संयुक्त अरब अमिरातने भारताच्या मानचित्रात (नकाशात) पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्याने पाकचा थयथयाट !
संयुक्त अरब अमिरातकडे मागितले उत्तर !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त अरब अमिरातचे उपपंतप्रधान सैफ बिन जायद अल नाहयान यांनी १० सप्टेंबर या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित करून भारत-मध्य-पूर्व देश-युरोप-अमेरिका यांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक महामार्गाचे मानचित्र दाखवले होते. त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे भाग भारतात दाखवलेे. जेव्हा आंतरराष्ट्रीय मंचावर एखादे मानचित्र प्रदर्शित केले जाते, तेव्हा वादग्रस्त भाग वेगळा दाखवला जातो; मात्र यात हे दोन्ही भाग भारतात दाखवल्यावरून पाकने संयुक्त अरब अमिरातकडे याविषयी उत्तर मागितले आहे. विशेष म्हणजे याविषयी चीनने कोणताही आक्षेप घेतलेला नाही. देहलीमध्ये झालेल्या ‘जी-२०’ परिषदेमध्येही हेच मानचित्र दाखवण्यात आले होते, तेव्हाही चीनने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. संयुक्त अरब अमिरातने पाकच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वीही वर्ष २०१९ मध्ये भारताने काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यावर संयुक्त अरब अमिरातने ते भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे सांगत त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
सौजन्य न्यूज एक्स
संपादकीय भूमिकासंयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ? |