पुणे येथील लोकअदालतीमध्‍ये १ लाखांहून अधिक दावे निकालात !

पुणे – राष्‍ट्रीय लोकअदालतीमध्‍ये सर्वाधिक प्रकरणे निकालात काढण्‍यात पुण्‍याने राज्‍यात पहिला क्रमांक मिळवला आहे. ९ सप्‍टेंबर या दिवशी झालेल्‍या लोकअदालतीमध्‍ये १ लाख १० सहस्र १९२ प्रलंबित दावे निकालात काढले. त्‍यातून ३९६ कोटी २ लाख ९९ सहस्र २०० रुपयांचे तडजोड शुल्‍कही प्राप्‍त झाले आहे. प्रमुख जिल्‍हा न्‍यायाधीश आणि पुणे जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष श्‍याम चांडक यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्‍या सचिव सोनल पाटील यांनी लोकअदालतीचे आयोजन केले होते. दावे निकालात काढण्‍यासाठी १३३ पॅनेल नियुक्‍त केले होते.

या यशस्‍वी आयोजनासाठी जिल्‍ह्याच्‍या सर्व न्‍यायालयांतील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि नागरिक यांचे चांगले सहकार्य मिळाले. लोकअदालतीमध्‍ये तडजोड केल्‍यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचतो, तसेच मानसिक त्रासातूनही सुटका होते, असे पुणे जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाच्‍या सचिव सोनल पाटील यांनी सांगितले.