रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर जाणवलेला श्री. पलनिवेल यांचा गुरुमाऊलींप्रतीचा भक्‍तीभाव आणि श्री. पलनिवेल यांनी कृपासिंधु गुरुमाऊलींचा अनुभवलेला वात्‍सल्‍यभाव !

‘श्री. पलनिवेल हे आमचे शिंपी असून गेल्‍या ४ पिढ्यांपासून ते आमचे कपडे शिवत आहेत. मी त्‍यांना सनातन संस्‍थेचे कार्य आणि साधना यांविषयी नेहमी सांगत असते. त्‍यांच्‍या मनात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍याप्रती अपार भाव आहे. २९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत श्री. पलनिवेल त्‍यांची पत्नी आणि मुले यांच्‍यासह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. आश्रमात वास्‍तव्‍यास असतांना त्‍यांना आलेल्‍या अनुभूती ते मला अतिशय भावविभोर होऊन सांगत होते.

१. परात्‍पर गुरुदेवांसाठी झब्‍बा शिवून आणल्‍याचे सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘झब्‍बा घालून दाखवतो’, असे प्रेमाने सांगणे आणि गुरुदेवांचे हे प्रेमळ उद़्‍गार ऐकून आनंदाने भारावून जाणे

श्री. पलनिवेल

आश्रमात असतांना श्री. पलनिवेल यांना परात्‍पर गुरुदेवांचा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्‍संग मिळाला. त्‍या वेळी ते परात्‍पर गुरुदेवांना म्‍हणाले, ‘‘मी तुमचे माप न घेताच तुमच्‍यासाठी एक झब्‍बा शिवून आणला आहे.’’ हे ऐकून परात्‍पर गुरुदेवांनाही आनंद झाला आणि तेही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे त्‍यांना म्‍हणाले, ‘‘अरे व्‍वा, तो झब्‍बा मला द्या. मी आताच तो तुम्‍हाला घालून दाखवतो.’’ गुरुदेवांचे हे प्रेमळ उद़्‍गार ऐकून श्री. पलनिवेल थक्‍क झाले. ते त्‍यांच्‍या आनंदाचे शब्‍दांत वर्णन करू शकले नाहीत. त्‍यांच्‍यासाठी गुरुदेवांचे ते गोड शब्‍दच पुरेसे होते. त्‍या वेळी त्‍यांच्‍या तोंडून केवळ ‘अय्‍यो…’ हेच शब्‍द निघाले.

२. निषादराज गुहनने श्रीरामाच्‍या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करण्‍यासाठी त्‍याची विश्‍वातील अनेक सुंदर गोष्‍टींशी तुलना करणे; मात्र हे वर्णन करण्‍यास असमर्थ असल्‍याचे त्‍याच्‍या लक्षात येणे आणि निःशब्‍द होऊन त्‍याने शेवटी ‘अय्‍यो…’ हा शब्‍द उच्‍चारणे

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

या प्रसंगावरून मला कंब रामायणातील एक श्‍लोक आठवला. निषादराज गुहन जेव्‍हा प्रथमच प्रभु श्रीरामाला भेटला, तेव्‍हा त्‍याची जी भावावस्‍था होती, तिचे वर्णन या श्‍लोकामध्‍ये केले आहे.

मैय्‍योे, मरगदमो, मरि कडलो, मळैमुगिलो ।
अय्‍यो, इवन वडीवेनबदोर अळिया अळगुडैयान ॥

या श्‍लोकात प्रभु श्रीरामाच्‍या सौंदर्याचे वर्णन करतांना निषादराज गुहन म्‍हणतो, ‘डोळ्‍यांत घालायच्‍या दिव्‍य अंजनासारखे (काजळासारखे) हे सौंदर्य आहे, कि एखाद्या मौल्‍यवान पाचूसारखे आहे, कि अतीविशाल सागरासारखे हे सौंदर्य आहे, कि मेघश्‍यामासारखे आहे ? अय्‍यो, या अप्रतिम सौंदर्याचे मी वर्णन कसे करू? ही तर ब्रह्मांडातील सर्वार्ंत सुंदर गोष्‍ट आहे !’

वरील श्‍लोकातून निषादराज गुहनने प्रभु श्रीरामाच्‍या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन केले आहे. त्‍यासाठी त्‍याने विश्‍वातील अनेक सुंदर गोष्‍टींशी श्रीरामाच्‍या सौंदर्याची तुलना केली आहे, तरीही ‘आपण श्रीरामाच्‍या सौंदर्याचे योग्‍य वर्णन करू शकलो का ?’, याविषयी तो साशंक आहे आणि म्‍हणूनच तो शेवटी ‘अय्‍यो…’, हे उद़्‍गार काढतो. हे त्‍याची निःशब्‍द स्‍थिती दर्शवत असून या शब्‍दातूनच त्‍याने सर्वकाही व्‍यक्‍त केले. ‘अय्‍यो’ हा तमिळ शब्‍द असून दुःख, वेदना आणि धक्‍का या भावना व्‍यक्‍त करण्‍यासाठी तो शब्‍द वापरतात. येथे मात्र हा शब्‍द पुरुषोत्तम श्रीरामाच्‍या दिव्‍य दर्शनाचा परमोच्‍च आनंद व्‍यक्‍त करतांना उच्‍चारला आहे. अशा प्रकारे आपणही आपल्‍या प्रीतीस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांकडे आपल्‍या मनातील भाव अनेक प्रकारे आणि अनेक भाषांतून व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्न करतो; परंतु श्री. पलनिवेल यांनी उच्‍चारलेला ‘अय्‍यो’ हा एक शब्‍द त्‍यांच्‍या शब्‍दातीत अवस्‍थेचे वर्णन करतो.

३. ‘श्रीरामाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपात अवतार घेतला आहे आणि गुहन याने पलनिवेल यांच्‍या रूपात पुन्‍हा जन्‍म घेतला आहे’, असे वाटणे

आता कलियुगात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपात अवतार घेतला आहे. मला वाटते, ‘गुहन याने पलनिवेल यांच्‍या रूपात पुन्‍हा जन्‍म घेतला आहे.’ गुहनची प्रभु श्रीरामाशी भेट काही क्षणांची होती, तरी या भेटीचा गुहनवर पुष्‍कळ प्रभाव होता. गुहनला तर श्रीरामाविना जगणेच अशक्‍य झाले होते. त्‍याने श्रीरामाजवळ सेवक म्‍हणून रहाण्‍याची आणि त्‍यांची आजन्‍म सेवा करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. इथे श्री. पलनिवेल यांची अवस्‍थाही तशीच आहे. ते गुरुदेवांच्‍या चरणी केवळ एकच प्रार्थना करत असतात, ‘लवकरात लवकर माझी या व्‍यावहारिक बंधनातून सुटका व्‍हावी आणि मला आश्रमात येऊन गुरुदेवांची पूर्णवेळ सेवा करता यावी.’

४. श्री. पलनिवेल यांनी अनुभवलेला परात्‍पर गुरुमाऊलींचा वात्‍सल्‍यभाव !

श्री. पलनिवेल यांनी त्‍यांना आलेली आणखी एक अनुभूती सांगितली. आश्रमात असतांना त्‍यांनी काही साधकांना त्‍यांची आवडती राजगिर्‍याची पालेभाजी निवडत असतांना पाहिले; परंतु ते जेव्‍हा दुपारचा महाप्रसाद ग्रहण करण्‍यास गेले, तेव्‍हा भाजी संपली होती. त्‍या वेळी ते थोडे निराश झाले; परंतु जेव्‍हा तीच भाजी करून त्‍यांना रात्रीच्‍या महाप्रसादात वाटी भरून वाढण्‍यात आली, तेव्‍हा ते निःशब्‍द झाले. त्‍यांची अनुभूती ऐकल्‍यावर मी त्‍यांना म्‍हणाले, ‘‘केवळ आईच आपले असे लाड करते ना ?’’ यावर ते म्‍हणाले, ‘‘नाही. कदाचित् माझी आईसुद्धा म्‍हणाली असती, ‘आता मी थकले आहे. मी तुला उद्या भाजी करून देते.’ माझी वात्‍सल्‍यसिंधु गुरुमाऊली मात्र माझ्‍यावर माझ्‍या आईपेक्षाही अधिक प्रेम करते.’’

‘हे सच्‍चिदानंद परब्रह्म परात्‍पर गुरुदेवा, हे प्रभो, अशा तुमच्‍या निःस्‍सीम भक्‍तांचा सहवास आमच्‍यासाठी प्रत्‍यक्ष भगवंतापेक्षाही अनमोल आहे. तुम्‍ही आम्‍हाला अशा भक्‍तांच्‍या सहवासात ठेवून सतत शिकण्‍याच्‍या; जे शिकायला मिळाले, ते अंतर्मनावर बिंबवण्‍याच्‍या आणि त्‍यानुसार अनुकरण करण्‍याच्‍या स्‍थितीत ठेवले आहे. जेव्‍हा मी तुमच्‍या भक्‍ताशी संवाद साधते, तेव्‍हा आम्‍ही दोघेही स्‍वतःला विसरून तुमचेच अस्‍तित्‍व अनुभवत असतो.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्‍नई (७.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक