अष्टविनायकाची ‘अद्भुत यात्रा’ ! : Ganesh
१. थेऊर (जिल्हा पुणे)
पुणे शहरापासून जवळपास २२ कि.मी. अंतरावर थेऊर येथे अष्टविनायकातील ‘श्री चिंतामणी’ गणेशस्थान आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू आणि उजव्या सोंडेची आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धि प्राप्त केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांची ‘श्री चिंतामणी’वर अलोट भक्ती होती. प्रशस्त सभामंडप असलेले हे मंदिर पुष्कळ सुंदर आहे.
२. ओझर (जिल्हा पुणे)
ओझर येथील ‘विघ्नेश्वर’ ही गणेशमूर्ती स्वयंभू आणि डाव्या सोंडेची आहे. मंदिरात ३ सभामंडप आणि दीपमाळ आहे. चिमाजीअप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. पुण्यापासून ओझर हे ८५ कि.मी. अंतरावर आहे.
३. रांजणगाव (जिल्हा पुणे)
रांजणगावच्या गणेशाला ‘श्री महागणपति’ असे म्हणतात. हे मंदिर पुणे-नगर रस्त्यावर आहे. हे मंदिर इंदूरचे सरदार किबे आणि श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधले.
४. मोरगाव (जिल्हा पुणे)
पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील अष्टविनायकाला ‘मोरेश्वर’ किंवा ‘मयुरेश्वर’ म्हणतात. या गणेशमूर्तीची सोंड डावीकडे आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांना ही गणेशमूर्ती कऱ्हा नदीत सापडली होती.
५. लेण्याद्री (जिल्हा पुणे)
अष्टविनायकातील ‘गिरिजात्मक’ हे गणेशस्थान पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यापासून हे स्थान ९७ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या परिसरात आहे. हे गणेशस्थान बौद्धकालीन गुंफेमध्ये वसलेले आहे. तेथे जाण्यासाठी २८३ पायऱ्या चढून जावे लागते.
६. पाली (जिल्हा रायगड)
रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पालीचा ‘बल्लाळेश्वर’ हा अष्टविनायकातील गणपति वसलेला आहे. ही गणेशमूर्ती डाव्या सोंडेची आणि स्वयंभू आहे. हा गणपती ‘धुंडी विनायक’ म्हणून ओळखला जातो. कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या घोर उपासनेतून हा गणपती प्रकट झाला; म्हणून यास ‘बल्लाळेश्वर’ हे नाव पडले.
७. महड (जिल्हा रायगड)
रायगड जिल्ह्यातील महड या ठिकाणी असलेला अष्टविनायकातील ‘वरदविनायक’ श्री गणेश खोपोलीपासून २ कि.मी. अंतरावर आहे. पौडकर नावाच्या गणेशभक्तास ही मूर्ती मंदिराजवळच्या तळ्यात अनुमाने ३०० वर्षांपूर्वी सापडली. या स्थानाला ‘मढ’ असेही म्हणतात. वर्ष १७२५ मध्ये बिवलकर या गणेशभक्ताने मंदिराची निर्मिती केली.
८. सिद्धटेक (जिल्हा अहिल्यानगर)
सिद्धटेक श्री गणेश हा ‘सिद्धिविनायक’ या नावाने ओळखला जातो. हे पवित्र स्थळ अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. या देवालयाचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. ही स्वयंभू गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. या मंदिराच्या जवळ भीमा नदी आहे.’
– श्री. प्रशांत अ. पाटकर (साभार : ‘श्री गजानन आशिष’, मार्च २०१७)
(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)