सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे लाभलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍य यांमुळे साधनेचे प्रयत्न होऊन साधिकेला स्‍वतःत जाणवलेले पालट !

सौ. मानसी राजंदेकर

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना साधनेचा पुढील मार्ग दाखवण्‍यासाठी  आळवणे आणि त्‍यानंतर देवाच्‍या कृपेने सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांच्‍या मार्गदर्शनाचा लाभ होणे

‘५.५.२०२३ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात गेले होते. तेव्‍हा मी काही सेवेनिमित्त सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या खोलीत गेले. त्‍या वेळी सद़्‍गुरु काका एका साधिकेला साधनेविषयीची सूत्रे सांगत होते. तेव्‍हा मला सद़्‍गुरु काकांच्‍या ठिकाणी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवत होते. देवानेच त्‍यांचे मार्गदर्शन ऐकण्‍याची योजना केली होती; कारण काही दिवसांपासून मी अंतर्मनातून सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना सतत प्रार्थना करून आळवत होते, ‘परम पूज्‍य गुरुदेव, तुम्‍हीच मला साधनेचा पुढचा मार्ग दाखवा. माझ्‍या साधनेच्‍या प्रयत्नांना दिशा द्या. मला साहाय्‍य करा.’ त्‍या दिवशी याच विचारांत मी रामनाथी आश्रमात गेले होते. सद़्‍गुरु काकांच्‍या खोलीत जाण्‍यापूर्वीसुद्धा माझ्‍या मनात अखंड हेच विचार चालू होते. यानुसार देवाने सद़्‍गुरु काकांच्‍या खोलीत गेल्‍यावर त्‍यांच्‍या अमूल्‍य मार्गदर्शनाचा लाभ करून दिला.

२. सद़्‍गुरु गाडगीळकाकांचे मार्गदर्शन ऐकतांना मन निर्विचार होणे, देवाने ती सूत्रे लिहून घेण्‍यास सुचवणे आणि घरी गेल्‍यावर ती सूत्रे कुटुंबियांना सांगितल्‍यावर त्‍यांचा कृतज्ञताभाव जागृत होणे

सद़्‍गुरु काका बोलत असतांना माझे मन निर्विचार होऊन त्‍यांचे शब्‍द आपोआपच ग्रहण होत होते. मी ती सूत्रे ऐकतांना देवाने सुचवले, ‘आता हातात वही नाही, तर भ्रमणभाषमध्‍ये मार्गदर्शनाची सूत्रे लिहू शकतेस ना !’ मग मी तसे करायला आरंभ केला आणि घरी आल्‍यावर ती सूत्रे लगेचच वहीत लिहिली. रात्री झोपण्‍यापूर्वी मी ती सूत्रे माझा मुलगा पू. वामन (सनातनचे दुसरे संत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे)), माझी मुलगी कु. श्रिया (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ११ वर्षे) आणि माझे पती श्री. अनिरुद्ध (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के) यांना सांगितली. ती सूत्रे ऐकून त्‍यांचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

३. सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

अ. साधना सोपी आहे; पण ती त्‍या पद्धतीने करायला पाहिजे.

आ. प्रत्‍येक कृती करण्‍यापूर्वी ‘आपण साधनेचे कोणते प्रयत्न करणार ?’, हे आधी ठरवावे आणि मगच ती कृती करावी. कृती केल्‍यानंतर साधनेचा आढावा घ्‍यावा आणि त्‍याची त्‍या त्‍या वेळी वहीत संक्षिप्‍त नोंद करावी. दिवसाच्‍या शेवटी आपण जेव्‍हा याचा आढावा घेऊ, त्‍या वेळी आपल्‍याला ‘किती गोष्‍टी जमल्‍या आणि किती जमल्‍या नाहीत ?’, हे कळेल. त्‍यावरून ‘आज आपली साधना किती प्रमाणात झाली ?’, हे समजेल. ‘उद्या काय प्रयत्न करायचे ?’, याचीही दिशा मिळेल, तसेच पुढल्‍या दिवशीच्‍या प्रयत्नांसाठी उत्‍साहही येईल. ‘आपण आपला हा आढावा स्‍वतःच्‍या साधनेसाठी घ्‍यायचा आहे’, याचे स्‍मरण ठेवावे.

इ. साधना ही वेगळी काही नाही. आपली प्रत्‍येक कृती म्‍हणजेच साधना आहे !

ई. साधना म्‍हणजे आपले तन, मन आणि धन गुरुचरणी समर्पित करणे.

उ. आपण तन अर्पण करतो, म्‍हणजे शरिराने सेवा करतो. आपण पूर्णवेळ साधना करतो, म्‍हणजे स्‍वतःसाठी काही कमवत नाही, म्‍हणजेच धन अर्पण करतो. याप्रमाणेच आपण आपले मनही अर्पण करायला पाहिजे; पण आपल्‍याकडून ते होत नाही. एखादी कृती किंवा सेवा करतांना आपले मन त्‍यामध्‍ये नसेल किंवा नामजपात नसेल, तर ती कृती करतांना आपली साधना होत नाही. शरिराने सेवा करतांना, तसेच अन्‍य वेळी, उदा. जेवतांना, वैयक्‍तिक आवरतांना आपल्‍या मनाचा त्‍याग व्‍हायला पाहिजे. ‘मनाने नामजप करणे, कृतज्ञता व्‍यक्‍त करणे आणि शरणागतभाव ठेवणे’, हे साधनेचे प्रयत्न व्‍हायला पाहिजेत.

