. तपोबळ : सद़्गुरुकाकांचे जीवन ऋषींच्या जीवनाप्रमाणे तपोमय झालेले आहे. त्यांची साधना चित्ताच्या स्तरावर चालू असल्यामुळे त्यांचे जीवन, म्हणजे एक प्रकारची तपस्याच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ऋषींप्रमाणे पुष्कळ तपोबळ आहे. या तपोबळाच्या साहाय्याने ते दैवी शक्तींना सूक्ष्मातून साहाय्य करून मोठ्या वाईट शक्तींशी सहजरित्या लढू शकतात. त्यामुळेच साधकांच्या साधनेतील अडथळे असो किंवा समष्टी कार्यातील विघ्न असो, सद़्गुरु काकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्यांच्या तपोबळाच्या सामर्थ्याने त्यांनी उपाय करण्यासाठी केलेला संकल्प सिद्ध होऊन साधकांच्या साधनेतील अडथळे किंवा हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या समष्टी कार्यातील अडथळे सहजरित्या दूर होतात. यालाच आध्यात्मिक परिभाषेत ‘तपोबळाच्या आधारे संकल्प सिद्धीस नेणे’, असे म्हणतात.
५ इ. ज्ञानबळ : सद़्गुरुकाकांनी अनेक जन्मांमध्ये केलेल्या साधनेमुळे त्यांचे ज्ञानचक्षू उघडले आहेत. त्यामुळे ते संपूर्ण विश्व ज्ञानचक्षूंनी पाहून त्यातील ब्रह्मत्वाची अनुभूती घेतात. याच ज्ञानचक्षूंमुळे त्यांनी ज्ञानबळ प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांना अध्यात्मातील अनेक अंगांचे आणि सूक्ष्मातील अनेक पैलूंचे सूक्ष्म ज्ञान लीलया अवगत होते, उदा. विविध पाताळांतील मोठ्या वाईट शक्तींची युद्धनीती, विविध लोकांतील वायूमंडलाचे वैशिष्ट्य, विविध व्यक्तींच्या मागील जन्मांतील कर्मे आणि त्यांचे फळ इत्यादींचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानबळामुळे त्यांना काळाचा पडदा ओलांडून भविष्यात घडणार्या अनेक स्थूल आणि सूक्ष्म घटनांचेही अचूक ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे ते एक द्रष्टे संत आहेत.
५ ई. धर्मबळ : सद़्गुरुकाकांचे प्रत्येक कर्म धर्माला अनुसरून असते. ते धर्मशास्त्राचे काटेकोरपणे पालन करतात. ते मागील अनेक जन्मांमध्ये धर्मशास्त्राचे प्रकांड पंडित असून धर्मवेत्ते होते. त्यामुळे त्यांच्याकडे पुष्कळ धर्मबळ आहे. या धर्मबळावरच ते धर्माचरण करून साधकांना सूक्ष्मातून त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तींशी लढून त्यांना पराभूत करू शकतात.
५ उ. कर्मबळ : सद़्गुरुकाकांचे प्रत्येक कर्म अचूक, परिपूर्ण आणि भावपूर्ण आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहिले, तर भगवंताच्या ‘सत्यं शिवं सुन्दरम् । या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडते. त्यामुळे त्यांनी पुष्कळ प्रमाणात कर्मबळ प्राप्त केले आहे. या कर्मबळामुळे त्यांनी हाती घेतलेले कोणतेही कर्म अपूर्ण न रहाता ते वेळेत पूर्ण होते.
५ ऊ. भक्तीबळ : ते शिव आणि श्री गणेश यांचे भक्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये भक्तीबळ आहे. भक्तीबळामुळे त्यांच्याकडे दैवी शक्ती आकृष्ट होऊन ती समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत होते.
५ ए. पुण्यबळ : ते सदाचारी असल्यामुळे त्यांनी पुष्कळ पुण्यबळ प्राप्त केले आहे. या पुण्यबळामुळे त्यांच्याकडे सकारात्मक ऊर्जा आकृष्ट होऊन ती समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत होते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३ सायंकाळी ४.३० ते ५.०५)
(क्रमशः)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |