श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध का ?
‘श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध’, असे पंचांगशास्त्र सांगते. मानवी अभ्यासाच्या दृष्टीकोनातून चंद्रदर्शन निषेध का सांगितला आहे ? याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मानवी शरीर आणि मन यांचा चंद्राशी असलेला संबंध
मानवी शरीर ७० टक्के जलमय आहे. या जलाचा चंद्राशी अतिशय जवळचा संबंध आहे. निसर्गानुरूप समुद्राला भरती आणि ओहोटी येते. याचाही चंद्राशी संबंध येतो. मनाच्या लहरी वायुतत्त्वानुसार पालटत असतात; म्हणूनच मन चंचल आहे. ही पूर्वजांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. मनाचाही चंद्रलहरींशी संबंध असतो. विशेषतः चंद्राचा गुणधर्म शीतलता हा आहे, तसेच मानवी दृष्टीकोनातून शीतलता याचा शब्दश: अर्थ स्वस्थ आणि स्वास्थ्य हाच आहे, म्हणजेच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती ! याच आरोग्यसंपदेवर आपल्या जीवनप्रवासाच्या संघर्षात मानवी जिवाला स्वस्थ आणि स्वास्थ्य यांचा सहवास लाभदायी आहे.
२. श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध असण्यामागील कारण
आपणास माहिती आहे की, ‘वर्षातून केवळ एकदाच भाद्रपद शुक्ल चतुर्थी या तिथीला येणार्या श्री गणेशचतुर्थीलाच चंद्रदर्शन निषेध’, असे सांगितले आहे. याचे अजून एक कारण, म्हणजे चंद्राचे तेज (शीतलता) याच दिवशी पृथ्वीतलावर अवतरित होत असते. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात प्राणप्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशाच्या भाळी चंद्र विराजमान असतो. आकाशातील चंद्राच्या शीतल वायुलहरी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी प्रसव (टीप) होऊन श्री गणेशमूर्तीच्या भाळी असलेल्या चंद्रकोरीत विराजमान होतात. यास्तव त्या दिवशी घरातील सर्व मंडळींनी प्राणप्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशमूर्तीसमोर बसावे आणि अधिकाधिक वेळ नामस्मरण करावे. यामुळे आपणास घरातच चंद्र आणि श्री गणेश यांच्या लहरींचा लाभ होतो.
मनाचे कार्य हे सतत विचार करणे असे आहे. या दिवशी चंद्राकडून प्रसव स्वरूपात पृथ्वीवर येणारे तेज (शीतलता) येत असते. आपण नाना प्रकारचे विचार आणि शंका यांनी युक्त अशा मनाने चंद्रदर्शन घेतल्यामुळे बाधित होते. यामुळे ते तेज सहजरित्या पृथ्वीपर्यंत पोचण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचे फळ म्हणून आपणास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वर सांगितल्याप्रमाणे शंकाग्रस्त मन, म्हणजे दुसरे तिसरे काही नसून निव्वळ भीती आहे.
पुराणात सांगितल्यानुसार श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्यावर चोरीचा आळ येतो. याचा शब्दश: अर्थ म्हणजे मन शंकाग्रस्त होणे, म्हणजेच संशयाला आमंत्रण होय. संशय हेच भीतीचे दुसरे रूप आहे. तिच भीती म्हणजेच मनावरचे दडपण (ताप) आहे. म्हणूनच श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध असे सांगितलेले आहे.
– सोमयाजी श्री. प्रकाश आपटे, म्हापसा, गोवा.
टीप : ‘प्रसव’ या शब्दाचा अर्थ : निसर्ग नियमांनुसार मांजरी, श्वान हे घरगुती प्राणीही विणीच्या प्रसव काळात कुणाच्याही दृष्टीस येत नाहीत. (म्हणजे विणीच्या आधी ४ घंटे आणि प्रसव झाल्यावर पुढील ६ घंटे.)