स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना दिलेले प्रसादरूपी वरदान !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी व्यक्तीच्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे. या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निमूर्लनाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनाचे शुद्धीकरण होणे महत्त्वाचे असल्याने स्वभावदोष आणि अहं दूर करणे अत्यंत आवश्यक असते. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व मनावर बिंबण्यासाठी सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. अनेक आध्यात्मिक संस्थांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे, या साधनेविषयी ठाऊक नसणे
‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) साधकांना दिलेले प्रसादरूपी वरदान आहे. पुष्कळ आध्यात्मिक संस्था आपापल्या विचारधारांसह आणि गुरूंनी सांगितलेल्या साधनामार्गावरून साधनेचा प्रयत्न करत असतात. यातील अधिकतर भक्तीमार्गाने साधनेचे प्रयत्न करून पुढच्या टप्प्याला जाण्याचा प्रयत्न करतात. ‘आपल्या साधनेत आपण कोणत्या टप्प्याला पोचलो आहोत ?’, हे त्यांच्या साधकांना समजत नाही. एवढेच नव्हे, तर संस्थाही ‘साधकांची साधना कशी होत आहे ?’ याविषयी त्यांच्या मागे लागून पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी करायच्या प्रयत्नांत अल्प पडत असल्याचे दिसून येते. अनेक संस्थांना ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ या साधना मार्गाविषयी माहिती अत्यंत अल्प असून त्याविषयी ते आश्चर्य व्यक्त करतात.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प आणि मार्गदर्शन यांमुळे साधक साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात जात असणेे
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प आणि मार्गदर्शन यांमुळे साधक साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात जात आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे नामस्मरण, सत्संग आणि सत्सेवा यांसह साधकांना गुरुदेवांनी उपलब्ध करून दिलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तेे प्रयत्नपूर्वक अंमलात आणतात.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेला प्राधान्य देणे
साधनेत आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचे असते. भगवंत स्वभावदोष आणि अहं विरहित आहे, तर ‘आपण आपले अनेक स्वभावदोष आणि अहं यांसह भगवंताशी एकरूप होणे शक्य आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. चित्तात इतके स्वभावदोष ठेवून आपण आनंदात कसे राहू शकू ? त्यासाठीच गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला प्रथम प्राधान्य दिले आहे.
४. साधकांनी ‘आपण साधनेत कुठे न्यून पडत आहोत ?’, याचा विचार करणे आवश्यक
साधक आपल्या साधनेत न्यून पडू नयेत; म्हणून गुरुदेव उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्याला साधकांचा आढावा घेऊन त्यांची प्रगती जाणून घेत आहेत. त्यामुळे साधक साधनेच्या पुढच्या टप्प्याला जाऊन आनंद अनुभवत आहेत. साधकांच्या प्रगतीविषयी गुरुदेवांची तळमळ साधकांपेक्षा अधिक आहे; म्हणून आपण साधकांनी ‘कुठे न्यून पडतो ?’ याविषयी विश्लेषण करून गुरुदेवांना आपल्या प्रगतीने आनंद दिला पाहिजे. अंतर्मन शुद्धीकरण हे मोक्षप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण आहे. हा स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून करायचा प्रयत्न आहे.
५. व्यष्टी साधना करतांना अंतर्मुखता महत्त्वाची असणे आणि त्यासाठी स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेचा पूर्ण लाभ घेणे आवश्यक
‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणी’ लिहिणे अन् त्यासाठी स्वयंसूचना देणे याविषयी आपल्यात गांभीर्य निर्माण होण्याची आवश्यकता आहे. सारणी लिहिणे, म्हणजे एक प्रकारे देवाशी अनुसंधानच असते. सारणीत जितक्या चुका लिहितो, त्यापेक्षा त्यामागील कारण समजून घेणे आवश्यक आहे. या संदर्भातही अंतर्मुख होणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसभर झालेल्या पुष्कळ चुका आपण विसरून जातो; म्हणून चूक झाल्यावर लगेच ती सारणीत लिहिण्याचा सराव केला पाहिजे. हे आपण गांभीर्याने केले पाहिजे; अन्यथा स्वभावदोषांसाठी स्वयंसूचना देण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. स्वभावदोष निर्मूलनासाठी सारणीलिखाण प्रथम टप्पा आणि पाया आहे. प्रत्येकाने या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे. गुरुदेवांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या या प्रक्रियेचा पूर्ण लाभ करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
६. स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचना अंतर्मनापर्यंत पोचणे महत्त्वाचे असणे
‘आपण आपल्या स्वभावदोषांसाठी देत असलेली स्वयंसूचना अंतर्मनापर्यंत जात आहे का ?’, याविषयी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपण दिवसभरात ८ ते १२ स्वयंसूचना देतो (साधकाच्या स्थितीनुसार स्वयंसूचनांची संख्या अवलंबून असते. जितक्या अधिक स्वयंसूचना घेऊ, तितका अधिक लाभ होतो.); परंतु ‘काही स्वभावदोष अजून अपेक्षित असे न्यून झाले नाहीत’, असे विचार साधकांमध्ये दिसून येतात. सूचना बाह्य मनातच राहिली, तर त्यामुळे अधिक लाभ होत नाही. आपले स्वभावदोष, संस्कार आणि अहं अंतर्मनात स्थित असल्याने त्यांना नष्ट करण्यासाठी सूचनाही अंतर्मनापर्यंत जाणे अत्यंत आवश्यक आहे. अंतर्मनापर्यंत सूचना पोचली नाही, तर स्वभावदोषांचे निर्मूलनही होत नाही. याकडे साधकांनी लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. ‘इतके प्रयत्न करूनही माझी प्रगती होत नाही’, असे नकारात्मक विचार येण्यास हे निमित्त होते. प्रत्येक स्वयंसूचना अंतर्मनापर्यंत गेल्यावर आपल्याला आनंदाची स्पंदने जाणवतात.