ऊ. साधना करायची, म्‍हणजे मनोलय करायचा ! याचा सोपा मार्ग म्‍हणजे मनाप्रमाणे न वागणे आणि काही अडले, तर दुसर्‍याला विचारणे. दुसर्‍याला विचारण्‍यात न्‍यूनता वाटायला नको. प.पू. गुरुदेव सर्वज्ञ आहेत, तरीही ते लिखाण पडताळतांना एखादा शब्‍द अडला, तर योग्‍य शब्‍द विचारून घेण्‍यास सांगतात. त्‍यांच्‍यातील शिकण्‍याच्‍या स्‍थितीमुळे आणि त्‍यांच्‍यात अहं नसल्‍यामुळे ते तसे करण्‍यास सांगतात. मग त्‍यांच्‍यापुढे आपण तर काहीच नाही.

ए. आपण उन्‍नत साधक आणि संत यांना साधनेविषयी काही विचारतो. तेव्‍हा त्‍यांनी सांगितलेले लगेचच कृतीत आणायला पाहिजे.

ऐ. दिवसभरात आपल्‍याला साधनेविषयी विविध गोष्‍टी शिकायला मिळतात. ती प्रत्‍येक गोष्‍ट लिहिली, तरच ती लक्षात रहाते, त्‍यावर चिंतन होते आणि ती आपल्‍या मनावर बिंबते.

ओ. प्रतिदिन साधनेच्‍या छोट्या छोट्या प्रयत्नांचे ध्‍येय समोर ठेवून त्‍याप्रमाणे कृती करावी.

औ. अशा प्रकारे प्रत्‍येक छोट्या छोट्या कृतीतून साधना व्‍हायला लागली की, आध्‍यात्मिक उन्‍नती वेगाने होते.

४. सद़्‍गुरु काकांनी केलेल्‍या मार्गदर्शनाप्रमाणे प्रयत्न करायला लागल्‍यावर जाणवलेले पालट

अ. सद़्‍गुरु काकांनी केलेल्‍या मार्गदर्शनातील सूत्रे माझ्‍या मनावर कोरली गेली. आता प्रत्‍येक कृती करण्‍यापूर्वी देवच मला त्‍यांचे स्‍मरण करून देतो. एखाद्या प्रसंगात जेव्‍हा मी माझ्‍या मनाप्रमाणे वागण्‍याचा विचार करत असते, त्‍या वेळी ‘आपल्‍याला मनोलय करायचा आहे’, या सूत्राचे मला स्‍मरण होते आणि मी स्‍वतःच्‍या मनाप्रमाणे वागण्‍याचे टाळते.

आ. कोणतीही कृती करण्‍यापूर्वी माझ्‍या मनात ‘या कृतीमध्‍ये साधनेचे प्रयत्न काय करणार ?’, हा विचार येतो. तसे केल्‍यामुळे दिवसभरातील विविध छोट्या छोट्या कृतींमध्‍ये ठेवलेला भाव, तसेच स्‍वतःतील स्‍वभावदोष यांचे चिंतन होऊ लागले. त्‍यामुळे माझ्‍या मनाचा उत्‍साह वाढला आहे.

इ. सद़्‍गुरु काकांनी सांगितले, ‘‘आपली प्रत्‍येक कृती साधना म्‍हणून व्‍हायला पाहिजे.’’ या विचारामुळे माझे परम पूज्‍य गुरुदेवांशी अनुसंधान वाढले आहे.

ई. कु. श्रिया आणि श्री. अनिरुद्ध यांनीसुद्धा या सूत्रांनुसार प्रयत्न करण्‍यास आरंभ केल्‍याने त्‍यांनाही साधनेतील आनंद अधिक मिळायला लागला आहे.

उ. प्रत्‍येक कृती केल्‍यानंतर ‘त्‍यात आपली साधना झाली कि नाही ?’, याचा आढावा घेतल्‍याने ‘साधना झाली नाही’, अशा प्रसंगांमध्‍ये माझ्‍याकडून गुरूंकडे क्षमायाचना करणे होते. ‘साधनेचे प्रयत्न झाले’, अशा कृतीमधून मला आनंद अनुभवता येतो.

‘सद़्‍गुरु काकांच्‍या चैतन्‍यमय वाणीचाच हा परिणाम आहे’, असे मला जाणवते. त्‍यामुळे माझ्‍याकडून त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त होते. परम पूज्‍य गुरुदेव, ‘आम्‍ही आपल्‍या चरणी कशी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी ? त्‍यासाठी माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत.’

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे गुरुदेव, केवळ आपल्‍याच कृपेने आम्‍हाला सद़्‍गुरु गाडगीळकाकांसारख्‍या दिव्‍य संतांचा सहवास आणि सत्‍संग लाभत आहे. आज तुम्‍ही मला त्‍यांच्‍या सत्‍संगातून मिळालेल्‍या नवचैतन्‍याने साधनेत पुन्‍हा प्रवाहित केले. ‘त्‍यांच्‍या सत्‍संगातून मला नेहमी शिकता येऊ दे आणि त्‍यांच्‍याप्रती अखंड कृतज्ञताभावात रहाता येऊ दे. आपणच माझ्‍याकडून हे साधनेचे प्रयत्न सातत्‍याने आणि शरणागतभावाने करून घ्‍या’, हीच आपल्‍या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (२५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक