श्री गणेशचतुर्थीच्या काळात फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंध
पणजी – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने श्री गणेशचतुर्थीच्या काळात रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्यास प्रतिबंध केला आहे. या विषयावरील याचिकांच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने फटाके वापरण्यास निर्बंध घातले आहेत.
या आदेशानुसार, उत्तर गोवा पशूक्रूरता प्रतिबंधक जिल्हा सोसायटीने श्री गणेशचतुर्थी, दिवाळी आणि यांसारख्या सणांच्या प्रसंगी रात्री ८ ते रात्री १० या वेळेत फटाके वापरण्यास प्रतिबंध केला आहे. इतर सण ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षासाठी रात्री ११.५५ ते १२.३० पर्यंत प्रतिबंध आहे. (ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षासाठी रात्री १२ नंतर प्रतिबंध आणि हिंदूंच्या सणांवेळी रात्री ८ ते रात्री १० असा वेगळा नियम का ? मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे कधीही अयोग्यच ! यामुळे प्रदूषण होण्याबरोबरच आजारी, वृद्ध आदींना त्रास होतो. असे असले, तरी एकाच देशात २ धर्मियांसाठी वेगळे नियम का ? – संपादक) बेरियम क्षार वापरणार्या फटाक्यांवर, तसेच एकत्र जोडलेल्या फटाक्यांवर बंदी आहे. कोणत्याही राज्यातील कोणत्याही क्षेत्रात बंदी घातलेले फटाके विकले जाणार नाहीत, उत्पादित केले जाणार नाहीत किंवा वापरले जाणार नाहीत. सर्व राज्य क्षेत्राचे अधीक्षक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी वैयक्तिकरित्या उत्तरदायी असतील, असे शासनाने म्हटले आहे.
हिंदूंचे संघटन आणि धर्मप्रेम जागृत करणारा गणेशोत्सव !
‘गणेशोत्सव’ देशभरात मोठ्या थाटात आणि उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव आहे. अनेक वर्षांपासून गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याशी एक अनोखा संबंध आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे सार्वजनिक पूजन लोकप्रिय करण्याचे श्रेय स्वराज्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जाते. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याला समाजाचा पाठिंबा मिळवून दिला आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या चळवळीला आवश्यक असलेले आध्यात्मिक बळ मिळवले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या दशकात गणेशोत्सवात अनेक अपप्रकार होत आहेत. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रयत्नशील आहे. समिती जनजागृती मोहिमेचे आयोजन आणि गणेशोत्सव मंडळांना आध्यात्मिक स्तरावर उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे’ स्वराज्य मिळवण्यात महत्त्वाचे योगदान होते. आता या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची वेळ आली आहे.
क्लिक करा → https://www.hindujagruti.org/marathi/ganeshotsav