व्यवस्थितपणा आणि प्रेमभाव असलेली रत्नागिरी येथील कु. वैदेही संजय कदम (वय १४ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वैदेही संजय कदम ही या पिढीतील एक आहे !
रत्नागिरी, १३ सप्टेंबर (वार्ता.) – कु. वैदेही उच्च स्वर्गलोकांतून आलेली दैवी बालिका आहे. ती बोलत असतांना सगळ्यांनाच हे अनुभवता आले. तिच्या मनात जे काही आहे, ते ती गुरुदेवांशी बोलण्याचा प्रयत्न करते. महत्त्वाचे म्हणजे गुरुदेव तिला योग्य अशी उत्तरेही देतात. तिच्यात व्यवस्थितपणा, त्यागी वृत्ती, प्रेमभाव असे विविध गुण आहेत. तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद़्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.
१२ सप्टेंबर या दिवशी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाचे भगवान श्री परशुराम सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता घोषित केली. सद़्गुरु सत्यवान कदम यांनी कु. वैदेहीला भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन तिचा सत्कार केला.
प.पू. डॉक्टरांचे प्रतिदिन स्मरण करते ! – कु. वैदेही
आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर शांत आणि प्रसन्न वाटत आहे. प.पू. डॉक्टरांचे प्रतिदिन स्मरण करते. त्यांच्या चरणी प्रार्थना करते की, तुमच्यामुळेच मी मोठी झाले. शाळेत गेल्यानंतर मला ‘इतर मुलींसारखे वागायला जमत नाही’, असे विचार येतात आणि मग गुरुदेवांना विचारणे होते की, मी अशीच का आहे ? मी एकटी एकटीच रहाते. मग गुरुदेव सांगतात की, असे एकटे राहू नये. तूसुद्धा अन्य मुलींसारखी राहू शकतेस; मात्र तुला अधिकाधिक साधना करायची आहे. तू व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवायला पाहिजेत.
सौ. जयश्री कदम (कु. वैदेहीची आई)
कुमारी वैदेही लहानपणापासून गुणी आहे. जन्मापासून आतापर्यंत तिने कधी त्रास दिला नाही. श्री गणेशचतुर्थीला तिचा जन्म झाला. रत्नागिरी सेवाकेंद्रात ती लहानपणापासून जात होती.
श्री. संजय कदम (कु. वैदेहीचे वडील)
कु. वैदेहीसाठी आम्हाला फारसे काही करावे लागले नाही. ‘स्कॉलरशिप’ मिळाल्यावर शिक्षकांनी तिचे पुष्कळ कौतुक केले. ज्या हायस्कूलमध्ये ती शिकली तेथील गणित आणि इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांनी तिच्या वह्या संग्रहात ठेवल्या आहेत अन् विद्यार्थ्यांना त्या पहायलाही देतात. गुरुदेवांच्या कृपेने आजची ही भेट मिळाली, याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
श्रीमती सुनीता बापट, रत्नागिरी
लहानपणी सेवाकेंद्रात आल्यावर कु. वैदेही भातुकलीचा खेळ खेळायची. तेव्हा ती ‘मी संतांना जेवायला वाढते, साधकांना चहा बनवून देते’, असे सांगायची. तिने हट्टीपणा कधी केला नाही.
श्रीमती मंजिरी बेडेकर, रत्नागिरी
कु. वैदेही एकटीच खेळायची. सेवाकेंद्रापासून दूर रहायला गेल्यावरही ती आईसमवेत आल्यावर सर्व साधकांना आवर्जून भेटते. तिचा स्वभाव निरागस आणि शांत आहे.
कु. वैदेही संजय कदम हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. व्यवस्थितपणा : ‘कु. वैदेहीला शाळेच्या वह्या पूर्ण करण्यासाठी ४ दिवसांची समयमर्यादा दिली होती, तरीही तिने सर्व लिखाण व्यवस्थितच केले, उदा. महत्त्वाच्या ओळी अधोरेखित करणे, अक्षर वळणदार काढणे. ती खणामध्ये कपडे व्यवस्थित ठेवते, तसेच धुतलेली भांडी मांडणीत योग्य ठिकाणी आणि व्यवस्थित लावते. ‘तिच्याएवढा व्यवस्थितपणा माझ्यात नाही’, हे माझ्या लक्षात आले.
२. त्यागी वृत्ती : अन्नदान मोहिमेसाठी मी वैदेहीच्या बाबांना अर्पण देण्याविषयी सांगत असतांना वैदेही स्वत:हून म्हणाली, ‘‘आई मीपण अर्पण देते.’’ तिला मिळालेल्या खाऊच्या पैशांतील १०० रु. तिने माझ्याकडे दिले.
३. इतरांना साहाय्य करणे : एकदा सौ. मधुश्री सावंत हिला (कु. वैदेहीच्या बहिणीला) सर्दी झाली होती. त्या वेळी वैदेहीने तिच्या पलंगाभोवती आध्यात्मिक स्तरांवरील उपायांसाठी रिकामे खोके लावले, तसेच उदबत्ती लावली आणि मधुश्रीच्या कपाळाला अन् हाता-पायांना विभूती लावली. तिने घराच्या आवारातून औषधी पाने आणून तिच्यासाठी काढा बनवला आणि आल्याचा रस काढून तिला प्यायला दिला.
४. प्रेमभाव : आमच्या घराशेजारी एक कुटुंब रहाते. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. तिला तिच्या आई-वडिलांविना दुसरे कुणीच नाही. त्या मुलीला तिची आई आमच्या घरी सोडते आणि दुसर्यांचे घरकाम करायला जाते. तेव्हा वैदेही त्या मुलीला चांगली सांभाळते, उदा. त्या मुलीला भरवणे, तिची स्वच्छता करणे. तिने त्या मुलीला ॐ चा, तसेच श्रीराम अन् श्री दत्त या देवतांचे नामजप म्हणायला शिकवले आहेत.’
– सौ. जयश्री संजय कदम (कु. वैदेहीची आई), रत्नागिरी (२०.४.२०२२)