संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पुणे येथील शास्त्रीय गायक कै. (पं.) गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९१ वर्षे) !
सतत संगीताच्या अनुसंधानात असणारे आणि संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले शास्त्रीय गायक कै. (पं.) गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९१ वर्षे) !
पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर यांचा थोडक्यात परिचय
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर म्हणजे संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व ! पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर हे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे नातू आहेत. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर हे श्री. चिंतामणराव पलुस्कर यांचे काका आहेत. पं. गोविंदरावांचे वडील श्री. चिंतामणराव हे लहानपणापासून त्यांचे चुलत भाऊ पं. दत्तात्रेय विष्णु पलुस्कर यांच्याकडे रहायचे. ते पं. दत्तात्रेय पलुस्कर यांच्याकडेच संगीत शिकले आहेत. पं. गोविंदराव पलुस्कर यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांचे वडील श्री. चिंतामणराव पलुस्कर हेच त्यांचे संगीतातील गुरु आहेत. वडिलांप्रमाणेच पं. गोविंदराव पलुस्कर यांनीही सगळे जीवन संगीतासाठी समर्पित केले आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी वर्ष २०१९ मध्ये त्यांची नाशिक येथे भेट घेतली. त्या वेळी ‘पं. पलुस्कर यांनी संगीताविषयीची काही मौलिक सूत्रेे सांगितली होती.
६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर व्यक्त केलेले मनोगत !४.१०.२०१९ या शारदीय नवरात्रातील षष्ठीच्या दिवशी नाशिक येथील महामहोपाध्याय पं. गोविंदराव पलुस्कर यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत एका अनौपचारिक सोहळ्यात पं. गोविंदराव पलुस्कर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या समन्वयक सुश्री. कु. तेजल पात्रीकर यांनी दिली. ही आनंदवार्ता ऐकून पं. पलुस्कर निःस्तब्ध झाले. काही वेळ ते केवळ हात जोडून शरणागत मुद्रेत होते. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘मला ‘काय व्यक्त करावे ?’, तेच कळत नाही. मी ठरवून, जाणूनबुजून काही केलेले नाही. भक्तीमार्गी ज्याप्रमाणे आपोआप ईश्वराकडे जातोच, तसेच संगीत विद्या आपल्याला सहजतेने ईश्वराकडे घेऊन जाते.’’ – सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर |
संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व पुणे येथील पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर यांना दिनांक ६.९.२०२३ या दिवशी पुणे येथील त्यांच्या रहात्या घरी देवाज्ञा झाली. दिनांक १५.९.२०२३ या दिवशी त्यांचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. पं. गोविंदराव पलुस्कर यांनी संगीताविषयी सांगितलेली मौलिक सूत्रे
१ अ. संतांच्या रचना ऐकल्याने दुर्गुण आणि अहंकार न्यून होऊन मन भक्तीभावाकडे वळणे : भारतीय संगीताला ‘गानयोग’ किंवा ‘नादोपासना’, असे म्हटले जाते. दुर्गुण आणि अहंकार जाण्यासाठी संतांच्या रचना ऐकाव्यात. संत तुलसीदासांच्या रचना भक्तीभावयुक्त आहेत. त्या ऐकल्यावर मन हळूहळू भक्तीभावाकडे वळायला लागते, तसेच मोह दूर व्हायला लागतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही; कारण मनात भक्ती असेल, तर संगीत साधना आपोआप होते.
१ आ. गायनाने भावानुभूती येण्यासाठी गाण्यातील शब्दांचे अर्थ कळणे आवश्यक असणे : गातांना शब्दांचे अर्थ लक्षात घेतले, तर त्यातील भाव कळून तशी भावानुभूती येते. उदाहरण सांगायचे झाले, तर ‘ठुमक चलत रामचंद्र…’ या संत तुलसीदासरचित भजनात बाल श्रीरामाचे वर्णन केले आहे. हे गातांना त्या शब्दांचे अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदा. रामाच्या पायांतील पैंजण हळूवार वाजत आहेत, बाल श्रीराम चालतांना पडत असतांना माता कौसल्या त्याला धरत आहे. अशा प्रकारे तो प्रसंग आठवून शब्दांचे अर्थ समजून घेतले, तर भावजागृती होऊन तशा अनुभूतीही येतील.
२. पं. गोविंद पलुस्कर यांनी आताच्या कलाकारांविषयी व्यक्त केलेली खंत !
२ अ. पूर्वीच्या काळी पैशांपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरूंकडून संगीत शिकण्याची तळमळ आताच्या तुलनेत अधिक असणे : पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांमध्ये संगीत शिकण्याची जी तळमळ होती, तसेच त्यांचा संगीताकडे बघण्याचा जो भाव होता, तो काही अपवाद वगळता आधुनिक पिढीत बघायला मिळत नाही. प्राचीन काळी ४ – ५ शिष्य शिकायला एकत्र बसायचे. संगीत भक्तीमार्गी असल्याने त्या काळी पैशांपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व होते.
३. पं. गोविंदराव पलुस्कर यांना संगीत साधनेच्या संदर्भात आलेली अनुभूती
संगीतामुळे रक्तदाबाचा त्रास उणावल्यावर आधुनिक वैद्यांनी गोळ्यांची आवश्यकता नसल्याचे सांगणे आणि संगीतामुळे प्रकृती नेहमी चांगली असणे : काही दिवसांपूर्वी मला रक्तदाबाच्या त्रासासाठी आधुनिक वैद्यांनी काही औषधे दिली होती. त्या औषधांच्या समवेत माझे संगीतही चालू होते. काही कालावधीनंतर मी पुन्हा आधुनिक वैद्यांकडे जाऊन तपासणी केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आता तुम्हाला गोळ्यांची आवश्यकता नाही !’’ संगीतामुळे आता या वयातही मला केवळ तीन गोळ्या चालू आहेत. माझी प्रकृती ठणठणीत आहे. सूर माझ्या रोमारोमांत भरले आहेत. त्यामुळे मला ताप येत नाही. पहिल्यापेक्षा माझ्यात शक्ती जरी अल्प असली, तरी माझ्या मनातून संगीत जात नाही.’’
४. पं. गोविंदराव पलुस्कर यांची इतरांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
४ अ. पं. गोविंदराव पलुस्कर यांची त्यांच्या पत्नी सौ. शालिनी गोविंदराव पलुस्कर यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. ‘पं. पलुस्कर सकाळी उठून नियमाने स्वरसाधना (संगीताचा सराव) करूनच कार्यालयात जायचे.
२. घरात आणि बाहेरही समान वागणूक असणे : अनेक कलाकारांचे वागणे बाहेर (समाजात वावरतांना किंवा कार्यक्रमांत) वेगळे असते, तर घरी त्यांचे स्वभावदोष (चिडचिडेपणा इत्यादी) दिसून येतात; मात्र पं. पलुस्करांचे असे नाही. ते घरीही तेवढ्याच प्रेमाने वागतात. बाहेर एक आणि घरी एक, असे त्यांचे वागणे नसते.
३. नम्रता आणि अल्प अहं : पं. पलुस्करांकडे ज्ञानाचे भांडार असले, तरी त्यांच्यात विनम्रता आहे. तो त्यांचा स्वभावच आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांना जमले नाही, तर ते नम्रतेने सांगतात, ‘‘मी याचे उत्तर वाचून सांगतो.’’ तसे सांगतांना त्यांना संकोच वाटत नाही.’
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |