खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करून संघर्ष निर्माण करू पहाणारे साम्यवादी !
साम्यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्ही’वर मांडलेल्या सूत्रांचे खंडण
‘मनुष्य जेव्हा सत्याला धरून विषय मांडतो, तेव्हा त्याच्यावर तोंडघशी पडण्याचे प्रसंग येत नाहीत. सत्य विरोधात असले, तरी ते स्वीकारणार्याचे धैर्य आणि धाडस त्याच्यामध्ये असते. जेव्हा ‘आपलेच म्हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्यक्षात ते खरे नसतात, तेव्हा शब्दच्छल करून ते खरे करण्याच्या नादात काही तथाकथित स्वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो. हे ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन शब्दांच्या संदर्भात ‘बिझनेस टीव्ही’वरील एका चर्चेत साम्यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी मांडलेल्या सूत्रांच्या ऊहापोहांतून आपल्याला निश्चित शिकायला मिळेल.
हिंदूंनी त्यांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला नाही. त्यांच्यात हिंदु धर्मावर वैचारिक आघात करणार्यांच्या विचारांची सत्यता पडताळण्याची तळमळ आणि त्यांचे वैचारिक षड्यंत्र उघडे पाडण्याची विजिगीषु वृत्ती यांचा अभाव आहे. त्यामुळे अशा साम्यवादी धर्मविरोधी विचारकांचे चांगलेच फावते. ‘खोटे बोला; पण रेटून बोला आणि आपलेच खरे करा’, असे करणार्यांचे पितळ उघडे पाडणे सर्वांचेच कर्तव्य आहे. ‘चित भी मेरी और पट भी मेरी’, अशा भ्रमात कार्य करणार्या वैचारिक दिवाळखोरांचे खंडण करून त्यांना उघडे पाडणे, ही काळानुसार समष्टी साधनाच आहे.
टीका १
मला (देवदत्त पटनायक यांना) वाटत नाही की, ‘भारत’ हा शब्द ‘इंडिया’तून आला आहे आणि ‘इंडिया’ हा शब्द परकियांकडून आला आहे’, हा निष्कर्ष योग्य नाही. हा तुमचा आणि राजकीय निष्कर्ष असून तो ‘फूट पाडा आणि राज्य करा’, या चाणक्य नीतीतून आला आहे. हे साम, दाम, दंड आणि भेद याचे उदाहरण आहे. ‘इंडिया’ हा शब्द ‘सिंधु’ या वैदिक शब्दापासून आला आहे. ‘भारत’ हा शब्द वेदांमध्ये असलेल्या शब्दामधून आला आहे. तसेच ‘भारत’ शब्द भारतातूनही आला असून तो जैन शब्द आहे.
खंडण : एक प्रकारे साम्यवाद्यांना चपराक !
अ. माननीय देवदत्त पटनायकजी, तुम्ही दूरचित्रवाणीवरील वादविवादातील वक्तव्यांमधून सनातन धर्म आणि वेद यांना मान्यता दिली, तसेच वेद अन् सनातन धर्मपरंपरा यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले. याविषयी धन्यवाद ! कारण अन्य साम्यवादी विचारसरणीचे तथाकथित स्वयंघोषित विद्वान हे धर्म आणि वेद यांना अजिबात मानत नाहीत. ‘भारत’ या शब्दाच्या व्युत्पत्तीसाठी तुम्ही वेद आणि जैन पंथ यांचा संदर्भ देऊन तो भारतीय शब्द आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
आ. सध्या तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारणी (तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांंतील) आणि त्यांचे देशभरातील समर्थक सनातन धर्माला संपवण्याची भाषा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांना लावलेली चपराक अभिनंदनीय आहे. तुम्ही वेद आणि भारत या शब्दांचे समर्थन केले, हा चांगला प्रयत्न आहे; परंतु ‘इंडिया’ शब्दाच्या समर्थनासाठी तुम्हाला ‘सिंधु’ शब्द आणि वेद यांचा आश्रय घ्यावा लागला. हा तुमच्यासह जगभरातील सर्व तथाकथित साम्यवादी स्वयंघोषित अभ्यासकांचा पराभव आहे. हिंदूंना यापुढे साम्यवादी विचारसरणीतून दिशाहीन करता येणार नाही, हे लक्षात आल्याने आता तुम्हाला हिंदु धर्मग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. हा हिंदु तत्त्वज्ञानाने साम्यवादी विचारसरणीचा पराभव केल्याची पावतीच आहे. तुम्ही या सूत्राद्वारे एक प्रकारे साम्यवाद्यांना चपराक लगावली. हा एका अर्थाने चांगला प्रारंभ म्हणायला हवा.
इ. तुम्ही धूर्तपणे ‘भारत’ हा शब्द केवळ वेदांमध्येच नाही, तर जैन परंपरेतही आला आहे, असे सांगितले. तसेच साम्यवादी विचारसरणीच्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’, या नीतीचा अवलंब करून हुशारीने हिंदु आणि जैन यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ही साम्यवादी हुशारी यापुढे कामी येणार नाही, हे निश्चित ! कारण जैन समाज भारताच्या रक्षणासाठी आणि ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न करत आहे. या निमित्ताने का होईना, आर्य चाणक्य यांच्या नीतीचा वापर करून तुम्ही हिंदु धर्माचे पालन करत आहात, हेही नसे थोडके !
