तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

  • प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असल्यावरून कारवाई केल्याचा मंडळाचा दावा

  • मूर्ती पाण्यात विरघळणार्‍या असल्याची मूर्तीकारांची माहिती !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या) सरकारने राज्यात श्री गणेशचतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या, त्यांपैकी काही ठिकाणांना टाळे ठोकण्यास चालू केले आहे. श्री गणेशचतुर्थी ३ दिवसांवर येऊन ठेपली असतांना अशा प्रकारे कारवाई केली जात असल्याने हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील करूर येथील सुंगागेट भागात राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती बनवण्याचे ठिकाण बंद केले आहे. येथे प्रदूषण होत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली. प्रदूषण मंडळाने महसूल विभाग आणि पोलीस यांच्या समवेत येथे अचानक सर्वेक्षण करून ही ठिकाणे बंद केली. येथे सुमारे ४०० गणेशमूर्ती होत्या. या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. या कारवाईचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. सामाजिक माध्यमांतून या घटनेचा विरोधही केला जात आहे.

भाजपच्या कार्यकर्त्याच्या मूर्तीशाळेलाही ठोकले होते टाळे !

काही दिवसांपूर्वी तेनकासी येथील एका मूर्तीशाळेवर धाड टाकून त्याचा मालक असणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. या वेळी एका कारागिरीने मूर्ती विरघळणार्‍या मातीपासून बनवण्यात आल्याचे सांगितल्यानंतरही कारवाई करण्यात आली.

मूर्ती प्रदूषण करणार्‍या नसल्याचे सांगूनही कारवाई

मूर्ती बनवणार्‍या एका कारागिराचा व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात तो म्हणतो की, आम्ही गेल्या १० वर्षांपासून मूर्ती बनवत आहोत. यासाठी जे साहित्य वापरतो, ते पाण्यात विरघळणारे आहेत. आम्ही वापरत असलेले रंग नैसर्गिक असून त्यात पाण्याचे रंग आहेत. त्यात कोणतेही रसायन नाही. प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी मूर्ती पडताळल्याही होत्या. त्यांनी ‘मूर्तींची गुणवत्ता चांगली नाही’ असे सांगून त्यांनी मूर्तीशाळेला टाळे ठोकले. येथे १७० मूर्ती होत्या. कर्ज काढून १० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
या वेळी एका महिलेने म्हटले की, इतकी वर्षे आम्ही मूर्ती बनवत आहोत; मात्र कधीही अशी कारवाई झाली नाही. जर आम्हाला २० दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले असते, तर आम्ही या मूर्ती अन्य राज्यांत नेल्या असत्या.

हिंदूंचा व्यवसाय नष्ट करण्याचा प्रयत्न ! – भाजप

तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी या घटनेवरून तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे. अण्णामलाई म्हणाले की, आमच्या उत्सवांवर जगणार्‍या लोकांचा व्यवसाय नष्ट करण्याचा प्रयत्न करून द्रमुक सरकार सनातन धर्मियांच्या भावना दुखावत आहे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही हानी पोचवत आहे.

द्रमुकने सनातन धर्माच्या विरोधाची परिसीमा गाठली ! – स्थनिक हिंदुत्वनिष्ठ संघटना

स्थानिक हिंदु संघटनांनी म्हटले की, आम्ही १२० गणेशमूर्तींची मागणी केली होती; मात्र आता अचानक मूर्तीशाळेला टाळे ठोकण्यात आले. हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे षड्यंत्र आहे. द्रमुकने सनातन धर्माच्या विरोधाची परिसीमा गाठली आहे.

संपादकीय भूमिका

  • सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्‍या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !
  • जलस्रोतांमध्ये रसायन सोडून पाणी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांवर प्रदूषण मंडळाने अशाच प्रकारे तत्परतेने कारवाई केली असती का ?