धनकवडीतील (पुणे) गणेशोत्सव मंडळांकडून १९ सप्टेंबरला एकत्रित मिरवणुकीचा निर्णय !
पुणे – राष्ट्रीय एकतेची भावना वाढवण्यासाठी धनकवडीमधील ११ मंडळांच्या वतीने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर या दिवशी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘स्वराज्य रथा’वर ११ गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्ती विराजमान करून ही मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती ‘अखिल मोहननगर मित्र मंडळा’चे अध्यक्ष रोहित पोळ आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांनी दिली. पुणे शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन नवा पायंडा पाडण्यासाठी ही चळवळ पुढे चालवण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (एकत्रित मिरवणूक काढण्याचा गणेशोत्सव मंडळांचा निर्णय स्तुत्य आहे. अन्य मंडळांनीही त्याचे अनुकरण करणे आवश्यक ! – संपादक)
येवले यांनी सांगितले की, १९ सप्टेंबरला दुपारी १ ते सायंकाळी ५ या कालावधीत मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात १० सहस्र नागरिक सहभागी होणार आहेत. गणेशोत्सवात स्वच्छता कर्मचारी आणि खेळाडू यांचा सन्मान करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला विनामूल्य आरोग्य शिबिरात मधुमेह आणि मूत्रपिंड यांची पडताळणी करण्यात येणार आहे.