प्रसिद्धीमाध्यमे निरपेक्ष हवीत !
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याला मागील वर्षी अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या वेळी आर्यनच्या सुटकेसाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे (‘एन्.सी.बी.’चे) तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान याच्याकडून २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात ‘सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल’ने एक महत्त्वाचा निकाल देत ‘एन्.सी.बी.’चे अधिकारी वानखेडे निर्दोष असल्याचे सांगितले आहे. हे वृत्त एका प्रथितयश वृत्तपत्रात अत्यंत त्रोटकपणे छापण्यात आले. प्रत्यक्षात वानखेडे यांंनी कॉर्डेलिया नावाच्या क्रूझवर केलेली कारवाई आणि आर्यन खान याला झालेली अटक, तसेच समीर वानखेडे यांच्यावर झालेले आरोप या वृत्तांना सर्वच वृत्तपत्रांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. वृत्तवाहिन्यांनी तर या घटनाक्रमाचे वर्णन रंगवून रंगवून प्रसारित केली आणि वाढीव ‘टी.आर्.पी.’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स), म्हणजेच दूरचित्रवाणी श्रेणी गुणही मिळवले; मात्र समीर वानखेडे निर्दोष असल्याच्या निकालाचे वृत्त फारच न्यून प्रमाणात प्रकाशित केले.
यामध्ये वानखेडे यांचे अन्य काही चुकीचे असेल, तर तेही माध्यमे सांगू शकतात; परंतु वरील वृत्ताला योग्य प्रसिद्धी देणे अपेक्षित होते. कुठल्याही घटनेची पार्श्वभूमी, त्यातील वस्तूस्थिती, घटनेतील दोनही पक्षांची बाजू, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाययोजना या गोष्टी समाजमनाला समजावणे, हाच तर पत्रकारितेचा मूळ उद्देश आहे. वरील घटना हे एक उदाहरण झाले; परंतु कित्येक घटनांत हीच स्थिती आढळून येते. सध्या सर्वच प्रसिद्धीमाध्यमांनी त्याच्या मूळ उद्देशापासून फारकत घेतलेली दिसते. समाजातील वास्तव समाजापर्यंत पोचवणे, समाजमन घडवणे यांसाठी प्रसिद्धीमाध्यमांनी कार्यरत होणे अपेक्षित आहे. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या समाजाचा चौथा स्तंभ आहेत, त्यांनी त्यांची भूमिका निरपेक्षपणे बजावली पाहिजे, हीच जनतेची अपेक्षा आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, फोंडा, गोवा.