कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल ही पूर्वनियोजित नव्हती !
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांची साक्ष !
पुणे – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ या दिवशी झालेली दंगल ही पूर्वनियोजित नव्हती. दंगल घडवून आणण्यासाठी कुणा व्यक्तीचे किंवा कोणत्याही संघटनेचे दायित्व निश्चित करणे अवघड आहे. त्या वेळी भीमा नदीपुलावर जमलेल्या जमावाला पोलिसांनी पेरणे फाट्याकडे जाण्यापासून रोखले. त्यामुळे परिस्थिती बिकट होण्यापासून वाचली, अशी साक्ष शिक्रापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिली. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात ‘कोरेगाव भीमा आयोगा’चे अध्यक्ष जे.एन्. पटेल आणि सदस्य सुमित मलिक यांच्या २ सदस्यीय आयोगासमोर ही साक्ष नोंदवली आहे.
गलांडे म्हणाले की, जमावाला पुलावर रोखल्याने जीवितहानी आणि मालमत्तेची हानी टाळण्यात आम्हाला यश आले. १ जानेवारी २०१८ या दिवशी ‘विजयस्तंभ’ येथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या आमच्या अपेक्षेप्रमाणे होती; मात्र दंगल होईल, अशी माहिती पोलिसांना नव्हती.
१६ सप्टेंबर या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उलटतपासणी होणार आहे, तसेच या प्रकरणी इतर काही जणांचीही उलटतपासणी होण्याची शक्यता आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. कोरेगाव भीमा दंगलीची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली नाही. ही माहिती अनेकांनी दाबून ठेवली. या दंगलीमध्ये प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे. ही दंगल मनुवादी विचारांच्या लोकांनी म्हणजे ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे अध्यक्ष पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घडवून आणली असल्याचा आरोप करण्यात आला होता.