संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते. त्यांच्या कार्याचा जनमानसावर प्रभाव पडलेला असतो. अशी विचारांच्या कार्याची उंची गाठलेल्या आदर्श पुरुषांचे वर्णन वाङ्मयात चित्रित झालेले असते किंवा प्रतिबिंबित झालेले असते. असे वाङ्मय अनेकानेक भावी पिढ्यांना स्फूर्ती आणि मार्गदर्शन देत असते. श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारी पुरुषांनी अखिल ब्रह्मांडाला आकर्षित केले आहे. युगे उलटली, तरीसुद्धा त्यांचा प्रभाव आजही जनमानसावर तसाच अढळ राहिला आहे. याचे कारण, म्हणजे श्रीरामांची वाङ्मयीन मूर्ती वाल्मीकि ऋषींनी आपल्या दिव्य प्रतिभेने शब्दबद्ध केली. त्याचप्रमाणे महर्षि व्यासांनी श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती जनसागरासमोर ठेवली. या दोघांचे साहित्य अनन्यसाधारण आहे. उत्कृष्ट कर्तृत्व आणि विचार साहित्यात चिरंतन होतात. अशा साहित्याला संस्कृतीची मूर्ती मानण्यात आले. त्याचे उत्तम उदाहरण, म्हणजे रामायण आणि महाभारत हे ग्रंथ !

संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी निर्मिलेली गणेशाची वाङ्मयीन षड्भूज मूर्ती आणि मनोहारी रूप

सनातन – निर्मित श्री गणेशाचे सात्त्विक चित्र

संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी निर्मिलेली गणेशाची वाङ्मयीन मूर्ती षड्भूज आहे. सांप्रत काळात गणरायाची मूर्ती चतुर्भूज आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कांगडा जिल्ह्यात वैजनाथ नावाच्या गावात ६ भुजांचा गणपति संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माआधीपासून आहे. या ६ भुजांच्या गणरायाच्या एका हातात तर्काचा परशु आहे. या तर्करूपी परशुने कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ तुकडे करता येतात. दुसऱ्या हातात नीतीचा अंकुश आहे. ‘आपण पथभ्रष्ट होऊ नये आणि आपण सातत्याने सन्मार्गानेच वाटचाल करत राहावी’, यांसाठी गणरायाच्या हातात अंकुश आहे. गणरायाच्या तिसऱ्या हातात रसमय मोदक आहे. हा रसमय मोदक, म्हणजे वेदांत आहे. वेदांतामुळे आपले आत्मिक जीवन बलवान होते. गणरायाच्या चौथ्या हातात आधीच खंडित झालेला दात आहे. हा दात म्हणजे बौद्ध मताचे प्रतीक आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ‘भक्तीयोग’ सांगितला. त्यांची सौंदर्यदृष्टी अलौकिक आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

गणरायाच्या अन्य हातातील परशु आणि अंकुश मानवी जीवनामध्ये शिस्त बाणवतात. मानवाच्या जीवन ध्येयाच्या मार्गातील काटे साफ करून गणरायाने पाचव्या हाताने आशीर्वाद देऊन अभय दिले आहे. निर्भयतेवाचून काहीच साध्य करता येत नाही. अभय नसेल, तर धर्माला प्रतिष्ठा प्राप्त नाही आणि आनंदही मिळणार नाही. ‘मार्ग साफ केला, सुरक्षितता दिली, म्हणजे सर्व काही झाले’, असा त्याचा अर्थ होत नाही. जीवन सौंदर्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली ही पूर्वसिद्धता आहे. जीवनाला सुदृढता आणि सौंदर्य प्राप्त झाले  पाहिजे; म्हणून गणपतीच्या सहाव्या हातात सौंदर्याचे प्रतीक म्हणून कमळ देण्यात आले आहे.

गणरायाच्या हातातील शुभ्र दात समतेचे प्रतिक आहे. भगवंत सर्व जीवसृष्टीकडे सारख्याच ममतेने पाहतो. ‘हा शुभ्र दात, म्हणजे संवाद आहे’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या मागचे कारण असे की, आनंददायी यात्रेकरूचा सुसंवाद हाच जीवाभावाचा सखा आहे. सुसंवादरूपी सखा नसेल, तर आनंदाला तडा जातो.

गणरायाचे व्यक्तीमत्त्व जे खुलले आहे ते त्याच्या सोंडेमुळे ! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘‘श्री गजाननाच्या मूर्तीचे सौंदर्य त्याच्या शुंडादंडात आहे.’’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी गणरायाच्या शुंडादंडाला ‘महासुखाचा परमानंद’, असे म्हटले आहे. तो विवेकवंत आणि सुविमल आहे. विवेकामुळे जीवनाचा मार्ग स्वच्छ करता येतो. सोंडेने हत्ती हेच कार्य करतो. सुविमल असलेला विवेक कोणताही मनोगंड नाहीसा करू शकतो. तो अंधारातही मार्ग दाखवतो. त्यामुळे परमानंदाला कोणतीही मर्यादा रहात नाही.

गणरायाचे कान हे सुपासारखे आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गणरायाच्या या दोन कानांना ‘पूर्व आणि उत्तर मीमांसा’, असे संबोधले आहे. गणरायाचे गंडस्थळ द्वैत-अद्वैत यांचे प्रतिक आहे. मदोन्मत्त हत्तीच्या उत्तमांगातून मद पाझरत असतो. त्याचप्रमाणे गणरायाच्या मस्तकातून बोधामृत पाझरतो आहे. हा बोधामृत प्राशन करण्यासाठी ऋषीगण भुंग्यांच्या रूपात गणरायाच्या मस्तकावर झेपावत आहेत.

गणरायाच्या मस्तकावरचा मुकुट, म्हणजे १० उपनिषदांची सुगंधित फुले आहेत. या उपनिषदांना ‘भारतीय तत्त्वज्ञानाची गंगोत्री’ म्हणून गौरवले आहे. बुद्धीच्या पलीकडच्या प्रांतात मानवाला नेऊन प्रतिभेचा आनंद कसा असतो, याची प्रचिती उपनिषदांनी दिली आहे; कारण हे सारे वाङ्मय साक्षात्कारवादी असून यात कोणतेही कर्मकांड किंवा संकुचित विचार यांनी ते जखडलेले नाही. उपनिषदांतील तत्त्वज्ञानाची झेप विलोभनीय असून ती अधिक सुंदर आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

१. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गणरायाचे केलेले गुणवर्णन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनीही ‘ज्ञानेश्वरी’ या लोकोत्तर ग्रंथाचा आरंभ करण्यापूर्वी गणरायाची प्रतिष्ठापना केली. तीच ज्ञानोबारायांनी निर्माण केलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती होय. गणरायाचे वर्णन करतांना संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय म्हणतात, ‘‘वेद, गीता, पुराणे, षड्दर्शन हे गणरायाचे अवयव आहेत आणि तीच गणरायाची वस्त्रप्रावरणे आहेत. गणरायाच्या मस्तकावर १० उपनिषदांचा मुकुट चढवण्यात आला आहे. या सर्वांतून ॐ हा मंत्र लखलखत आहे.’’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी निर्मिलेली ही गणरायाची वाङ्मयीन मूर्ती, म्हणजे परकीय आक्रमकांकडून आणि आपल्याच देशातील दुष्टांकडून जे शतकानुशतके संस्कृतीवर तडाखे बसले, ते सर्व सहन करून आपली संस्कृती जिवंत अन् अविचल राहिली, त्याची साक्ष गणरायाच्या मुकुटावरचा लखलखणारा ‘ॐ’ मंत्र देत आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. रवींद्रनाथ ठाकूर यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वाङ्मय गणेशाचे केलेले वर्णन

रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात, ‘‘इतिहासाच्या मागील काळापासून एक अखंड धर्मप्रवाह आपल्या देशात वहात आला आहे. तो कधी क्षीण झाल्यासारखा वाटतो, तर कधी तो जरा विस्तृत होऊन त्याचे सरोवर बनते. अशाच सरोवरांना आपण मनु, याज्ञवल्क्य, शंकराचार्य अशी नावे देतो. हिंदुस्थानचा इतिहास हा राजांच्या राजवटीचा नसून आध्यात्मिक आंदोलनाचा आहे. याचे दीक्षा ग्रंथ आपल्याला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या वाङ्मय गणेशात दिसतात.”

३. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी पुराणांमधील रचनापद्धतींविषयी केलेले वर्णन

सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणपतीच असून ‘स्मृति ग्रंथ’ हे गणरायाचे अवयव आहेत. १८ पुराणे, म्हणजे गणरायाच्या देहावरचे अलंकार आहेत. या १८ पुराणांमधील रचनापद्धतींविषयी वर्णन करतांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘‘गजाननाच्या अंगावर असलेले सोन्यामोत्यांचे अलंकार हे १८ पुराणांचे आहेत. या दागिन्यांत जडावाचे कलाकुसरीचे पुष्कळच कसब दाखवले आहे.’’

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांचीं ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी ५

अर्थ : १८ पुराणे हेच गणेशाच्या शरिरावरील रत्नालंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्त्वे ही रत्ने आणि छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत.

पुराणांमध्ये मार्गदर्शक असलेली अशी काही अगणिती सूत्रे, सिद्धांत आणि सुभाषिते गुंफलेली आहेत. याला शब्दांची सुंदर कोंदणे असली, म्हणजे त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘कोंदणे’ असा शब्द योजला नसून त्यांनी कोंदणे या शब्दासाठी ‘खेवणें’ असा सुंदर शब्द योजला आहे. ‘कोंदणे’ हा शब्द तसा कठोर शब्द आहे. त्या शब्दाच्या तुलनेत खेवणें हा शब्द अत्यंत मृदू आहे. हिरा कोंदणात अधिक शोभून दिसतो. हिऱ्याचे कोंदण त्याचे संरक्षण करते. त्याप्रमाणे पुराणांमधील अनेक अगणिती सूत्रे, सिद्धांत यांना विविध भाषालंकारांनी आपल्या कवेत घेऊन त्यांचे सौंदर्य अधिक खुलवले आहे. हा भाव व्यक्त करण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी ‘खेंवणें’ हा शब्द कल्पकतेने योजला आहे. लहान बाळांना आपण अत्यंत हळूवारपणे आपल्या कवेत घेतो. त्याप्रमाणे सिद्धांत आणि सुभाषित यांना काव्यरचनेने हळूवारपणे आलिंगन दिले, हळूवारपणे कवेत घेतले आहे.

४. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले वाङ्मयाच्या रसग्रहणाचे तंत्र

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज गणरायाची वाङ्मयीन मूर्ती घडवत असतांना वाङ्मयाच्या रसग्रहणाचे तंत्र समजावून सांगत आहेत. शेतकरी आपल्या शेतभूमीत ज्या वेळी मुख्य पीक काढत असतो, त्या वेळी त्या पिकाला पाणी देतो. त्या पिकाला पाणी देत असतांनाच त्याच्या जोडीने इतर अनेक उपयुक्त वनस्पतींचे पोषण सहजतेने होत असते. त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज साहित्याचे वर्णन करत असतांना समतोल जीवनाचा आदर्श आपल्याला स्पष्ट करून सांगतात.

५. महर्षि व्यासादिकांच्या प्रतिभा हीच मेखला !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…

तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरविती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी ९

अर्थ : येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कुणी (गणपतीच्या) कमरेला बांधलेला शेला शोभत आहे आणि त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत.

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. दक्षिण हिंदुस्थानातील एका विद्वानाने महाभारताला ‘मानवाचा कायमचा इतिहास’ म्हणून संबोधले आहे. ‘जे महाभारतात नाही ते कुठेही नाही’, हे तर जगप्रसिद्ध वचन आहे. महर्षि व्यासांची प्रतिभा अशी विलक्षण आहे की, ती शब्दब्रह्माच्या महासागराचे मंथन करून त्यातून तत्त्वज्ञानाचे नवनीत काढते. सूर्याचा उदय झाल्यानंतर त्याच्या तेजस्वी किरणांनी संपूर्ण त्रैलोक्याचा कोपरानकोपरा उजळून जातो. तद्वत महर्षि व्यासांच्या बुद्धीने संपूर्ण त्रैलोक्यालाच कवेत घेतले आहे. अशी महर्षि व्यासांची प्रशंसा संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी केली आहे. हे लक्षात घेतले, म्हणजे ‘गणरायाची वाङ्मयीन मूर्ती रेखाटतांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासमतीला गणेशाची मेखला का म्हटले आहे ?’, याचा बोध होईल.

६. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी वर्णिलेले गणराय

गणरायाची ही दैदीप्यमान मूर्ती ॐ कारात दडलेली आहे. गणराय ॐ कारातूनच प्रकट झाला आहे. म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात,

ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।

अर्थ : ॐकारच ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवतांचे उगमस्थान आहे.

७. गणेशोत्सव काळात मानसिक, बौद्धीक, आत्मिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे !

अशा या गणरायाचे आगमन होत आहे. गणराय ही ज्ञान आणि विज्ञान यांची देवता आहे. म्हणूनच ‘अथर्वशीर्षा’त गणरायाला ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।’ म्हणजे ‘तू ज्ञान आणि विज्ञानाची देवता आहेस’, असे म्हटले आहे. या गणरायाचे भक्ती भावनेने स्वागत करून आपली मानसिक, बौद्धीक, आत्मिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी हा पर्वकाळ अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘गणरायाने ज्ञानदीपाने सर्व गणेश भक्तांचे नैराश्य नष्ट करावे’, ही त्याच्या चरणी प्रार्थना आणि कामना !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१३.९.२०२३)

(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)