‘टोईंग’ केलेली वाहने सोडवतांना दंडाची भीती दाखवून पोलीस पैसे उकळतात !
मुंबईतील वाहनतळाच्या समस्येतून वाहतूक पोलिसांची वरकमाई !
(‘टोईंग’ करणे म्हणजे वाहने उभी करण्याच्या क्षेत्रात नसलेली गाडी प्रशासनाकडून उचलून नेणे)
मुंबई, १७ सप्टेंबर (वार्ता.) – गाडी उभी करणे ही मुंबईत मोठी समस्या झाली आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी ‘पार्किंग झोन’मध्ये (वाहने उभी करण्याची जागा) नसलेल्या दुचाकी वाहतूक पोलीस त्वरित उचलून नेतात, तर मोठी वाहने जागीच ‘लॉक’ करतात. वाहतूक पोलिसांच्या या कारवायांमुळे शहरामध्ये वाहतूक व्यवस्था राखणे शक्य आहे; परंतु कारवाई केलेली ही वाहने सोडवण्यासाठी (टोईंग केलेली वाहने) जाणार्या नागरिकांना दंडाची भीती दाखवून वाहतूक पोलीस नागरिकांची लूटमार करत आहेत.
वडाळा येथील कु. आसावरी परब या युवतीने ३१ ऑगस्ट या दिवशी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेर श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाजूच्या रस्त्यावर वाहने उभी करण्याच्या क्षेत्रात दुचाकी लावली होती. गाडीचा काही भाग या क्षेत्राच्या बाहेर आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी उचलून शीव येथील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी नेली. या ठिकाणी जाऊन कु. आसावरी परब यांनी दंडाची रक्कम भरून त्यांनी गाडी सोडवून आणली; मात्र दंड अधिक असल्याची भीती दाखवून वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे उकळले.
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना कु. आसावरी परब म्हणाल्या, ‘‘गाडी सोडवण्यासाठी १ सहस्र ७०० रुपये इतका दंड सांगण्यात आला. त्यामध्ये त्यांच्या गाडीची ‘पीयुसी’ (प्रदूषण नियंत्रणात असल्याचे प्रमाणपत्र) संपल्याच्या दंडाचाही समावेश होता. या वेळी पोलिसांनी इतका दंड भरायचा नसल्यास १ सहस्र रुपये देण्यास सांगितले आणि पावती केवळ ७०० रुपयांची दिली. यामध्ये ३०० रुपये पोलिसाने स्वत:कडे ठेवले.’’
मुंबईत नियमित सहस्रावधी वाहने ‘टोईंग’ केली जातात. त्यामुळे यामध्ये मुंबईत अशा प्रकारे कुठे कुठे दंडाची भिती दाखवून वाहतूक पोलीस नागरिकांची लुटमार करत आहेत ? याचा शोध वाहतूक विभागाने घेऊन अशा भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.