खरेतर ‘फूट पाडा आणि राज्य करा’, ही आर्य चाणक्य यांची नीती नाही. त्यांनी दारूबाज, स्त्रीलंपट अशा नागरिकांकडे दुर्लक्षच नव्हे, तर अत्याचार करणार्या अन्यायी आणि अधर्मी राजाविरुद्ध जनतेला संघटित केले होते. त्याला सत्तेतून पायउतार केल्यानंतर सुराज्याची स्थापना केली. योग्य उत्तराधिकार्याला गादीवर बसवून स्वतः वनात निघून गेले होते; परंतु साम्यवाद्यांच्या (तसेच इंग्रजांच्या) स्वार्थी कुटील सत्ता हस्तगत करणार्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’ (कामगार-मालक, गरीब-श्रीमंत, धर्मपरायण-नास्तिक, भाषा, प्रांत, मूलनिवासी-बाहेरून आलेले अशा फूट पाडून सत्ता हस्तगत करणार्या आपल्या) या नीतीला आर्य चाणक्य यांच्यावर ढकलून ‘आम्ही साम्यवादी किती चांगले आहोत ?’, हे दाखवायचा प्रयत्न केला.
Do listen to @devduttmyth make a spectacular fool of himself on national TV by rambling incoherently, while @sanjeevsanyal factually counters him on the fake #BharatVsIndia debate. pic.twitter.com/unSM2KBYZf
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) September 6, 2023
टीका २
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ‘सिंधु’ या शब्दाला पर्शियन लोकांनी ‘हिंदु’ म्हटले आणि ग्रीकांनी त्याला ‘इंदु’ म्हटले आहे; पण त्यांनी हा शब्द दिला नाही, तर तो सिंधु नदीमधून आला आहे. ‘आर्य’ हा शब्द ब्राह्मणांकडून आला आहे.
खंडण : साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि सुधारकांचा जातीयवाद यांपासून समाज अन् देश यांना सर्वाधिक धोका !
अ. येथेही तुम्ही हुशारीने साम्यवादी नीती वापरून हिंदूंमध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी फूट पाडून साम्यवादी सत्तेची पोळी भाजण्याचे काम करत आहात. हे सामान्य जनता ओळखू शकणार नाही इतक्या हुशारीने सूत्र मांडले आहे. देवदत्तजी, तुमचा वैचारिक गोंधळ पुष्कळ आहे. तुम्ही तुमचे म्हणणे खरे करण्यासाठी केव्हा आणि कोणता संदर्भ वापरला, त्याचे भान नसल्याने तुम्हीच तुमच्या वक्तव्याचा विरोधाभास करत आहात. याला विद्वान म्हणावे का ? ‘मी म्हणतो तेच खरे, म्हणजे विद्वान’, हा साम्यवादी अहंकार आहे. आपल्या विचारांच्या विरुद्ध असले, तरी खरे आहे ते मांडणे आणि अशी क्षमता ज्यांमध्ये असते, त्यांना विद्वान म्हणता येईल.
आ. तुम्ही आधी म्हणाला की, ‘इंडिया’ शब्द बाहेरून आला’, हा तुमचा निष्कर्ष आहे, हे राजकीय निष्कर्ष आहेत, हे ‘फोडा आणि राज्य करा’ आणि साम, दाम, दंड अन् भेद या नीतीचे फलित आहे. आता म्हणता, ‘सिंधु’ या शब्दाला पर्शियन लोक ‘हिंदु’ म्हणतात. ग्रीक लोक ‘इंदू’ म्हणतात; पण त्यांनी हा शब्द दिला नाही. हा शब्द वेदांमधून आणि सिंधु नदीच्या संदर्भात आला आहे. एक प्रकारे तुम्ही येथे हा शब्द परकियांनी दिला आहे, असे सांगता. ‘इंडिया’ हा शब्द जर ‘इंदू’पासून आला असेल, तर तो परकियांपासूनच आला आहे. त्याचा भारताशी काय संबंध ? परकियांना जर वेदातील शब्दच भारतासंदर्भात घ्यायचा होता, तर तो त्यांना ‘भारत’ घेता आला असता. ‘सिंधु’चा ‘हिंदु’ आणि ‘हिंदु’चा ‘इंदु’ अन् ‘इंदु’चा ‘इंडिया’ यात वेद आणि भारतीयता तर कुठेच दिसत नाही. उलट सर्वत्र परकियताच दिसते.
इ. जगभरातील सर्व देश त्यांची एकाच नावाने ओळख ठेवतात. मग ‘इंडिया’पेक्षा ‘भारत’ अधिकच सोयिस्कर आहे; कारण ग्रीक असो किंवा पर्शियन, परकियांनी भारत देशाच्या नावाचा केलेला विकृत उच्चार भारताने का स्वीकारावा ? या प्रश्नाचे उत्तर तथाकथित साम्यवादी विद्वान कसे देणार ? यातून ते भारताला गुलामीच्या छायेत कसे ढकलू शकतात ?’
(क्रमश:)
– (सद़्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (८.९.२०२३)
संपादकीय भूमिकासाम्यवादी ‘फूट पाडा आणि राज्य करा’, या नीतीद्वारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा करत असलेला प्रयत्न हिंदूंनी ओळखावा ! |