‘हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन’ यांच्या वतीने ‘गणपति आरास स्पर्धा २०२३’चे आयोजन !
महाराष्ट्रातील ६ विभाग आणि ३६ जिल्हे येथे आयोजन !
पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अन् महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभलेल्या ‘हर घर सावरकर समिती’च्या वतीने अखिल महाराष्ट्र ‘गणपति आरास स्पर्धा २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा असून या स्पर्धेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र जीवनावर आधारित आरास, देखावे सादर करायचे आहेत. या स्पर्धेत कौटुंबिक, सोसायटी, मित्रमंडळ, शाळा, तसेच सार्वजनिक मित्रमंडळ अशा विविध स्तरांवर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात.
‘हर घर सावरकर समिती’तर्फे ‘गणपती आरास स्पर्धेचे आयोजन#hargharsavkar https://t.co/2fi5aPFH0Z
— MumbaiAaspas Marathi (@mumbaiaaspaasm) September 13, 2023
विविध विभागांतील विजेत्या स्पर्धकांना १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत, ज्यामध्ये अंदमानची सहल, इलेक्ट्र्रिक स्कूटर, टिलर ट्रॅक्टर, ५४ एल्ईडी टीव्ही, शीतकपाट, सोलर वॉटर पंप यांसारख्या विविध बक्षिसांचा समावेश आहे. ‘हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन’ यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि कार्य घराघरांत पोचवण्यासाठी ‘हर घर सावरकर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मे २०२३ या दिवशी रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आणि त्यानंतर विविध शहरांत विविध उपक्रम राबवण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक ‘गूगल फॉर्म’ आणि ‘क्यू.आर्. कोड’ हर घर सावरकर समितीच्या ‘फेसबुक पेज’वर १९ सप्टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेचे नियम आणि अटी तेथे दिल्या आहेत.