पुणे येथे अवैध ‘होर्डिंग’ उभारणी प्रकरणी महापालिकेतील ३ निरीक्षक निलंबित !

पुणे – शहरातील नदीपात्रामध्‍ये नियमांचे उल्लंघन, तसेच वृक्षतोड करून ‘होर्डिंग’ (विज्ञापन फलक) लावल्‍याचा प्रकार उघड झाला आहे. प्रसारमाध्‍यमांमध्‍ये त्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाल्‍यानंतर महापालिका प्रशासनाने त्‍याची प्रत्‍यक्ष पहाणी केली असता त्‍यामध्‍ये अनेक त्रुटी आढळून आल्‍या. या प्रकरणी कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील निरीक्षक राजेंद्र केवटे, राजेंद्र राऊत आणि लक्ष्मीकांत शिंदे या ३ अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्‍यात आली. निलंबनाचे आदेश महापालिकेच्‍या ‘अनुमती आणि आकाशचिन्‍ह विभागा’चे उपायुक्‍त माधव जगताप यांनी काढले आहेत. (निलंबन नको, तर बडतर्फ करा ! – संपादक) संभाजी पोलीस चौकीच्‍या पाठीमागील नदीपात्रामध्‍ये नीलेश चव्‍हाण यांनी नियमांचे उल्लंघन, वृक्षतोड करून हे ‘होर्डिंग’ उभारले होते. ३ होर्डिंग लावण्‍याची अनुमती असतांना एकच १०० फुटी होर्डिंग उभारणे, पुलाच्‍या भरावाला छेद देणे, जागेचा मोजणी नकाशा नसणे, अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची नावे नसणे अशा आक्षेपार्ह त्रुटी आढळल्‍या.