पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने राज्‍यात ११ कलमी कार्यक्रम राबवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

संग्रहित चित्र

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ७३ व्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने राज्‍यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवण्‍यात येणार आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांना दिली.

यामध्‍ये महिला सशक्‍तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ, नमो कामगार कल्‍याण अभियानातून ७३ सहस्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, नमो शेततळी अभियानातून ७३ सहस्र शेततळ्‍यांची उभारणी, नमो आत्‍मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान यातून ७३ सहस्र गावे आत्‍मनिर्भर करणे, नमो गरीब अन् मागासवर्गीय सन्‍मान अभियानातून वस्‍त्‍यांचा विकास, नमो ग्रामसचिवालय अभियानातून प्रत्‍येक जिल्‍ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी, नमो आदिवासी स्‍मार्ट शाळा अभियानातून स्‍मार्ट शाळांची उभारणी, नमो दिव्‍यांग शक्‍ती अभियानातून दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र उभारणी, नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियानातून सुसज्‍ज क्रीडा मैदाने आणि उद्याने यांची उभारणी, नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून ७३ शहरांमध्‍ये सौंदर्यीकरण प्रकल्‍प राबवणे, नमो तीर्थस्‍थळ आणि गडदुर्ग संरक्षण अभियानातून ७३ पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्‍थळांची सुधारणा आदी कार्यक्रम या अभियानातून राज्‍यात राबवण्‍यात येणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.