मराठवाड्याला ‘मागास’ शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे ! – मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा मुक्तीसंग्रामाला १७ सप्टेंबर या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. म्हणजेच ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामा’चा आज ‘अमृत महोत्सव’ दिवस आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. मराठवाड्याला ‘मागास’ या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे. मराठवाडा समृद्ध व्हावा, अशी आपण प्रतिज्ञा करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
#VIDEO | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन pic.twitter.com/k7dE0GyJHB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2023
सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचे नामकरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. श्रावण मासात जन्मलेल्या मादी बछड्याचे नाव ‘श्रावणी’ ठेवण्यात आले, तर इतर २ बछड्यांची नावे अनुक्रमे विक्रम आणि कान्हा अशी ठेवण्यात आली.
मराठवाड्याच्या भूमीला समृद्ध करू !
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा. अनेक ध्येयवादी स्वातंत्र्यसैनिकांच्या अमूल्य बलीदानातून आणि जनतेच्या सक्रीय पाठिंब्यातून मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मराठवाड्याचा भूमीला समृद्ध करण्यासाठी आपण सदैव वचनबद्ध राहू. पावसाअभावी ज्या शेतकर्यांची हानी झाली, त्यांना आम्ही वार्यावर सोडणार नाही. शेतकर्यांना सर्वतोपरी साहाय्य करू.