‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा
दाबोळी येथील हिंदु विद्यार्थ्यांना मशीद दर्शन घडवल्याचे प्रकरण
वास्को, १४ सप्टेंबर (वार्ता.) – तुर्कीये येथील ‘टुगवा’ या आंतकवादी संघटनेशी सलंग्नित असलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला गोव्यात कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी करीत आहोत. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वापर आपले इस्पित साध्य करण्यासाठी करणारे विद्यालयाचे निलंबित प्राचार्य शंकर गावकर यांना सेवेतून बडतर्फ करावे. विद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ विसर्जित करावे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी विद्यालयावर प्रशासक नेमावा. विद्यालयाचे व्यवस्थापक आणि हिंदु विद्यार्थ्यांना मशीद दर्शन कार्यक्रमात सहभागी करण्याच्या कृतीमध्ये सहभागी असलेल्या विद्यालयाचे व्यवस्थापक अन् शिक्षिका यांना सेवेतून निलंबित करावे. विद्यालयाला निधी कोण पुरवतो ? याचे अन्वेषण करावे. विद्यालयाच्या भूमीचे मालक पांडुरंग गावकर आदींचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) वतीने अन्वेषण करावे, अशा मागण्या विश्व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्यांनी वास्को येथे १४ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केल्या. या पत्रकार परिषदेला विहिंपचे विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर, दक्षिण गोवा सहमंत्री श्री. संजू कोरगावकर, पदाधिकारी श्री. परशुराम शेट्ये आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत पुढील सूत्रे मांडण्यात आली –
प्राचार्य शंकर गावकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्यानंतर ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ने एक पत्रकार परिषद घेऊन धार्मिक सौहार्द निर्माण करण्यासाठी मशीद दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे म्हटले. या पत्रकार परिषदेचे वृत्त एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक खात्यावर पत्रकार परिषदेत उपस्थित वक्त्यांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध झाले. विद्यालयाच्या व्यवस्थापनाने या वृत्तवाहिनीच्या वृत्ताची ‘पोस्ट’ शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘व्हॉट्सॲप’ खात्यावरील ‘स्टेटस्’मध्ये आणि ‘फेसबुक’ खात्यामधील ‘कव्हर पेज’वर ठेवण्यास सांगितले. आतंकवादी संघटनेशी निगडित संघटनेची माहिती शिक्षक आणि मुले यांच्या सामाजिक माध्यमांतील खात्यावर प्रसारित करण्यास लावणे, ही एक गंभीर गोष्ट आहे. यानंतर १३ सप्टेंबर या दिवशी शाळेच्या गणवेशामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या महामार्गाच्या बाजूला उभे करून विद्यार्थ्यांचा विद्यालयाला पाठिंबा असल्याचे वदवून घेण्यात आले. ही मुले कुणाच्या सांगण्यावरून रस्त्यावर आली ? त्यांच्या सुरक्षेचे दायित्व कुणाकडे आहे ? यानंतर १४ सप्टेंबर या दिवशी विद्यालयातील एकाच धर्मातील सुमारे १०० माजी विद्यार्थी मशीद दर्शनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गेले. या वेळी माजी विद्यार्थिनी बुरखा घालून आल्या होत्या. एकाच धर्मातील माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुणी पाठवले ? असे प्रश्न विहिंपचे दक्षिण गोवा सहमंत्री श्री. संजू कोरगावकर यांनी उपस्थित केले.
अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच उद्देश !
धार्मिक सलोखा राखणे नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’चा उद्देश आहे. ही संघटना कुराणावरील सिद्धांतानुसार चालते. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी माजी खासदार तेजस्वी सूर्या यांनी यापूर्वी केलेली आहे. या संघटनेविषयीची तक्रार मुख्यमंत्री कार्यालय, केंद्रीय शिक्षण मंत्री, पंतप्रधान कार्यालय आदींना पाठवण्यात आली आहे, असे पदाधिकारी श्री. परशुराम शेट्ये यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकादाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ विसर्जित करून त्यावर प्रशासक नेमा ! |
हे ही वाचा आणि पहा –
♦ गोवा : विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई होण्याची शक्यता
https://sanatanprabhat.org/marathi/720020.html