गणेशभक्तांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीचे विघ्न !
|
मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो गणेशभक्त आणि अन्य प्रवासी आपापल्या गावाला जात आहेत. ही संधी साधत ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’, तसेच अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ (आरक्षण करणारे अॅप) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची लुटमार केली जात आहे. खासगी वाहतूक आस्थापनांना एस्.टी. बसगाड्यांच्या तुलनेत दीडपट अधिक प्रवासी भाडे आकारण्याचा शासनआदेश असतांना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांकडून दुप्पट, तिप्पट आणि कधी चौप्पट दर आकारणी केली जात आहे. एकीकडे परिवहन विभागाने गणेशोत्सवात प्रवाशांच्या लुटमारीच्या विरोधात तक्रारीसाठी ८८५०७८३६४३ हा ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांक प्रसारित केला आहे; मात्र आजच्या ऑनलाईन युगात ८० ते ९० टक्के वाहनांचे आरक्षण हे खासगी प्रवासी तिकिट बुकींग अॅपद्वारे ऑनलाईन होते; त्याकडे मात्र राज्य परिवहन विभागाचे लक्ष नाही, असे दिसून येते. तरी ‘गणेशभक्तांवर आलेले ऑनलाईन लुटमारीचे विघ्न दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.
याविषयी ‘सुराज्य अभियाना’चे राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरकुटे यांनी सांगितले की, याविषयी परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्री, परिवहन सचिव, तसेच परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. गेली काही वर्षे सातत्याने लढा दिल्यामुळे परिवहन विभागाने काही ठिकाणी तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक आणि प्रवासी दरपत्रके प्रसारित केली आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परिवहन विभागाने दीडपट भाडेवाढ करणारा शासनआदेश काढला; मात्र त्याची अनेक वर्षे कार्यवाही होत नव्हती. त्याविरोधात सुराज्य अभियानाद्वारे राज्यव्यापी आंदोलन, तसेच मोहिमा राबवून परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या. तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेटही घेतली. विद्यमान परिवहन आयुक्त श्री. विवेक भिमण्णवर यांच्याशीही याविषयी संवाद चालू आहे.
मुंबई ते रत्नागिरी आकारले जात आहे ४०० ते १,००० रुपये अधिक भाडे !श्री. मुरकुटे पुढे म्हणाले की, नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने रत्नागिरी ते नवी मुंबई शासकीय दरपत्रकच प्रसारित केले आहे; परंतु अन्य ठिकाणच्या प्रवाशांचे काय ? त्याहूनही पुढे ‘सर्ज प्रायझिंग’च्या (मागणी वाढली की, दर वाढतो) नावाखाली ऑनलाईन अॅपवर खासगी बसचे तिकीट दर एरव्हीच्या तुलनेत चौपट कसे होतात ? उदा. वातानुकूलित शयनयान बससाठी ३.२२ रुपये प्रति कि.मी.चे दरपत्रक शासनाने निश्चित केले असतांना शीव (मुंबई) ते रत्नागिरी या ३४४ कि.मी. प्रवासासाठी १,११० रुपये दर आकारणे आवश्यक आहे; मात्र तो दर १,५०० ते २,२०० रुपये आकारला जात आहे. अन्य ठिकाणीही अशीच स्थिती आहे. तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर किंवा अॅपवर वेगवेगळे प्रवासी दर न ठेवता शासनमान्य दराच्या दीडपट दर ठेवण्याचा आदेश काढण्यात यावा. या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे नोंदवावेत, तसेच या खासगी आस्थापनांचेे परवाने रहित करावेत, अशी आमची मागणी आहे.’’ |