श्री गणेशविद्या (देवनागरी लिपी) : उगम आणि महत्त्व ! : Ganesh
‘मराठी मजकूर लिहिण्यासाठी वापरल्या जाणार्या अक्षरांना ‘मुळाक्षरे’ आणि ‘जोडाक्षरे’ म्हणतात. या लोकप्रिय चिन्हसमूहाला ‘देवनागरी लिपी’ म्हणतात. ‘ही लिपी साक्षात् श्री गणेशाने निर्माण केली’, अशी श्रद्धा आहे. व्यास आणि गणपति यांनी एकमेकांना घातलेल्या अटींमुळे ही दर्जेदार लिपी सिद्ध झाली. जगातील कोणतीही भाषा या लिपीत अधिक अचूकपणे लिहिता-वाचता येते. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
महर्षि व्यासांना महाभारत लिहायचे होते. महाभारताची कथा सुचल्यावर ‘हा ग्रंथ प्रचंड मोठा होईल’, असे लक्षात आल्यावर ‘हे अवघड काम श्री गणेशच करू शकेल’, असे त्यांना वाटले. त्यांना जाणवले. त्यांनी गजाननाला विनंती केली. तेव्हा त्याने अट घातली, ‘भराभर आणि सतत सांगणार असाल, तरच मी लिहीन. एकदा थांबलो की, पुन्हा तुमचे हे काम करणार नाही.’ महर्षी व्यासांना एक युक्ती सुचली. ‘गणपतीने घातलेली अटही मोडणार नाही आणि महाभारत सांगतांना आपल्यालाही थोडी उसंत मिळेल’, असा उपाय त्यांना सापडला. त्यांनी गणपतीला सांगितले, ‘‘हा नवा ग्रंथ नव्या लिपीसह लिहिला जावा’, अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत कुणीही वापरली नाही, अशी एक लिपी तू हा ग्रंथ लिहितांना वापर. तुझी बुद्धीमत्ता आणि प्रतिभा यांची छाप विश्वावर रहावी. यापूर्वी वापरात असलेल्या लिपींपेक्षा अधिक उपयुक्त, अधिक सोयीची लिपी तू सिद्ध कर. आपण जे उच्चारतो, तेच तंतोतंत लिहिले जाईल, अशी एक नवी आधुनिक लिपी तू निर्माण करू शकशील. त्याच लिपीसह तू महाभारत लिही.’’ साक्षात् बुद्धीदेवता असलेल्या गणेशाने हे आव्हान आनंदाने स्वीकारले.
नवी लिपी सिद्ध करण्यासाठी विचार करावा लागत असल्याने गणेशाला अधूनमधून थोडे थोडे थांबावे लागे. व्यासांना त्या वेळी थोडीशी उसंत मिळायची. या लिखाणाच्या वेळी ५२ अक्षरे सिद्ध झाली. यात १६ स्वर, तर ३६ व्यंजने आहेत. १६ स्वर मानवी मुखातील स्पंदनांनी निर्माण होतात. मानवी पाठकण्याच्या ३३ मणक्यांच्या स्पंदनांनी ३३ व्यंजने निर्माण होतात. काही व्यंजनांच्या संयुक्त उच्चाराने ३ संयुक्त व्यंजने सिद्ध होतात.
प्रत्येक मानवी मणक्याशी एकेक मराठी मुळाक्षर जोडलेले आहे. केवळ ऐकलेल्या आवाजावरून संबंधित उच्चार मुखातील कि मणक्यातील स्पंदनापासून उगम पावला, हे समजणे अतिशय अवघड आहे. श्री गणेशाकडे ही शक्ती आहे, हे ठाऊक असल्यानेच महर्षि व्यासांनी गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली असावी. जितके वेगवेगळे उच्चार आहेत, तितकीच स्वतंत्र अक्षरचिन्हे गणपतीने सिद्ध केली. या चिन्हांनाच ‘मुळाक्षरे’ म्हणतात. यापासूनच गणेशाने जोडाक्षरेही सिद्ध केली.
देवाने सिद्ध केली आणि नागरिक वापरतात; म्हणून ही लिपी ‘देवनागरी’ या नावाने प्रसिद्ध झाली. या लिपीत ५२ मुळाक्षरे आहेत, तर पृथ्वीवरील वर्षही ५२ आठवड्यांचे आहे. ‘गणेशविद्या पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाशी घट्टपणे जोडलेली आहे’, हे यावरून लक्षात येते.
गणेशाने सिद्ध केलेली ही देवनागरी लिपी ‘गणेशविद्या’ म्हणूनही ओळखतात. मुलांच्या शालेय शिक्षणाच्या प्रारंभाला ‘श्रीगणेशा’ असे म्हणतात. केवळ धार्मिक नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही देवनागरी लिपी म्हणजे जगाला मिळालेले वरदान आहे. जगातील कोणत्याही भाषेतील कुठलाही उच्चार लेखी नोंदवण्यासाठी इतर लिपींपेक्षा देवनागरीत अल्प अक्षरे आणि जागा लागते. सर्व जगाने ही गणेशविद्या (देवनागरी लिपी) वापरली, तर जगातील कागदाचा वापर ६० टक्के न्यून होईल. संपूर्ण जगातील जंगलतोड ६० टक्के न्यून, तर शाईमुळे होणारे शिशाचे प्रदूषणही ६० टक्के न्यून होईल. जगभर संपर्क असणार्या भारतियांनी गणेशविद्येचा प्रसार सर्व देशांत करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.
देवनागरी लिपी, मराठी शब्द आणि मराठी अंक यांचा वापर केल्याने गणेशाची, तसेच लक्ष्मीचीही कृपा होईल. नास्तिकांनी पर्यावरणरक्षणासाठी इंग्रजीचा वापर पूर्ण बंद करून देवनागरी लिपीसह मराठी भाषेचा वापर करावा. निसर्ग आणि पृथ्वी यांच्या रक्षणासाठी श्री गजानन सर्वांना अशी बुद्धी देवो, ही प्रार्थना !’
– प्रा. अनिल गोरे, गणेशविद्या प्रसार चळवळ, समर्थ मराठी संस्था, पुणे.