साधकांना नामजपादी उपायांच्‍या रूपाने संजीवनी पुरवणारे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद़्‍गार !

सनातन संस्‍थेला लाभलेले एक थोर आणि ऋषितुल्‍य मार्गदर्शक सद़्‍गुरु गाडगीळकाका !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१६.९.२०२३ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये पृष्‍ठ ६ वर अनेक साधकांनी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्‍या ६० व्‍या वाढदिवसानिमित्त लिहिलेले त्‍यांची विविध आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये विशद करणारे लेख वाचून मला पुष्‍कळ आनंद झाला. माझ्‍यापेक्षाही त्‍यांच्‍या संदर्भातील लेख मला अधिक आवडले. सद़्‍गुरु गाडगीळकाका केवळ साधनेविषयीच नव्‍हे, तर अध्‍यात्‍मातील सूक्ष्म जगत, राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या संदर्भात पुढच्‍या पिढीला चांगले मार्गदर्शन करतील, याची मला पूर्ण शाश्‍वती आहे. सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या रूपाने सनातन संस्‍थेला एक थोर आणि ऋषितुल्‍य मार्गदर्शक सद़्‍गुरु लाभले आहेत’, यासाठी मी देवाच्‍या चरणी कृतज्ञ आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१६.९.२०२३)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी वर्ष १९९९ पासून गुरुकृपायोगानुसार साधना करण्‍यास प्रारंभ केला. त्‍यांनी वर्ष २०११ मध्‍ये संतपद आणि वर्ष २०२० मध्‍ये सद़्‍गुरुपद प्राप्‍त केले. सद़्‍गुरु गाडगीळकाका साधकांना अनिष्‍ट शक्‍तींमुळे होणारे त्रास दूर होण्‍यासाठी नामजपादी उपाय सांगतात. ते साधकांसह समाजालाही संकटकाळात उपायांविषयी मार्गदर्शन करतात. त्‍यामुळे सद़्‍गुरु गाडगीळकाका हे जणू ‘उपायगुरु’ आहेत. त्‍यांच्‍या जन्‍मकुंडलीतील आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण या लेखात दिले आहे.

१. सामान्‍य माहिती 

अ. जन्‍मदिनांक : २०.८.१९६३

आ. जन्‍मवेळ : सायंकाळी ७.१६

इ. जन्‍मस्‍थळ : इंदूर, मध्‍यप्रदेश

२. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे व्‍यक्‍तीमत्त्व दर्शवणारे घटक

२ अ. लग्‍नरास (कुंडलीतील प्रथम स्‍थानातील रास) : सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत प्रथम स्‍थानात ‘कुंभ’ रास आहे. कुंभ रास ही वायुतत्त्वाची रास आहे. त्‍यामुळे व्‍यक्‍तीत बौद्धिक बळ, आकलनशक्‍ती, तर्कशक्‍ती, जिज्ञासा आणि संशोधकबुद्धी ही वैशिष्‍ट्ये असतात. तसेच व्‍यक्‍तीचा स्‍वभाव सेवाभावी, मितभाषी, संयमी आणि मायेपासून अलिप्‍त असतो.

२ आ. जन्‍मरास (कुंडलीतील चंद्राची रास) : सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत चंद्र ‘सिंह’ राशीत आहे. सिंह रास ही अग्‍नितत्त्वाची रास आहे. त्‍यामुळे व्‍यक्‍तीत कृतीशीलता, स्‍वयंशिस्‍त, विद्या शिकण्‍याची आवड, तत्त्वनिष्‍ठता आणि ध्‍येयप्राप्‍तीची तळमळ इत्‍यादी वैशिष्‍ट्ये असतात.

श्री. राज कर्वे

३. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या जन्‍मकुंडलीतील आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये

३ अ. सत्त्वगुणी व्‍यक्‍तीमत्त्व दर्शवणारा मीन राशीतील गुरु ग्रह : सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत गुरु ग्रह मीन राशीत आहे. ‘गुरु ग्रह’ आणि ‘मीन रास’ हे दोन्‍ही घटक सत्त्वगुणी आहेत. त्‍यामुळे सद़्‍गुरुकाकांचे व्‍यक्‍तीमत्त्व मूलतः सात्त्विक आहे. सत्त्वगुणामुळे त्‍यांच्‍यात नम्रता, सौम्‍यता, संयम, नियमितता, व्‍यवस्‍थितपणा, एकाग्रता, विचारपूर्वक कृती करणे इत्‍यादी गुण आहेत. त्‍यांचे चालणे, बोलणे, वागणे, विचार करणे इत्‍यादी सर्व सात्त्विक आहे. ‘सद़्‍गुरु गाडगीळकाका अगोदरपासूनच संतवृत्तीचे आहेत’, असे त्‍यांच्‍या संपर्कात पूर्वीपासून असलेले अनेक जण म्‍हणतात.

