साधना चालू केल्यावर साधिकेमध्ये झालेला पालट आणि तिला आलेली अनुभूती !
१. कोरोनामुळे दळणवळण बंदी लागू झाल्यावर आई-वडिलांचे साधनेचे प्रयत्न पाहून व्यष्टी साधना करू लागणे
‘लग्नाआधी मी साधना करत नव्हते. ‘साधना म्हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्हते. लग्न झाल्यावर आम्ही दोघेही (मी आणि माझे यजमान) नोकरी करत असल्याने घरी अल्प वेळ देऊ शकत होतो. त्यामुळे आम्ही साधनेला आरंभ केला नव्हता. भारतात पहिल्यांदा कोरोनाची साथ आल्यावर आणि दळणवळण बंदी लागू झाल्यावर आई-वडिलांचे साधनेचे प्रयत्न पाहून आम्ही हळूहळू व्यष्टी साधना शिकायला लागलो.
२. भावनाशीलतेमुळे मानसिक त्रास होणे, पूर्वग्रह निर्माण होऊन निराशा येणे आणि व्यष्टी साधना चालू केल्यावर प्रसंगांमध्ये स्थिर रहाता येणे
लग्नाआधी आणि लग्न झाल्यावर पहिली २ वर्षे माझ्यामध्ये ‘भावनाशीलता’ हा तीव्र स्वभावदोष होता. मी बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेत असे आणि त्यामुळे मला मानसिक त्रास होत असे. बराच वेळ मी त्याच विचारांमध्ये रहायचे आणि निराश व्हायचे. माझ्या मनामध्ये इतरांबद्दल पूर्वग्रह रहायचा. कधी कधी मला पुष्कळ रडायला यायचे. व्यष्टी साधनेला आरंभ झाल्यावर मला हळूहळू बाहेरील परिस्थिती आणि प्रसंग यांचा त्रास होण्याचे प्रमाण अल्प झाले. परिस्थिती स्वीकारून मला प्रसंगांमध्ये स्थिर रहाता येऊ लागले. माझ्या मनामध्ये कुणाविषयी फार वेळ पूर्वग्रह टिकत नाही.
३. घरातील सर्वांना कोरोना होऊनही गुरुदेवांच्या कृपेने ७ मासांच्या मुलीचे रक्षण होणे
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वेळी माझी मुलगी चि. ध्रुवी ७ मासांची होती. यजमान आणि त्यांचे आई-वडील यांना एकाच वेळी कोरोना झाला अन् ते तिघेही अलगीकरणात (क्वारंटाईन) राहिले. तेव्हा आमच्या पुण्यातल्या घरामध्ये मी आणि ७ मासांची ध्रुवी, असे दोघेच रहात होतो. आरंभी ‘ध्रुवीला कोरोना झाला, तर काय करणार ?’, याची मला काळजी होती. तेव्हा मी सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणावर मस्तक ठेवून सतत प्रार्थना करायचे, ‘तुम्हीच तिचे रक्षण करा आणि तुम्हीच तिला खेळवा.’ देवाच्या कृपेने ‘ते १५ दिवस कसे निघून गेले ?’, हे कळलेच नाही. यजमान आणि त्यांचे आई-वडील यांचा अलगीकरणाचा कालावधी संपल्यावर ते परत आले अन् मला कोरोना झाला. ध्रुवीला सांभाळायला आणि तिची काळजी घ्यायला देवाने सतत कुणाला तरी तिच्या जवळ ठेवले. ‘घरामध्ये सर्वांना कोरोना होऊनही देवाने ध्रुवीची कशी काळजी घेतली ?’, हे यातून माझ्या लक्षात आले. श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. तेजल शहा, पुणे (१९.३.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |