राख (जिल्‍हा पुणे) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे कै. वसंत किसन गायकवाड (वय ७४ वर्षे) यांची त्‍यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली सूत्रे !

‘२.९.२०२३ या दिवशी राख, तालुका पुरंदर, जिल्‍हा पुणे येथील वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. १४.९.२०२३  या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची नगर येथे रहाणारी मोठी मुलगी आणि जावई यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कै. वसंत गायकवाड

१. सौ. धनश्री शिंदे (कै. वसंत किसन गायकवाड यांची मोठी मुलगी), नगर

१ अ. वडील रुग्‍णालयात असतांना तेथे चैतन्‍य जाणवणे : ‘मला एरव्‍ही रुग्‍णालयातील अतीदक्षता विभागात जातांना भीती वाटते; मात्र माझ्‍या बाबांना अतीदक्षता विभागात ठेवले असतांना मला तेथे जातांना जराही भीती वाटली नाही. मला ‘बाबांच्‍या जवळ बसून रहावे’, असे वाटत होते. त्‍या वेळी तेथे मला चैतन्‍य जाणवत होते.

सौ. धनश्री शिंदे

१ आ. त्‍यांचे बोलणे आणि वागणे लहान मुलासारखे वाटत होते.

१ इ. बाबांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका (नर्स) म्‍हणत होते, ‘‘बाबा किती निर्मळ आहेत ! ‘ते स्‍वामी समर्थ आहेत’, असे आम्‍हाला त्‍यांच्‍याकडे पाहून वाटते.

१ ई. बाबांना रुग्‍णालयात नेल्‍यापासून त्‍यांच्‍या दोन्‍ही हातांच्‍या मुद्रा केलेल्‍या होत्‍या. त्‍यांचा अंगठा तर्जनीला जोडलेलाच असायचा.

१ उ. देवाच्‍या अनुसंधानात असणे : त्‍यांना अधून मधून पुष्‍कळ अस्‍वस्‍थ वाटत असे, तरीही ते सतत देवाच्‍या अनुसंधानात राहून नामजप करत असत आणि देवाशी बोलत असत. ते काही वेळा ‘ग्रामदेवता’ असे म्‍हणायचे. काही वेळा ते भजन म्‍हणायचे. त्‍यांचे बोलणे ऐकून आम्‍हाला वाटत असे, ‘बाबांना कुणाकडूनही मार्गदर्शन मिळाले नसतांना अंतसमयी त्‍यांच्‍या मुखात देवाचे नाव कसे येते ?’

१ ऊ. आश्रमात जाण्‍याची ओढ : बाबा ‘आश्रमात जाऊया’, असे म्‍हणत होते. मी त्‍यांना विचारले, ‘‘आश्रमात काय आहे ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘आश्रमात श्रीकृष्‍ण आहे.’’ एकदा त्‍यांना श्रीकृष्‍णाचे चित्र दाखवल्‍यावर त्‍यांनी ते लगेच ओळखले. तेे मध्‍येच ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे चरण दाखव’, असे सांगत असत. त्‍यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्र दाखवल्‍यावर त्‍यांनी हात जोडून नमस्‍कार केला आणि डोळे मिटून घेतले.

१ ए. यातना सहजतेने सहन करणे

१. त्‍यांच्‍याकडे पाहिल्‍यावर ‘त्‍यांना काहीच वेदना होत नाहीत’, असे वाटत होते. ‘ते यातना सहजतेने सहन करत आहेत’, हे पाहून आमचे मन भरून येत होते.

२. आधुनिक वैद्यांनी त्‍यांना ‘बाबा, कसे आहात ?’, असे विचारले असता बाबा मान हलवून ‘हो. बरे आहे’, असे सांगत होते. तेव्‍हा आधुनिक वैद्य म्‍हणाले, ‘‘बाबांना पुष्‍कळ त्रास होत आहे; पण ते किती सहजतेने ‘बरे आहे’, असे म्‍हणत आहेत. ते पुष्‍कळ निर्मळ आहेत.’’

१ ऐ. बाबा बोलू शकत नसतांना खुणा करून आईची (पत्नी सौ. नर्मदा हिची) विचारपूस करत होते. तिच्‍या जेवणाविषयी विचारत होते.

१ ओ. कुटुंबीय साधना करत असल्‍याने त्‍यांनी वडिलांच्‍या मृत्‍यूनंतरची सिद्धता शांततेने करणे : २.९.२०२३ या दिवशी सकाळी ५.४५ वाजता बाबांची प्राणज्‍योत मालवली. नंतर आम्‍ही भ्रमणभाषवर अखंड नामजप लावून ठेवून शांतपणे पुढील व्‍यवस्‍था करत होतो. तेव्‍हा घरी आलेले गावकरी म्‍हणाले, ‘‘एखाद्याच्‍या घरी मृत्‍यू झाल्‍यास रडारड न होता शांततेने पुढची सिद्धता होत असल्‍याचे आम्‍ही प्रथमच पहात आहोत.’’ तेव्‍हा आम्‍ही गावकर्‍यांना साधनेचे महत्त्व सांगितले.

‘हे सर्व अनुभवत असतांना देवाने आमची साधना करून घेतली. आम्‍हाला वडिलांची सेवा करायला मिळाली’, त्‍याबद्दल आम्‍हाला पुष्‍कळ कृतज्ञता वाटते. गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. अण्‍णा शिंदे (कै. वसंत किसन गायकवाड यांचे मोठे जावई), नगर

श्री. अण्‍णा शिंदे

२ अ. सासर्‍यांना रुग्‍णालयात प्राणवायू देण्‍यात येत असतांना ते शांत असणे : ‘माझे सासरे वसंत किसन गायकवाड रुग्‍णाईत असतांना मी त्‍यांना घरी भेटायला गेलो होतो. त्‍यांना दम्‍याचा त्रास होत असल्‍याने त्‍यांचा श्‍वास कोंडत होता. मी त्‍यांना तात्‍काळ रुग्‍णालयात घेऊन गेलो. तेथे त्‍यांना प्राणवायू देण्‍यात येत असतांनाही ते शांत होते.

२ आ. कृष्‍णाकडे जाण्‍याची ओढ लागणे : दुसर्‍या दिवशी त्‍यांना ‘व्‍हेंटिलेटर’ची (कृत्रिम श्‍वास घेण्‍यासाठी लावलेल्‍या यंत्रणेची) आवश्‍यकता भासल्‍याने दुसर्‍या रुग्‍णालयात न्‍यावे लागले. तेथे त्‍यांना थोडे बरे वाटले आणि त्‍यांची स्‍मृती जागृत झाली. ते मोठ्या आवाजात बोलू लागले. ते सतत ‘श्रीकृष्‍ण अन् प.पू. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांच्‍या प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत होते. ‘देवाने, कृष्‍णाने माझ्‍या देहाचे सार्थक केले. मला कृष्‍णाच्‍या घरी, आश्रमात जायचे. मी सर्वांच्‍या आधी देवाच्‍या घरी जाणार’, असे ते मोठ्या आवाजात बोलत होते. दुसर्‍या दिवशीही ते असेच मोठ्याने बोलत होते.

२ इ. सर्वांना साधनेविषयी सांगून देवाकडे क्षमायाचना करणे : ते मला मधूनच मृत्‍यूशय्‍येवर असलेल्‍या भिष्‍मांप्रमाणे जाणवत होते. ते सर्वांना ‘कर्म करत रहा. कर्म हीच साधना आहे’, असे सांगत होते. ते मधूनच ‘देवा, मी चुकलो. मला क्षमा कर’, अशी क्षमायाचनाही करत होते.

‘श्रीकृष्‍णाने माझ्‍याकडून त्‍यांची सेवा करून घेतली’, त्‍याबद्दल मी श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.९.२०२३)