७. स्वभावदोष आणि अहं नष्ट होतील, तेव्हाच अंतर्मनातील गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव होऊन आत्मज्योतीचा प्रकाश दिसणे
गुरुदेवांनी समजावून सांगितल्याप्रमाणे अंतर्मनात असलेले स्वभावदोष, अहं, आवड-नावड, वासना इत्यादी आपण न्यून करत जाऊ, तेव्हाच अविद्येचे आवरण नष्ट होऊन आत्मचैतन्याची जाणीव होईल. अंतर्मनापर्यंत सूचना पोचली नाही, तर काहीच उपयोग होणार नाही. जेव्हा अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं नष्ट होतील, तेव्हाच लिंगदेहावर असलेले अविद्येचे आवरण नष्ट होऊन शुद्धीकरण झाल्यानंतरच गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि आत्मज्योतीचा प्रकाश दिसेल.
८. स्वयंसूचनेचे सत्र एकाग्रतेने केल्यास ते अंतर्मनापर्यंत पोचेल, हे निःसंशय ! त्यासाठी न्यूनतम ५ मिनिटे आधी जप करून स्वयंसूचना देण्यास प्रारंभ करावा.
९. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाल्यावर गुणसंवर्धन होण्यास साहाय्य होणे
स्वयंसूचना सकारात्मक आहे का ? स्वभावदोषांशी संबंधित प्रसंग योग्य रितीने नमूद केला आहे ना ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. सूचनेसह योग्य दृष्टीकोन दिल्यास तो अंतर्मनापर्यंत जाऊन स्वभावदोष निवारणात प्रभावी ठरतो. आवरण पुष्कळ असतांना सूचना दिल्यास अधिक उपयोग होत नाही; म्हणून आवरण काढूनच सूचना द्यावी. अंतर्मनात असलेले संस्कार बाह्यमनाला समजत नाहीत. त्यासाठी स्वयंसूचनाच दिली पाहिजे. बाह्यमन स्वीकारते; परंतु अंतर्मन स्वीकारू देत नाही. त्याचसाठी स्वयंसूचना अंतर्मनापर्यंत पोचेपर्यंत अधिकाधिक द्याव्यात. स्वयंसूचना चांगल्या झाल्यास मन शुद्ध आणि स्थिर होऊन आनंदाची अनुभूती घेते. स्वयंसूचना चित्ताचे शुद्धीकरण करते. शुद्धीकरण झालेल्या चित्तात गुरूंचा निवास असतो. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाल्यावर गुणसंवर्धन होण्यास साहाय्य होते. मनाला योग्य दृष्टीकोन मिळेपर्यंत ते अस्थिर आणि अस्वस्थ असते. बुद्धीने कितीही समजून घेतले, तरी स्वभावदोष जात नाहीत.
१०. आपल्यातील पालटासाठी इतर पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व
लहान-लहान चुकांसाठीही प्रायश्चित्त आणि शिक्षापद्धत यांचा अवलंब केल्यास अंतर्मनावर परिणाम होण्यास साहाय्य होते. सारणी लिखाण करणे, स्वयंसूचना देणे, क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि फलकावर चुका लिहिणे, ही स्थुलातील प्रक्रिया आहे. त्यामुळे आपला अहं जागृत होणार नाही, याकडे कटाक्षाने पाहिले पाहिजे. उपरोक्त सूत्रे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन साधनेचा प्राणवायू असून त्याचा सूक्ष्मातून परिणाम निश्चितच होतो.
साधकांनी समजून घेण्याचे सूत्र, म्हणजे जोपर्यंत आपल्या अंतर्मनातील संस्कारांचे निर्मूलन होणार नाही, तोपर्यंत आपल्याला मिळणार्या प्रत्येक जन्मात तोच लिंगदेह घेऊन आपण पुनःपुन्हा जन्म घेतो, हे विसरू नये.
११. जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया अत्यावश्यक असणे
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्यासाठीची पद्धत गुरुदेवांनी आपल्याला किती सुलभ रितीने समजावून सांगितली आहे. या प्रक्रियेचे यश म्हणजे सनातन संस्थेचे सहस्रो साधक गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेने ६० टक्क्यांहून अधिक सात्त्विकता मिळवून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत. शेकडो साधक हे संत, तसेच सद़्गुरु पदावर विराजमान झाले आहेत. हा सर्व गुरूंचा संकल्प आणि ते आमच्यासाठी अहोरात्र करत असलेल्या प्रयत्नांचे फळ आहे.
१२. सहसाधकांना ‘आहे तसे स्वीकारणे’ महत्त्वाचे असणे
गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे ‘मनाविरुद्ध जाणे’, हीच साधना आहे. त्यामुळे साधकांचा ‘दुसरेे जसे आहेत, तसा त्यांचा स्वीकार करून त्यांच्याशी सकारात्मक आणि प्रेमाने वागल्याने’ आपल्या अंतर्मनात असलेले कितीतरी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यास साहाय्य होते. ‘साधकांशी वागतांना, त्यांच्यासह सेवा करतांना आपल्या मनात त्यांच्याविषयी काय विचार येतात ?’ याचा विचार केला पाहिजे. बिंब-प्रतिबिंब न्यायाने साधकाचे विचार आणि कृती यांतून आपल्यावर त्यांचा परिणाम होतो. ते विचार नकारात्मक आहेत अथवा सकारात्मक आहेत, या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही कारणाने अयोग्य विचार अथवा प्रतिक्रिया आल्यावर आपल्या मनात अजून त्यांच्याविषयी योग्य स्पंदने येत नाहीत, हे जाणून आपण त्यांच्यासह अजून अधिकाधिक मिसळून आपली नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक स्पंदने सकारात्मक करून अंतर्मनात त्यांच्याविषयी असलेले संस्कार केंद्र नष्ट करावे.
१३. स्वेच्छेतून परेच्छेकडे आणि नंतर ईश्वरेच्छेकडे गेल्यावर अंतर्मनात असलेले अनेक संस्कार नष्ट होणे
गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे स्वेच्छेतून परेच्छेकडे आणि नंतर ईश्वरेच्छेकडे गेल्यावर आपल्या अंतर्मनात असलेले अनेक संस्कार नष्ट होतील. त्यामुळे ‘प्रत्येक साधकाकडे पहातांना आपल्यात सकारात्मक स्पंदने आल्यास आपल्या अंतर्मनातील पुष्कळ केंद्रे नष्ट झाली आहेत’, असे समजू शकतो. अंतर्मनात गुरुदेवांचे सान्निध्य असल्यावर गुरुदेवांना आपला प्रत्येक आचार-विचार, प्रसंग, बोलणे, वागणे इत्यादी लगेच समजते.
१४. अंतर्मनाचे शुद्धीकरण होऊन मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांचे आपोआप शुद्धीकरण होणे
प्रत्येक साधक आणि आपल्या जीवनात घडणारे प्रसंग आपल्या प्रगतीसाठी गुरुदेवांनी दिलेला प्रसादच आहे. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन झाल्यावर अंतर्मनाचे शुद्धीकरण होऊन मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांचे आपोआप शुद्धीकरण होते. शुद्धीकरण झालेल्या अंतर्मनात भगवंताचे विचार सतत येऊ लागतात.
गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे अध्यात्म केवळ बघायचे, ऐकायचे अथवा वाचायचे शास्त्र नसून ते कृतीचे शास्त्र आहे. कृती न केल्यास अनुभूती येत नाही आणि त्यामुळे श्रद्धा वाढत नाही. वर सांगितलेले विचार गुरुकृपेने आणि आश्रमात विराजमान असलेल्या सद़्गुरूंच्या अन् संतांच्या मार्गदर्शनामुळे लाभले, तसेच आश्रमातील साधकांसह लाभलेल्या संवादातून प्राप्त झाले आहेत. यात माझे असे काहीच नाही; म्हणून हे लिखाण गुरुचरणी अर्पण करत आहे.’
– (पू.) उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०२३)