हिंदी महासागरातील चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील !

  • वर्ष २०३५ पर्यंत युद्धानौकांची संख्या १७५ करणार

  • चीनकडे सध्या ३५५ युद्धनौका आणि पाणबुड्या

नवी देहली – भारतीय नौदल त्याची शक्ती वेगाने वाढवत आहे. नवीन ६८ युद्धनौका खरेदी करण्याची मागणी देण्यात आली आहे. यासाठी २ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यामागे हिंदी महासागरातील चीनचे वाढते आव्हान कारणीभूत आहे. त्यासाठी वर्ष २०३५ पर्यंत भारत त्याच्या युद्धनौकांची संख्या १७५ करण्याचा प्रयत्न करत असून लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर यांचीही संख्या वाढवण्यात येणार आहे.

१. नौदलाकडे सध्या १४३ विमाने, १३० हेलिकॉप्टर आणि १३२ युद्धनौका आहेत. आता नवीन पिढीच्या युद्धनौका, पाणबुड्या, तसेच अन्य नौका खरेदी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

२. चीन सध्या हिंदी महासागरात त्याचा नौदल तळ बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्याने आफ्रिकेतील जिबूती, पाकचे कराची आणि ग्वादर, तसेच कंबोडिया येथील मरी पोर्ट येथे तळ निर्माण करत आहे. सध्या चीनकडे जगातील सर्वांत मोठे नौदल आहे. त्याच्याकडे ३५५ युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. यांत तो वेगाने वाढही करत आहे. गेल्या १० वर्षांत चीनने १५० नवीन युद्धनौका वाढवल्या आहेत. चीन पुढील ५-६ वर्षांत युद्धानौकांची संख्या ५५५ करण्याच्या सिद्धतेत आहे.