३ अ १. सात्त्विक कुटुंबात जन्‍म होणे : सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत गुरु ग्रह द्वितीय स्‍थानात (कुटुंबाशी संबंधित स्‍थानात) आहे. हा योग त्‍यांचा जन्‍म सात्त्विक कुटुंबात झाल्‍याचे दर्शवतो. सद़्‍गुरुकाकांचे आई-वडील आणि अन्‍य कुटुंबीयही सात्त्विक आहेत.

३ आ. आध्‍यात्मिक स्‍तरावरील जीवन दर्शवणारा गुरु आणि शनि या ग्रहांचा शुभयोग : सद़्‍गुरुकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत प्रथम स्‍थानावर ‘गुरु’ आणि ‘शनि’ या ग्रहांचा प्रभाव आहे. गुरु आणि शनि हे आध्‍यात्मिक स्‍वरूपाचे ग्रह आहेत. हे ग्रह आध्‍यात्मिक प्रगल्‍भता दर्शवतात. अशा व्‍यक्‍तीचे जीवन आध्‍यात्मिक स्‍तरावरील असते. अशी व्‍यक्‍ती लोककल्‍याणासाठी कार्य करते.

सद़्‍गुरु गाडगीळकाकांचा वर्ष १९९९ मध्‍ये सनातन संस्‍थेशी संपर्क आला. संस्‍थेने प्रकाशित केलेले ‘शिष्‍य’, ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ आदी ग्रंथ वाचून त्‍यांना साधना करण्‍याची प्रेरणा मिळाली. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘ईश्‍वरी राज्‍याची स्‍थापना’ हे उदात्त ध्‍येय त्‍यांना भावले. सद़्‍गुरुकाकांनी साधनेला आरंभ केल्‍यानंतर अवघ्‍या एका वर्षाच्‍या आत पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतला. तेव्‍हा ते एका आस्‍थापनात मोठ्या पदावर कार्यरत होते आणि त्‍यांना पदोन्‍नतीची संधीही होती; परंतु साधना करण्‍याच्‍या तीव्र तळमळीमुळे त्‍यांनी तरुण वयात मायेचा त्‍याग केला.

३ इ. ज्ञानशक्‍ती दर्शवणारा रवि आणि गुरु या ग्रहांचा शुभयोग : सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत ‘रवि’ आणि ‘गुरु’ या ग्रहांचा नवपंचमयोग (शुभयोग) आहे. रवि ग्रह तेजाचा आणि गुरु ग्रह ज्ञानाचा कारक आहे. हा योग ‘ज्ञानशक्‍ती’ दर्शवतो.

सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ केल्‍यावर सद़्‍गुरुकाकांनी प्रथम सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगत असलेल्‍या दृष्‍टीकोनांवर आधारित चौकटी बनवण्‍याची सेवा केली. ती करत असतांना त्‍यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांकडून संकलनाचा भाग शिकायला मिळाला. त्‍यानंतर त्‍यांनी लेखांचे संकलन करण्‍याची सेवा केली. पुढे त्‍यांनी आध्‍यात्मिक संशोधनाच्‍या अंतर्गत वैज्ञानिक उपकरणांद्वारे करण्‍यात येणार्‍या चाचण्‍यांचे निष्‍कर्ष मांडणारे लेख लिहिण्‍याची सेवा केली. तसेच त्‍यांनी सनातनचे काही ग्रंथही संकलित केले आहेत. थोडक्‍यात, सद़्‍गुरु काकांनी केलेल्‍या अधिकतर सेवा ज्ञानशक्‍तीशी संबंधित आहेत.

३ ई. जिज्ञासा आणि संशोधकबुद्धी असणे : सद़्‍गुरुकाकांची लग्‍नरास ‘कुंभ’ आणि जन्‍मरास ‘सिंह’ असल्‍यामुळे त्‍यांच्‍यात जिज्ञासा, शिकण्‍याची वृत्ती, प्रयोगशीलता आणि संशोधकबुद्धी ही वैशिष्‍ट्ये आहेत. सद़्‍गुरुकाकांना नेहमी नवीन ज्ञान जाणून घेण्‍याची जिज्ञासा असते. सनातन आश्रमात होणार्‍या आध्‍यात्मिक संशोधनासंबंधी प्रयोगांसाठी सद़्‍गुरुकाकांचे मार्गदर्शन लाभते. सद़्‍गुरुकाका स्‍वतः प्रयोगांच्‍या वेळी उपस्‍थित राहून सूक्ष्मातून होणार्‍या गतीविधींचा अभ्‍यास करतात. आध्‍यात्मिक कारणांमुळे वस्‍तू किंवा व्‍यक्‍ती यांवर होणार्‍या सकारात्‍मक आणि नकारात्‍मक पालटांविषयीची कारणमीमांसा ते उलगडून सांगतात. जिज्ञासा आणि शिकण्‍याची वृत्ती यांमुळे त्‍यांना ईश्‍वराकडून ज्ञान मिळते.

३ उ. आध्‍यात्मिक उपायांच्‍या संदर्भात संशोधन करणे : गत काही वर्षांपासून सद़्‍गुरु गाडगीळकाका साधकांना अनिष्‍ट शक्‍तींमुळे होणार्‍या त्रासांच्‍या निवारणासाठी नामजपादी उपाय सांगत आहेत. ‘साधकांभोवती त्रासदायक शक्‍तींचे आवरण अधिक प्रमाणात असल्‍याने त्‍यांना नामजप केल्‍याचा विशेष लाभ होत नाही’ हे सद़्‍गुरुकाकांच्‍या लक्षात आले अन् त्‍यांनी त्रासदायक आवरण दूर करण्‍यासाठी सुलभ आणि प्रभावी उपायपद्धत शोधली. त्रासदायक आवरण दूर करून नामजप केल्‍याने साधकांना नामजप केल्‍याचा चांगला लाभ होऊ लागला अन् साधनेची फलनिष्‍पत्ती वाढली.

३ उ १. केवळ साधकांसाठी नव्‍हे, तर समाजासाठीही उपाय शोधणे : सद़्‍गुरु गाडगीळकाका साधकांसाठी व्‍यक्‍तीगत स्‍तरावर उपाय शोधत असतांनाच त्‍यांनी समाजासाठीही उपाय शोधण्‍यास आरंभ केला. ‘कोरोना महामारी’, ‘उष्‍णतेची लाट’, ‘डोळ्‍यांची साथ येणे’ इत्‍यादी संकटकाळात त्‍यांनी नामजपादी उपाय शोधले. हे उपाय दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झाल्‍याने केवळ साधकच नव्‍हे, तर समाजातील अन्‍य लोकही त्‍यांचा लाभ घेऊ शकले.

३ उ २. उपायांच्‍या माध्‍यमातून साधकांना चैतन्‍यरूपी संजीवनी पुरवणारे सद़्‍गुरु गाडगीळकाका ! : साधकांनी सद़्‍गुरु गाडगीळकाकांना उपाय विचारल्‍यानंतर ते लगेचच उपाय शोधून देतात. साधकाची स्‍थिती खालावली असल्‍यास सद़्‍गुरुकाका स्‍वतः त्‍या साधकासाठी काही घंटे उपाय करतात. काही वेळा ‘अमुक साधकाला त्रास होत आहे’, असे ईश्‍वर सद़्‍गुरुकाकांना आतून सुचवतो अन् सद़्‍गुरुकाका त्‍या साधकासाठी स्‍वत: उपाय करतात. अशा रितीने सद़्‍गुरुकाका साधकांसाठी ‘उपायगुरु’ असून साधकांना चैतन्‍याची जणू संजीवनी पुरवत आहेत.

३ ऊ. पूर्वजन्‍मातील साधना उच्‍च प्रतीची असणे : सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या जन्‍मकुंडलीत रवि, बुध, गुरु आणि शनि असे ४ ग्रह स्‍वराशीत (स्‍वतःचे स्‍वामित्‍व असलेल्‍या राशीत) आहेत. रवि ग्रह तेजाचा, बुध ग्रह बुद्धीचा, गुरु ग्रह ज्ञानाचा आणि शनि ग्रह वैराग्‍याचा कारक आहे. या विशेष योगावरून सद़्‍गुरुकाकांची पूर्वजन्‍मातील साधना उच्‍च प्रतीची असल्‍याचे लक्षात येते. ‘ते पूर्वजन्‍मात एक श्रेष्‍ठ विभूती होते’, असे वाटते.

३ ए. श्री महालक्ष्मीतत्त्व असलेल्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या सद़्‍गुरु गाडगीळकाकांना पत्नी म्‍हणून लाभणे : जन्‍मकुंडलीतील ‘सप्‍तम’ स्‍थानावरून पत्नीचा विचार होतो. सद़्‍गुरुकाकांच्‍या कुंडलीत सप्‍तम स्‍थानात रवि, चंद्र, शुक्र आणि हर्षल हे ग्रह सिंह राशीत आहेत. त्‍यांपैकी रवि ग्रह चैतन्‍याचा, चंद्र ग्रह सौंदर्याचा, शुक्र ग्रह समृद्धीचा आणि हर्षल ग्रह अंतःप्रेरणेचा कारक आहे. या ग्रहस्‍थितीमुळे कुंडलीतील सप्‍तम स्‍थानाला असामान्‍य बळ प्राप्‍त झाले आहे. याचा परिणाम म्‍हणून श्री महालक्ष्मीतत्त्व असलेल्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या सद़्‍गुरुकाकांना पत्नी म्‍हणून लाभल्‍या. हे ईश्‍वरी नियोजन होय ! ‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ हे दोघेही दैवी विभूती असून त्‍यांनी लोककल्‍याणासाठी पृथ्‍वीवर जन्‍म घेतला आहे’, असे वाटते.

कृतज्ञता

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या जन्‍मकुंडलीचे विश्‍लेषण करण्‍याची संधी मिळाली, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. राज कर्वे (ज्‍योतिष विशारद), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.९.२०२३)

कु. मधुरा भोसले यांचा ‘आध्‍यात्मिक उपाय सद़्‍गुरु’ असलेले सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !’ हा लेख १९ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध करण्‍यात येईल. – संपादक