लक्षावधी हिंदूंच्या हृदयात विराजमान असलेली ‘गीता प्रेस’ !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील ‘गीता प्रेस’च्या (मुद्रणालयाच्या) शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने…
१. गीता प्रेसच्या स्थापनेची पार्श्वभूमी
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची ही घटना आहे. कोलकात्याचे एक प्रसिद्ध व्यापारी जयदयाल गोयंका यांनी लोकांना वाचायला मिळावी म्हणून एका छापखान्यातून (‘प्रिंटींग प्रेस’मधून) ‘गीता’ छापून घेतली; परंतु छापून आलेल्या गीतेच्या पुस्तिकेत शुद्धलेखनाच्या असंख्य चुका होत्या. ते पाहून गोयंका अत्यंत अस्वस्थ झाले. ते छापखान्याच्या मालकाला जाऊन भेटले आणि पुस्तकातील शुद्धलेखनाच्या चुका त्याला दाखवल्या. तेव्हा छापखान्याचे मालक गोयंका यांना म्हणाला, ‘‘जर एवढी शुद्ध गीता छापून हवी असेल, तर तुम्ही स्वतःची प्रिंटिंग प्रेस काढा.’’ गोयंका यांनी ‘हा भगवंताने दिलेला आदेश आहे’, असे मानले. ‘कोणत्याही शुद्धलेखनाच्या चुका नसलेले धार्मिक साहित्य लोकांना अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून द्यायचे’, असा हेतू मनात बाळगून त्यांनी छापखाना काढायचे ठरवले.
गोरखपूरचे मोठे व्यापारी घनश्यामदास जालान यांच्याशी बोलतांना गोयंका यांनी त्यांच्या मनातील हा विचार बोलून दाखवला. त्यानंतर जयदयाल गोयंका, घनश्यामदास जालान आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी २९ एप्रिल १९२३ या दिवशी गोरखपूरमधील उर्दू बाजारात १० रुपये भाडे असलेल्या एका घरात ‘गीता प्रेस’ला प्रारंभ केला. ‘गीता प्रेस’ने १०० वर्षांच्या अविरत परिश्रमाने एका तीर्थक्षेत्राचे स्थान प्राप्त केले आहे. गोरखपूरला येणारी प्रत्येक व्यक्ती एकदा तरी गीता प्रेसला भेट दिल्याविना जात नाही. या मागचे कारण, म्हणजे गीता प्रेसची अफाट लोकप्रियता !
२. गीता प्रेसने केलेले कार्य
गीता प्रेसने ५ सहस्र टन कागदावर ‘भगवद़्गीता’, ‘रामचरित मानस’ आणि असंख्य धार्मिक ग्रंथांची छपाई केलेली आहे. अन्य प्रकाशकांनी ग्रंथ छापण्यासाठी जेवढा कागदाचा वापर केला असेल, त्यापेक्षा हा वापर २० पट अधिक आहे. ‘भगवद़्गीता’ आणि ‘रामचरित मानस’ या व्यतिरिक्त अन्य २ सहस्र पुस्तकांच्या ६१ कोटी प्रती छापल्या आहेत. केवळ भगवद़्गीतेच्या १०० हून अधिक आकाराच्या आणि विविध प्रकारच्या १२ कोटी प्रती छापून झाल्या आहेत. गीता प्रेसने चालू केलेल्या ‘कल्याण’ या मासिकाचे पहिले संपादक थोर समाजसेवक हनुमान प्रसाद पोद्दार हे होते.
३. गीता प्रेसचा उद्देश
‘गीता प्रेस’ने तिच्या कामातील सात्त्विकता जपण्यासाठी काही नियम प्रारंभीपासून केले होते. ‘गीता प्रेसचा उद्देश हा कधीही लाभ कमावणे असणार नाही. गीता प्रेस कधीही देणगी घेणार नाही. देणगी घेतली की, देणगीदाराचे काही प्रमाणात का होईना, मिंधेपण हे येतेच. त्याचा संपादकीय निष्ठेवर दबाव पडू शकतो’, असे गीता प्रेस चालवणार्यांचे विचार होते. असे असूनही गीता प्रेस पुस्तकांचे मूल्य येणार्या खर्चापेक्षा न्यूनच ठेवत आलेले आहे.
गीता प्रेसच्या पुस्तकांचे मूल्य या इतर प्रकाशकांच्या पुस्तकांच्या किमतीपेक्षा ४० ते ९० टक्के अल्पच असतात. आजही ‘भगवद़्गीता’ किंवा ‘रामचरित मानस’ची आवृत्ती १० ते १०० रुपयात मिळते. गीता प्रेसच्या ‘हनुमान चालीसा’ किंमत केवळ २ रुपये आहे. लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी ४० ते ५० लाख प्रती छापाव्या लागतात. पुस्तके अल्प किमतीमध्ये विकली जातात; म्हणून त्यांच्या दर्जात कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यांची छपाई उत्तम असते आणि शुद्धलेखनाच्या चुकाही नसतात. अन्य भाषेतील पुस्तकेही योग्य प्रकारे भाषांतरित केलेली असतात आणि अत्यंत अल्प मूल्यांमध्ये ती वाचकांपर्यंत पोचवली जातात.
४. गीता प्रेसविषयी मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
देशातील अनेक मान्यवरांनी गीता प्रेसचा वेळोवेळी गौरव केलेला आहे.
अ. संत मोरारी बापू एकदा म्हणाले होते, ‘‘गीता प्रेसला राष्ट्रात सन्मानित होण्याचा सर्वांत अधिक अधिकार आहे.’’
आ. वर्ष १९९२ मध्ये उत्तरप्रदेशचे राज्यपाल बी. सत्यनारायण रेड्डी यांनी एका कार्यक्रमात सांगितले, ‘‘गीता प्रेसची काडेपेटीच्या आकारातील भगवद़्गीता गेली ३८ वर्षे मी सातत्याने खिशात बाळगत असतो.’’
इ. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दुराई स्वामी यांनी गीता प्रेसला भेट दिली. त्या वेळी त्यांनी तेथील नोंदवहीमध्ये लिहिले, ‘गीता प्रेसमध्ये येणे, ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.’
५. लोकांना योग्य मार्ग दाखवणारी एक संघटना म्हणजे गीता प्रेस !
‘गीता प्रेसला एक ‘प्रिंटिंग प्रेस’ (मुद्रणालय) समजणे’, हे अन्यायकारक ठरेल. खरे म्हणजे या संस्थेने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. गीता प्रेसच्या कामाकडे पाहिल्यावर लक्षात येते की, ही संस्था अन्य संस्थांप्रमाणे लाभ कमावणारी संस्था नाही, तर लोकांना योग्य मार्ग दाखवणारी एक संघटना आहे आणि म्हणूनच गीता प्रेसची जगभरात वेगळी ओळख आहे. गीता प्रेस कोणतेही शासकीय अनुदान घेत नाही. लाभासाठी गीता प्रेस काम करत नाही. प्रेसमध्ये प्रतिदिन ५० सहस्र पुस्तके छापली जातात. आजपर्यंत अनुमाने ५८ कोटी २५ लाख पुस्तके प्रकाशित केली आहेत.
(साभार : साप्तहिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’)