असे संशोधन करतांना ते स्वतःच्या मनाने करण्यापेक्षा त्यातील जाणकारांना विचारून, तसेच त्यांचे मार्गदर्शन घेऊन करणे श्रेयस्कर !
१. व्यक्तीने स्वतःच्या ऊर्जेशी जुळणारी श्री गणेशमूर्ती आणण्यापेक्षा ज्या मूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे, ती निवडणे श्रेयस्कर !
‘एका जिल्ह्यातील एका वाचकांनी श्री गणेशचतुर्थीला करण्यात येणार्या ‘सिद्धिविनायक व्रता’साठी श्री गणेशमूर्तीची निवड कशी करावी ?’, या संदर्भात एका उपकरणाद्वारे संशोधन केले होते. या संशोधनाच्या आधारे त्यांनी सांगितले की, ‘प्रथमदर्शनी पसंत पडलेल्या मूर्तींपैकी ज्या श्री गणेशमूर्तीची ऊर्जा माझ्या ऊर्जेशी (यजमानाच्या ऊर्जेशी) सर्वाधिक प्रमाणात जुळते, ती मूर्ती मी घरी आणतो.’
येथे लक्षात घ्यावयाचे सूत्र, म्हणजे अशा प्रकारे स्वतःच्या ऊर्जेशी जुळणारी श्री गणेशमूर्ती घरी आणणे अयोग्य आहे. यापेक्षा ज्या श्री गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे, ती मूर्ती घरी आणणे योग्य आहे. याचे कारण हे की, आजकाल बहुतांश लोकांना अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास असतोच. तसेच बहुतांश लोक साधना करणारे नसतात. त्यामुळे प्रथमदर्शनी डोळ्यांना पाहून जे पसंत पडेल ते सात्त्विक असेलच असे नाही. तसेच व्यक्तीने स्वतःच्या ऊर्जेशी जुळणारी मूर्ती घेण्यापेक्षा ज्या मूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे, ती निवडणे श्रेयस्कर आहे. सात्त्विक गणेशमूर्तीमध्ये मुळातच चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे अशा मूर्तीचे भावपूर्ण पूजन केल्यावर तिच्यामध्ये अधिक प्रमाणात श्री गणेशतत्त्व आकृष्ट होते. त्यामुळे पूजक, घरातील कुटुंबीय आणि वास्तू यांनाही या चैतन्याचा अधिकाधिक लाभ होतो.
२. असे संशोधन करणार्या वाचकांनी ‘माझे परीक्षण योग्य आहे का ?’, हे जाणकार व्यक्तीला विचारणे आवश्यक !
या वाचकांनी प्रमुख देवस्थानांच्या संदर्भातही एका उपकरणाद्वारे संशोधन केले आहे. या संशोधनाच्या आधारे त्यांनी निष्कर्ष काढला आहे, ‘कोणत्याही गणपति देवस्थानामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.’ त्यांचे हे परीक्षण चुकीचे आहे. असे परीक्षण करणारे ‘माझे परीक्षण योग्य आहे का ?’, हे जाणकार व्यक्तीला विचारत नाहीत. प्रत्यक्षात देवतांच्या मूर्ती आणि देवस्थाने हे चैतन्याचा स्रोत आहेत. देवतांचे दर्शन घेणार्या भक्तांना या चैतन्याची नित्य अनुभूती येते. त्यामुळे देवतांच्या मूर्ती आणि देवस्थाने यांचे पावित्र्य टिकवणे अन् त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |