देवद आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !
६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत. १३ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात श्री. वसाने यांच्या साधनेत आल्यानंतरच्या वाटचालीविषयी जाणून घेतले. आज पुढील भाग पाहू.
२. साधनेत आल्यानंतरची वाटचाल
२ ए ३. पू. वटकरकाका यांच्या समवेत सोलापूर येथे प्रसारासाठी पू. रमेश गडकरीकाका आणि (कै.) पू. विनय भावेकाका समवेत असणे : सर्व सेवांचे नियोजन पू. वटकरकाका करायचे. ते प.पू. डॉक्टरांना सेवेचे नियोजन दाखवून त्याप्रमाणे तंतोतंत करवून घेत असत. या कालावधीत श्री. रमेश गडकरीकाका, श्री. भावेकाका हेही कधीकधी आमच्या समवेत असायचे. (आताचे सनातन संस्थेचे १९ वे (समष्टी) संत पू. रमेश गडकरीकाका आणि सनातन संस्थेचे ३५ वे (व्यष्टी) संत (कै.) पू. विनय भावेकाका.) नंतर प.पू. डॉक्टरांची जाहीर सभा सोलापूर येथे झाली. त्यानंतर गुर्वाज्ञेने पू. वटकरकाका यांनी तेथील स्थानिक साधकांकडे सर्व सेवा सोपवल्या.
२ ऐ. मुलगी कु. शिल्पा वसाने हिच्या लग्नासाठी प.पू. डॉ. आठवले यांची उपस्थिती लाभण्यासाठी पू. वटकरकाकांनी प्रयत्न करणे आणि त्याप्रमाणे प.पू. डॉक्टर लग्नासाठी उपस्थित रहाणे : वर्ष १९९८ च्या जानेवारी मासामध्ये माझ्या मुलीचे कु. शिल्पा वसाने हिचे लग्न ठरले. ‘कु. शिल्पाच्या लग्नाला प.पू. डॉक्टरांनी यावे’, अशी आमची सर्वांची इच्छा होती. आम्ही ते पू. वटकरकाका यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘प.पू. अशा कार्यक्रमांना जात नाहीत, तरी आपण प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही देवालाच भावपूर्ण प्रार्थना करत रहा, ‘तुम्ही प्रत्यक्ष येऊन मुलीच्या लग्नाला आशीर्वाद द्या.’’ शिल्पाच्या लग्नाला अजून एक-दीड मास अवधी होता. त्या काळात पू. वटकरकाकांनी प.पू. गुरुदेवांचे प्रसाराचे नियोजन पाहिले आणि आम्हाला सांगितले, ‘‘लग्नाचा दिवस ३०.१.१९९८ असेल, तर त्या दिवशी प.पू. सकाळी कोकणात प्रसारासाठी जाणार आहेत. आपले कार्यालय वाटेवरच असल्याने काही वेळासाठी ते येऊ शकतील. त्यामुळे तुम्ही ३०.१.१९९८ हाच दिवस लग्नासाठी निवडा.’’ आम्ही हे ब्राह्मणाला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा दिवस योग्य आहे. मुहूर्तपण आहे; पण हीच वेळ आणि दिवस का ?’’ तेव्हा त्यांना आम्ही सांगितले, ‘‘आमचे गुरुदेव वधूला आशीर्वाद देण्यासाठी यावेत; म्हणून आम्ही ही वेळ धरतो आहोत.’’
हे सर्व नियोजन पू. वटकरकाका यांनी करून दिले. त्याप्रमाणे प.पू. डॉक्टर कोकणात निघाले असतांना जाता-जाता शिल्पाच्या लग्नासाठी कार्यालयात आले. शिल्पाच्या लग्नासाठी २ घंटे त्यांनी आम्हाला दिले आणि भोजन करून पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.
२ ओ. नोकरी सांभाळून केलेल्या विविध सेवा
१. नवी मुंबई केंद्राची सेवा पहाणारे श्री. सुदीश पुथलत (वर्ष २०२३ मध्ये आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. सुमा पुथलत यांना प.पू. डॉक्टरांनी केरळ येथे प्रसारासाठी पाठवले. त्यामुळे नवी मुंबई केंद्रात प्रसारसेवेची संधी प.पू. डॉक्टरांनी मला दिली. सत्संग घेणे, जाहीर सभेची सिद्धता करणे या सर्व सेवांमधून मला आनंद मिळत गेला. प.पू. डॉक्टरांच्यामुळे माझ्याकडून प्रतिदिन नोकरी सांभाळून ६ – ७ घंटे सेवा होत होती, तसेच मानखुर्द-चेंबुर परिसरातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा आणि प्रत्येक शनिवार-रविवार रात्रीच्या वेळी मुद्रणालयात जाऊन तेथील सेवाही मी करू शकलो.
२. वर्ष २००० ते २००८ पर्यंत प्रतिदिन सकाळी ५ ते ७.२० या वेळेत मी बसस्थानकावरून दैनिक ‘सनातन प्रभात’आणणे आणि त्याचे वितरण करणे ही सेवा करून मी ७.३० वाजता नोकरीसाठी जात होतो.
२ औ. सेवानिवृत्त झाल्यानंतर पनवेल येथे आल्यावर सतत सेवेत रहाणे : ३१.८.२००८ ला मी सेवानिवृत झालो. नंतर पनवेल येथे रहायला आलो. तेथेही (कै.) नंदकुमार मुळ्येकाका (वर्ष २०१६ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्या समवेत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा मिळाली. पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आणि पनवेल केंद्रातही सेवा असे. प.पू. डॉक्टरांनी मला सतत सेवेत ठेवले होेते.
२ अं. पत्नीच्या निधनाच्या वेळी साधकांकडून अनेक गोष्टी शिकणे : वर्ष २०१० मध्ये माझ्या पत्नीचे सौ. हेमलताचे वयाच्या ५६ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. (तिला तीव्र मधुमेह होता. अंतिम समयी तिला काविळ होऊन तिचे यकृत निकामी झाले होते.) त्या वेळी पनवेल येथील सर्व साधक आणि आश्रमातील साधकांचे पुष्कळ साहाय्य मिळाले. यामधे ‘प्रेमभाव कसा असावा ? असा भाव निर्माण होण्यासाठी एकमेकांची मने कशी सांभाळली पाहिजेत ? आपण इतरांना केलेले साहाय्य ईश्वराला कसे आवडेल ?’, याचाही विचार झाला पाहिजे’, हे सर्व मला साधकांकडून शिकायला मिळाले. ‘परिपूर्ण सेवा कशी असावी ?’ हेही मला शिकायला मिळाले.’
३. साधनेत पडलेला खंड आणि त्यानंतर साधनेला मिळालेली दिशा
३ अ. वर्ष २०१२ नंतर साधनेत खंड पडणे : ‘वर्ष २०१० मध्ये पत्नीचे निधन झाल्यानंतर मुलाचे लग्न झाले. तेव्हा पनवेल येथे मी एकटाच रहात होतो. वर्ष २०१२ मध्ये मुलाला जुळी मुले झाली. घरात मुले सांभाळायला कुणीच नव्हते. त्यामुळे मी वर्ष २०१२ ते वर्ष २०१८ या काळात त्यांच्या घरी रहाण्यास गेलो. तेव्हा माझ्या साधनेत पूर्ण खंड पडला. अधूनमधून पू. वटकरकाका यांचा मला दूरभाष यायचा. तेही मला देवद आश्रमात बोलवायचे; मी मात्र त्यांना विविध कारणे सांगायचो. तेव्हा माझ्या मनात विचार यायचे, ‘एवढे करूनही हाती काही लागले नाही. प.पू. गुरुमाऊलीने सर्व काही दिले; पण मलाच ते सांभाळता आले नाही.’
३ आ. सासवड येथे गेल्यावर साधनेला नव्याने आरंभ होणे
१. वर्ष २०१८ च्या शेवटी मी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मनाचा निर्धार करून बोरीवली (मुंबई) सोडले आणि सासवड (पुणे) येथे रहायला गेलो. सासवड येथे माझ्या भावाची पत्नी आणि पुतण्या सनातनच्या माध्यमातून साधना करत होते. त्यांच्या साहाय्याने आणि प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मी साधना पुन्हा जोमाने चालू केली. त्या वेळी कोरोना महामारीचा काळ चालू झाला होता. त्यामुळे प्रसारातील सर्व सेवा ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू होत्या.
२. मी घरात एकटाच असल्यामुळे मला पुष्कळ वेळ मिळायचा. मला पुण्यातील कोथरूड केंद्राशी जोडण्यात आले. तेथील केंद्रसेवकांना मी नियमितपणे आणि प्रामाणिकपणे आढावा देऊ लागलो. ते सांगतील तेवढा नामजप करणे, कोरोनाविषयक नियम पाळून जी सेवा करणे मला शक्य आहे, उदा. राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या माहितीचे फलक लिहिणे, भ्रमणभाषवरून संपर्क करणे इत्यादी सेवा करू लागलो.
३. कोरोना महामारीच्या काळात पू. (सौ.) मनीषा पाठक भावजागृतीसाठी सत्संग घ्यायच्या. त्या वेळी माझ्या मनावर आलेली सर्व मरगळ निघून गेली आणि माझ्या मनाला पुन्हा उभारी मिळाली.
३ इ. सद़्गुरु कु. स्वातीताई खाडये यांची सासवड येथील घरातील भेट : एके दिवशी माझ्या सासवड येथील घरी सद़्गुरु स्वाती खाडये आल्या होत्या. (आमचे सासवडचे घर आता सेवाकेंद्र आहे.) त्या वेळी त्यांना मी माझ्या मनातील साधनेविषयीच्या सर्व समस्या सांगितल्या, ‘‘माझी साधनेत प्रगती का होत नाही ? मी आता आणखी काय करू जेणेकरून गुरुमाऊलीची माझ्यावर कृपा होईल ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘आता होईल !’’ त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही आश्रमात रहायला जाऊ शकता का ?’’ त्यांचे हे बोल ऐकून मला फार आनंद झाला. मी लगेच बॅग भरून ठेवली. ८ – १५ दिवसांत मला आश्रमात जाण्याविषयीची अनुमती मिळाली. (पू. (सौ.) मनीषा पाठकताईंनी मला ‘तुम्ही एक मासासाठी देवद आश्रमात जाऊ शकता’, असे कळवले होते.)
३ ई. एक मासासाठी देवद आश्रमात वास्तव्यास येणे : २१.३.२०२२ या दिवशी मी देवद आश्रमात वास्तव्यास आलो. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेनेच घडत गेले. ‘या सर्व घटनांमागे पाठीराखे असणारे दुसरे-तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरच आहेत’, हे मला येथे आल्यावर समजू लागले. हे त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. याची मला पूर्ण जाणीव आहे.
३ उ. आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित होणे : प.पू. गुरुदेवांच्या कृपेचे फळ म्हणून १.८.२०२२ या दिवशी सद़्गुरु स्वातीताई यांनी आमच्या घरी सासवड सेवाकेंद्रात येऊन मला माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याची आनंदवार्ता दिली आणि मला कृतकृत्य केले.
४. प्रार्थना
‘देवा, तुमची कृपादृष्टी सतत आमच्यावरती अशीच राहू द्या. साधनेत पुढे जाण्यासाठी तुम्हीच आमच्याकडून चिकाटीने प्रयत्न करवून घ्या, हीच तुमच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करतो.’
(समाप्त)
– श्री. यशवंत दौलतराव वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०२३)