विद्यार्थ्यांच्या ‘मशीद दर्शन’ प्रकरणाचे जिहादच्या दृष्टीकोनातून सखोल अन्वेषण होणे आवश्यक ! – हिंदु रक्षा महाआघाडी
गोवा राज्यामधील मुरगाव तालुक्यातील प्रथम दाबोळीचे केशव स्मृती उच्च माध्यमिक आणि आता पाठोपाठ बायणा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांमधील हिंदु विद्यार्थी-विद्यार्थिनींना मशिदीत नेऊन तेथील ८ मौलवींच्या मार्गदर्शनानुसार इस्लाम पंथाचे धार्मिक विधी करायला लावल्याचे प्रकार एका पाठोपाठ एक उघडकीस यायला लागले आहेत. ही गोष्ट केवळ पालक आणि शाळांपुरतीच गंभीर नसून ती गोव्यातील राष्ट्रीयतेविषयी चिंताजनक बनलेली आहे.
केंद्रीय यंत्रणेने वास्को येथे वास्तव्य असलेल्या जिहादी आतंकवाद्याला पकडण्यासाठी पहाटे धाड घातली होती. आगाऊ खबर मिळाल्याने तो तेथून निसटला, तरी त्या जिहाद्याला अन्यत्र अटक झाली होती. केंद्र सरकारने देशद्रोही कारवाया करत असल्यावरून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’, या गोव्यातही सक्रीय असलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेवर बंदी घातलेली आहे. गोव्यात पी.एफ्.आय.च्या सुमारे २५ जणांची धरपकड करण्यात आली होती.
१. बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अन्य संस्थेच्या नावाने कार्य करणे
आश्चर्य म्हणजे बंदी घातलेल्या पी.एफ्.आय. संघटनेचीच एक उपसंस्था म्हणून वेगळे नाव धारण करून काम करणार्या ‘स्टुडंट्स् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन नमाज पढण्यापासून ते मुलींना हिजाब घालायला लावेपर्यंतची इस्लामिक धार्मिक कृत्ये करवून घेण्यात आली’, हे सूत्र या घटनांमागील चिंतेचे मूलभूत प्रमुख सूत्र आहे, हे स्पष्ट आहे.
पी.एफ्.आय. ही संघटना पूर्वीची घातक आतंकवादी संघटना ‘सिमी’वर सरकारने बंदी घातल्यानंतर अस्तित्वात आली. आता पी.एफ्.आय.वरही देशद्रोहाच्या आणि आतंकवादाच्या आरोपाखाली बंदी आल्यावर हेच कार्यकर्ते वेगवेगळ्या नावाने गोव्यातही कार्यरत आहेत, हे सरकारला ठाऊक असलेच पाहिजे. या जिहादी कार्यकर्त्यांना विविध राजकीय नेत्यांचा पाठिंबा असतो; म्हणूनच ते पुन्हा कार्यरत होऊ शकतात.
२. मोठे कारस्थान वाटण्याची कारणे आणि कारवाईची मागणी !
अ. शाळेतील अन्य सर्व कार्यक्रम शाळा व्यवस्थापनाद्वारे शिक्षण खात्याच्या अनुमतीने होतात. याच संदर्भात आयोजकांनी अनुमती घेतली नाही. कोणत्याही अन्य पंथीय प्रार्थनास्थळात अन्य पंथाचे धार्मिक विधी साग्रसंगीतपणे विद्यार्थ्यांकडून मौलवींच्या मार्गदर्शनाखाली करवून घेणे, हा जोखमीचा भाग आहे, एवढी अक्कल शिक्षक आणि प्राचार्य यांना असलीच पाहिजे ना ?
हे साधे प्रकरण नाही. यात शाळेतीलच कुणीतरी गद्दार आहेत आणि स्टुडंट्स् इस्लामिक ऑर्गनायझेशनला सामील आहेत. मुसलमान युवकांना ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींना जाळ्यात पकडण्यासाठी मशिदींतून २ ते ५ लाख रुपये दिले जातात. मौल्यवान भेटी आणि दुचाकी, तसेच फिरवण्यासाठी भत्ते दिले जातात. मुलींना फूस लावून धर्मांतर करून नंतर त्यांचे काय केले जाते, यासंबंधी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाने आपले डोळे उघडले नाहीत का ?
आ. निरनिराळ्या प्रकारची लाच देऊन आता सरळ सरळ शाळाच ‘स्कूल जिहाद’ला फसू लागल्या आहेत, हे स्पष्ट आहे. सरकारी शाळा यात सहभागी झाल्यामुळे सरकारने ‘जिहादच्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण योग्य यंत्रणेद्वारे करावे. आतंकवादी विचारसरणीच्या पी.एफ्.आय.च्या गोव्यातील ‘स्टुडंट्स् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेच्या पदाधिकार्यांची कसून चौकशी करावी आणि कठोरातील कठोर कारवाई करावी’, ही हिंदु रक्षा महाआघाडीची मागणी आहे.
नुसत्या निलंबनाने हे प्रकरण सोडवण्यासारखे नाही, हे लक्षात ठेवून व्यवस्थापन आणि सरकार यांनी तातडीने हालचाली कराव्यात, ही अपेक्षा !
(१२.९.२०२३)
– प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा.